Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | IPL 2019 matches starts from today

आजपासून सुरु होणार आयपीएलचा थरार, पहिल्या सामन्यात चेन्नई व बंगळुरू आमने-सामने

वृत्तसंस्था | Update - Mar 23, 2019, 09:55 AM IST

पहिल्यांदाच आयपीएलचे सामने विश्वचषकापूर्वी; १० खेळाडू टीम इंडियामध्ये मिळवू इच्छितात प्रवेश

 • IPL 2019 matches starts from today

  चेन्नई - आयपीएल टी-२० स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेचे सामने वनडे विश्वचषकापूर्वी होत आहेत. फायनल सामना १२ मे रोजी होणार असून विश्वचषक सामने ३० मेपासून इंग्लंड येथे सुरू होतील. अशात स्पर्धेत खेळणाऱ्या दहा खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असेल, जे चांगले प्रदर्शन करत भारतीय संघात प्रवेशासाठी प्रयत्न करतील. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत चांगले प्रदर्शन करू न शकलेल्या रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनीसह वरिष्ठ खेळाडू लय मिळवण्यासाठी खेळतील. या स्पर्धेत वरिष्ठ खेळाडूंनी जास्त जोखीम पत्करू नये, जेणेकरून ते दुखापतग्रस्त होतील, असे कर्णधार विराट कोहलीने पहिलेच स्पष्ट केले आहे. आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे, लोकश राहुल, अंबाती रायडू, विजय शंकर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, उमेश यादव, खलील अहमद यांच्यावर लक्ष असेल.

  दुसरा यष्टिरक्षक, फलंदाजीत नंबर चार; अष्टपैलू, चौथ्या वेगवान गोलंदाजावर लक्ष
  >> यष्टिरक्षक : कार्तिक-पंत

  धोनीसोबत दुसरा यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत शर्यतीत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत पंत चांगले प्रदर्शन करू शकला नाही. कार्तिकलादेखील संधी मिळाली नाही. या दोघांना निवड समितीचे लक्ष वेधावे लागेल. कार्तिकने वनडेत ७७ डावांत १७३८ धावा केल्या. पंतने ४ डावांत ९३ धावा काढल्या.

  >> नंबर ४ : रायडू, राहुल, रहाणे
  चार नंबरची जागा सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. रायडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत ३ सामन्यांत केवळ ३३ धावा करू शकला. एका सामन्यात राहुलला नंबर ३ वर संधी दिली होती, मात्र त्याने २६ धावा केल्या. राहुल गरज पडल्यास सलामीला येऊ शकतो. यापूर्वी टीम इंडियाचा सर्वाधिक विश्वासू खेळाडू अजिंक्य रहाणेने अखेरचा वनडे २०१८ मध्ये खेळला. अनुभवात रहाणे (९० वनडे) पुढे आहे. मात्र, रायडूच्या बाजूने कर्णधार कोहली आहे.

  >> अष्टपैलू : पांड्या, विजय किंवा रवींद्र जडेजा
  अष्टपैलू म्हणून हार्दिक पांड्याचे संघात स्थान निश्चित आहे, मात्र तो सध्या दुखापतीमुळे अडचणीत आहे. त्यामुळे निवड समितीसमोर चिंता ठरेल. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत विजयने चांगला खेळ केला. त्याने वनडेत ५ डावात १६५ धावा काढल्या व २ बळी घेतले. दुसरीकडे जडेजाकडे १५१ सामन्यांचा अनुभव आहे. त्याने २०३५ धावा व १७४ विकेट घेतल्या.

  >> चौथा वेगवान गोलंदाज खलील किंवा उमेश
  वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार व मो. शमी यांचे स्थान निश्चित आहे. चौथ्या गोलंदाजासाठी खलील अहमद व उमेश यादवचा पर्याय आहे. उमेशने गेल्या पाच महिन्यांत एकही वनडे खेळला नाही. त्याने ७३ डावांत १०६ व खलीलने ८ सामन्यांत ११ बळी घेतले.

Trending