आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेल्फी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इर्शाद बागवान   

अम्मीच्या या प्रश्नाबरोबर गार्गीची उरलीसुरली झोप आता पुरती उडाली. तिला आठवलं, अम्मीचं लेक्चर दुर्लक्षून आपलं मनसोक्त भिजणं.. संध्याकाळच्या शिंका आणि आजची नरमगरम तब्येत... तिला आपली चूक कळली. अम्मी आपल्याच कामात मग्न होती. गार्गीने पाठीमागून येऊन अम्मीला मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावर आता न ऐकल्याचा पश्चात्ताप दिसत होता. मुसमुसत अम्मीला म्हणाली, "अम्मीजी, मजे माफ करो. मैने तुमारा बोलना सुनी नै. गल्ती हुई.'
 
"कल हय ना, हमारे बाईंन्ने हय ना, क्या बोलेलाय मालुम हय क्या ?... बाईंन्ने बोले, काल सगल्यांनी नतुनथतुन, नीत मेकपबिकप करून, नवेनवे कपडे घालून यायचं.. कल हमारे इस्कुलमें लै मज्जा आनालीय... हौर बाईंन्ने बोले... काल मी तुमाला गिफ्ट देनाराय गिफ्ट !... लै कतो लैच मज्जा'. गार्गी उत्फुल्लित चेहऱ्याने म्हणाली. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावरून आणि नजरेतून उद्याचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. 

नेमकं संध्याकाळी आभाळ भरून आलं. झालं होतं असं, यावेळी हवामान बदलामुळे म्हणा किंवा आपल्याच पापांमुळे, पावसाळा एवढा अंगावर आला होता की पुढील दोन तीन वर्षांची कसर पाऊस आत्ताच भरून काढतोय की काय अशी शंका यायला लागली होती. आतुरतेने पावसाची वाट बघणाऱ्या मंडळींच्या मनात आपोआप जिथे "येरे येरे पावसा तुला देतो पैसा' सुरू होत असे तिथे आता "किती कहर रे हा पावसा, बस कर की रे आता, तुला देईन पैसा' म्हणायची 

वेळ आली होती. त्यांत हा परतीचा पाऊस आणि कमालीचा मूडी. सकाळी लाहीलाही करणारं दाट ऊन आणि संध्याकाळ झाली की कसलेल्या पेंटरप्रमाणे काही क्षणांत निरभ्र आकाश सरसरसरसर काळ्याकरड्या ढगांनी भरून जायचं अन् गल्लीत जमलेली कुत्री उगाचच एकमेकांवर खेकसत जद्वत माहौल बनवताना दिसतात तद्वत हे ढग एकमेकांवर धावून जात कडाड्कट्ट आवाजात वीजेचा झोत चमकवायचे. आणि दणाण्ण पावसाला सुरुवात व्हायची. तासअर्धातास तरी मग भणाण वारा आणि रेपटणारा पाऊस अशी युती जमायची. 

तर गार्गीला नेमका आज भिजण्याचा मूड आला. तिने ठरवलं, काहीही करून आज भिजायचंच. जेवल्यानंतर खेळण्याच्या बहाण्याने, "मइ जरा जान्हवीकने जा के आयी गे मम्मे', म्हणत ती बाहेर पडली. जरा वेळ जातो न जातो तोच झरझर आभाळाचा पट बदलला, वीजांचा कडकडाट होऊन दणदण पाऊस कोसळू लागला. अम्मी काळजीत पडली. आता गार्गी अडकली पावसात असा विचार करून ती पटकन छत्री घेऊन तिला आणण्यासाठी बाहेर पडली. जान्हवीचं घर बघितलं तर दोन मिनिटांच्या अंतरावर पण पावसाचा जोर इतका की छत्री असूनसुद्धा अम्मीही निम्मीअर्धी भिजलीच. जान्हवीच्या घरापर्यंत पोहोचून बघते तर काय, बाईसाहेब पावसात हात पसरून मस्त भिजत, मधूनच हातावर थेंब झेलत, पाणी उडवत मजेत अंगणात नाचत उभ्या आहेत. हाय अल्ला ! 

"गार्गी, अरे बेटा... भिजू नको... सर्दी हुइंगी... चल इदर छत्रीमें... चल चल...' म्हणत मग अम्मीने बळेबळेच तिला ओढत छत्रीत घेऊन घरी आणले. घरी आल्यानंतर टॉवेलने नीट केस पुसले, भिजलेले कपडे काढून अंग कोरडं केलं, दुसरे कपडे घातले. हे करत असताना एकीकडे "केत्ते टाइम बूली तुजे, इ बर्सातमें नै भिजते. बादतां इ बर्सात. देकेतो वातावरण घडीघडी बदलतें, घडीमें धूप; घडीमें बर्सात तो घडीमें थंड, अन् उप्पर्शे इ तेरा भिजनेका नाद. तुजे तौच जान्हवीकने जाने देने नै हुनातां..' असा तोंडाचा पट्टा निरंतर चालू होताच. गार्गी मात्र खुश होती. तिची भिजायची इच्छा, थोडा वेळ का होईना, पूर्ण झाली होती. 

परंतु याचा अपेक्षित परिणाम थोड्याच वेळाच्या फरकाने दिसू लागला. गार्गीला शिंका येऊ लागल्या. "आक् छी आक् छी चा एकापाठोपाठ एक गजर सुरू झाला आणि प्रत्येक शिंकेमागोमाग अम्मीचं "तुजे बुलतीती मइ, भिजू नको कर्के..'चा अलार्म. तरी अम्मीने मग तिला गरम उबदार कपडे घातले, गरमागरम आल्याचा चहा प्यायला दिला. पण रात्र होईतो गार्गीची सर्दी चांगलीच वाढली आणि रात्री झोपेतली बेचैनी ती वेगळीच. 

दुसरा दिवस उजाडला. रात्रीची भिरभिर उडती जागझोप आणि सर्दीचा अंमल गार्गीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अम्मीने कफ उतार व्हावा म्हणून गरम पाणी प्यायला दिले. म्हणाली, "आज इस्कूलमें जानेकाय ना मेरे बाबल्याकू ? ...नटथटके ?'

अम्मीच्या या प्रश्नाबरोबर गार्गीची उरलीसुरली झोप आता पुरती उडाली. तिला आठवलं, अम्मीचं लेक्चर दुर्लक्षून आपलं मनसोक्त भिजणं.. संध्याकाळच्या शिंका आणि आजची नरमगरम तब्येत... तिला आपली चूक कळली. अम्मी आपल्याच कामात मग्न होती. गार्गीने पाठीमागून येऊन अम्मीला मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावर आता न ऐकल्याचा पश्चात्ताप दिसत होता. मुसमुसत अम्मीला म्हणाली, "अम्मीजी, मजे माफ करो. मैने तुमारा बोलना सुनी नै. गल्ती हुई.'

"अगे, मेरा शाना बच्चा', म्हणत अम्मीने तिला घट्ट मिठी मारली आणि एक पापी घेतली. वरतून म्हणाली, "केत्ती गे मिठ्ठीशाद पप्पी हय यो... गुड हय क्या शक्कर हय जी इसमें ? ... आँ...आँ ?'. हे ऐकल्यावर गार्गीची कळी खुलली. त्यानंतर मग फुरसदीने व्यवस्थित मेकअप झाला. मॕडम झक्क तयार झाल्या. 
अब्बू पुस्तक वाचता वाचता हे सगळं चालल्याचा कानोसा घेत होताच. इतक्यात बाईसाहेब बाहेर आल्या अन् अब्बूला एक टप्पू देत म्हणाल्या, "तुमें क्या देक्तेन् जी अब्बू ? कैशी दिस्तीया मइ बोलो दिकिंगे.. अन् मोबाईल निकालो जल्दी...पाउट करके सेल्फी लेनेकीय..'
यानंतर अब्बू बराच वेळ त्या "पाउट' शब्दातच गुंतून पडला आणि इकडे मॕडमची फुरसदीत सेल्फीसाधना चालली होती...आणि आता अम्मी बाहेरून ओरडत होती, "हुया क्या नै वू सेल्फीन्फेल्फी ? इस्कूलका टैम हुया... चलो...'

लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२

बातम्या आणखी आहेत...