आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहा विधानसभा : उमेदवारी मेव्हण्याला द्यायची की मुलांना; खासदार चिखलीकर पेचात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनायक एकबोटे | नांदेड - लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाची निवडणूक खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरणार आहे. प्रताप पाटलांचे मेव्हणे माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे व पुत्र प्रवीण पाटील, मुलगी प्रणिता चिखलीकर यांच्यापैकी प्रताप पाटील कोणाच्या बाजूने उभे राहतात यावर या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. 

कंधार-लोहा मतदारसंघ हा भाई केशवराव धोंडगे यांच्या नावामुळे राज्यात प्रसिद्ध झाला. तब्बल २० वर्षे केशवरावांनी या मतदारसंघाच्या मदतीने राज्याची विधानसभा गाजवली. त्यांच्यानंतर हा मतदारसंघ चर्चेत आला तो प्रताप पाटील चिखलीकरांमुळे. अशोक चव्हाण-प्रताप पाटील यांच्यातील संघर्षाची ठिणगी याच मतदारसंघात पडली. विधानसभेत चव्हाणांनी मुख्यमंत्रिपदाची पूर्ण ताकद राष्ट्रवादीचे शंकरअण्णा धोंडगे यांच्या पाठीशी उभी करून प्रताप पाटलांना विधानसभेत जाण्यापासून रोखले. त्याचे उट्टे प्रताप पाटलांनी नुकत्याच लोकसभा निवडणुकीत काढले. अशोक चव्हाणांसारख्या माजी मुख्यमंत्री व विद्यमान प्रदेशाध्यक्षांचा पराभव केल्यामुळे जिल्ह्याची भाजप सध्या प्रताप पाटलांच्याच इशाऱ्यावर नाचते. परंतु प्रताप पाटलांची ही शक्ती त्यांना घरातच अडचणीची ठरली. माजी सनदी अधिकारी व प्रताप पाटलांचे मेव्हणे श्यामसुंदर शिंदे यांनी प्रारंभी विधान परिषद निवडणुकीत नशीब अजमावले. परंतु त्यात यश आले नाही. आता प्रताप पाटील खासदार झाल्याने ते लोहा मतदारसंघातून तयारीला लागले. परंतु त्याचवेळी प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही  उमेदवारी पुढे केली. त्यांची मुलगी प्रणिता देवरे यांचेही नाव चर्चेत आहे. त्यातून गृहकलह निर्माण झाला अाहे. त्याचे पडसाद सोशल मीडियातही उमटले. त्यामुळे या मतदारसंघात खरी परीक्षा प्रताप पाटलांचीच आहे. 

हे असू शकतात संभाव्य उमेदवार 
हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने मुक्तेश्वर धोंडगे यांची उमेदवारी कायम मानली जाते.  राष्ट्रवादीकडून शंकरअण्णांचे चिरंजीव व जि. प.चे माजी उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्याकडून मागणी होत आहे. काँग्रेसकडून रोहिदास चव्हाण, अनिल मोरे, बालाजी पंडागळे, संजय भोसीकर तर  शेकापकडून पुरुषोत्तम धोंडगे तर वंचित आघाडीकडून संजय बालाघाटे, शिवा नरंगले, विनोद पापिनवार हे इच्छुक आहेत. शिवसेनेचे नेतेे प्रा. मनोहर धोंडे हेही इच्छुक आहेत.   
 

२०१४ मधील विधानसभेची स्थिती
प्रताप पाटील     शिवसेना    ९२,३५५ 
मुक्तेश्वर धोंडगे      भाजप    ४६,९४९
शंकर धोंडगे      राष्ट्रवादी    २९,२९४
रोहिदास चव्हाण     मनसे       ६५,६८

या आहेत मतदारसंघातील समस्या
कायम दुष्काळी असलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अपुरे पर्जन्यमान होते. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था हलाखीची आहे. मानार प्रकल्पामुळे काही अंशी सिंचनाची समस्या सुटण्यास मदत झाली. सीताफळांचे चांगले उत्पादन देणारा हा भाग आहे. परंतु सीताफळावर प्रक्रिया करणारा उद्योग नाही. कोणताही मोठा उद्योग या मतदारसंघात नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. दुर्गम, डोंगराळ भाग असल्याने अंतर्गत रस्तेही खस्ता खाल्लेल्या अवस्थेत आहेत.