आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलची फायनल 19 मे रोजी चेन्नईत; सामन्यांचा मार्ग माेकळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे २०१९च्या आयपीएल स्पर्धेच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्याचा बीसीसीआयचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, देशभरातील सात टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा आणि ठिकाणांचा मेळ घालताना कसरत करावी लागणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जला सलामी आणि अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार चेन्नईतील मतदान दुसऱ्या टप्प्यातील तारखांना होणार आहे. याचाच अर्थ अंतिम सामन्याच्या आयोजनाचा चेन्नई सुपरकिंग्जचा मार्ग मोकळा झाला आहे.  


बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकांच्या तारखांमुळे आयपीएलच्या सामन्यांची संख्या कमी करावी लागणार नाही. ज्या शहरांमध्ये निवडणुका नसतील आणि सुरक्षा व्यवस्था क्रिकेट सामन्यासाठी दिली जाईल अशा ठिकाणी सामने आयोजित केले जातील.  


निवडणुकांमुळे पूर्वनियोजित कार्यक्रमातील काही ठिकाणे बदलली जातील; मात्र सामन्यांची संख्या निश्चितच कमी होणार नाही, असेही या प्रवक्त्याने सांगितले. चेन्नई येथे ठरल्याप्रमाणे अंतिम सामना १९ मे रोजी होईल.  


यंदा आयपीएलचे ६० सामने होणार आहेत. त्या सामन्यांची ठिकाणे व तारखाही निश्चित झाल्या आहेत. स्वगृही आणि परगावी अशा ७-७ सामन्यांच्या कार्यक्रमात फारसा फरक पडणार नाही, असा विश्वास बीसीसीआयला आहे. निवडणुकांच्या वेळी आड येणारे सामने त्याच प्रतिस्पर्ध्याच्या मैदानांवर (परगावी) घेतले जातील. त्याच टप्प्यात त्या शहरातही मतदान होणार असेल तर तारखांमध्ये बदल केला जाईल. त्यानंतरही अडचण होत असल्यास सामन्याचे ठिकाण बदलले जाईल. काही शहरांमधील स्टेडियम्स अशा कोंडी करणाऱ्या सामन्यांच्या आयोजनासाठी राखून ठेवण्यात येतील.  त्यामुळे आता निवडणुकीच्या दरम्यानहीक्रिकेटप्रेमी चाहत्यांना आयपीएलच्या सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे.


यंदाच्या सत्राला येत्या २३ मार्चपासून सुरुवात हाेईल. येत्या १४ दिवसांच्या पहिल्या वेळापत्रकामध्ये एकूण १७ सामन्यांचा समावेश करण्यात आला आहे. 


हित लक्षात घेऊन आखणी 
आयपीएल फ्रँचायझींचे हित आणि सुरक्षा व्यवस्था यांचा विचार करूनच आयपीएल दुसऱ्या टप्प्याच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. फ्रँचायझी आणि अन्य संबंधितांनी अनुकूलता दर्शवल्यानंतर येत्या १-२ दिवसांतच दुसऱ्या आयपीएल टप्प्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.  


- पहिल्या टप्प्यातील १७ सामन्यांच्या तारखांमध्ये निवडणुकांच्या तारखांचा हस्तक्षेप होत नसल्याने तो टप्पा निर्विघ्नपणे पार पडेल.
- फ्रँचायझींना मुख्य केंद्रांप्रमाणेच राखीव केंद्राची तरतूद करण्याचे सुचवले आहे.  
- यंदा निवडणुकांदरम्यान संपूर्ण आयपीएल स्पर्धा भारतात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- यापूर्वी २००९मध्ये संपूर्ण आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. 
- २०१४ आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले गेले होते.

बातम्या आणखी आहेत...