Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | ipl betting 3 engineering student arrest in nashik

आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर बेटिंग; इंजिनिअरिंगच्या 3 विद्यार्थ्यांना अटक

प्रतिनिधी | Update - Apr 11, 2019, 12:27 PM IST

नाशकात कारवाई : चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यावर सुरू होता सट्टा   

 • ipl betting 3 engineering student arrest in nashik

  नाशिक - आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग करणाऱ्या तीन संशयितांना आडगाव पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. मंगळवार (दि. ९) रात्री ११ वाजता सरस्वतीनगरमधील लक्ष्मी छाया अपार्टमेंटमध्ये ही कारवाई केली. संशयित चेन्नई सुपर किंग विरुद्ध कोलकाता नाइट रायडर या संघावर ऑनलाइन बेटिंग खेळत होते. श्रेयस सुधाकर ढोले, केतन कैलास आठरे आणि तेजस अण्णासाहेब गंगावणे (तिघेही रा. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून ते अभियांत्रिकी शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी ‘दिव्य मराठी’ने वारंवार वृत्त प्रकाशित केले आहे.


  परिसरात गस्त घालत असताना सरस्वतीनगर येथे क्रिकेट सामन्यावर बेटिंग सुरू असल्याचा माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने प्रथम खात्री केली. लक्ष्मी छाया अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ३ मध्ये छापा घातला असता घरात टीव्हीवर क्रिकेट सामना सुरू होता. टीव्हीसमोर श्रेयस, केतन आणि तेजस फोनवर बोलत असल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्याकडे रजिस्टरवर आकडे लिहिलेले आढळले. पोलिसांनी चौकशी केली असता अमोल ठुबे (रा. खेडगाव, अहमदनगर) याच्याकडून फोनवर बेटिंग घेत असल्याची कबुली दिली. तिघांकडून रोकड, एलईडी टीव्ही, लॅपटॉप, ३ मोबाइल, असा ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


  मोठे मासे मोकाट
  क्रिकेट बेटिंगच्या या धंद्यात शहरातील नामचीन बेटिंग मास्टर पोलिस कारवाईपासून अद्याप दूर आहेत. एक सामन्यावर कोट्यवधींचा जुगार लावला जात असल्याने या तेजीच्या सट्टाबाजारात भाई, राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींनी शिरकाव केल्याची चर्चा आहे. आता या कारवाईने पोलिस यंत्रणा सतर्क झाली असली तरी गुन्हे शाखेच्या तीन पथकांकडून धडक कारवाई होणे गरजेचे आहे.


  कारवाईला उशीर
  आयपीएल सामान्यांवर बेटिंग जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जातो. नामचीन बुकींकडून नियोजनबद्ध ऑनलाइन वाहनात बसून सामन्यांवर जुगार लावला जात असल्याचे पोलिसांना माहिती असूनदेखील २५ सामन्यांनंतर एक कारवाई झाली. पोलिसांकडून धडक कारवाई अपेक्षित असताना तिन्ही पथकांकडून कारवाई न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Trending