आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइर्शाद बागवान
एका दुचाकीने जोरात करकचून ब्रेक दाबल्याने एक छोटा मुलगा त्या आवाजाने घाबरून कानावर हात दाबून धरत चेहरा झुकवून डोळे गच्च मिटून रस्त्यातच थरथरत बसला होता. इकडे काय झालं ते पाहायला गर्दी वाढू लागली, परंतु कुणालाही त्या मुलाला जवळ जाऊन प्रेमाने बाजूला घेऊन यायचे साधे सुचत नव्हते.
“अली, अरे इदर आ दिकू. किदर भागती र्हती यो छूरी क्या की! अजिबात हातमेंच आती नै देको. नुस्ती भिरभिरती जान. इसकू एक जगी थांबाना कतो क्या बोल्ना आबी... पहाड उठाना आसान.’... दादी पाहुण्यांपाशी अलिनाबद्दल सुप्त कौतुकाने बोलत होती. या तास - अर्धा तासाच्या बोलण्यात वारंवार अलिनाचे संदर्भ येत होते आणि “आइ गे दादी, थांब जरा घडीभर’ म्हणत अलिनाच्या मात्र आतबाहेर आतबाहेर अशा पन्नास फेऱ्या झाल्या असतील.
त्याचं झालं होतं असं की दिवाळीची सुट्टी चालू होती. आणि सुट्टी सुरू झाल्यापासून अगदी रोज रोजचे खेळण्याचे प्रोग्राम आदल्या रात्रीतच ठरत होते. परंतु, दुसऱ्या दिवशी त्यावर अंमल होईल तर शपथ! दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर डोक्यातून नवीनच टूम निघायची आणि आदल्या रात्रीच्या प्लॕॅनची ऐशीच्या तैशी होऊन जायची. नेमकं आजही असंच झालं होतं. रात्री ठरलेला आजचा मैदानी खेळांचा प्रोग्राम सकाळी उठल्यानंतर अगदी सफाचट होऊन पत्त्यांचा बंगला बनवायचं नवीनच खूळ डोक्यात आलं होतं अन् अलिना आणि बाकी चिल्लीपिल्ली आता त्याच्या तयारीला लागली होती. पत्ते जमव, गम आण, पुठ्ठा आण, कात्री वगैरे साठी आतबाहेर आतबाहेर अशा निरंतर फेऱ्या चालू होत्या. आणि त्यांत मधेच दादीच्या हाका! ...
“तुजे केत्तेटैम बुली मैने, लंबा बैट जरा तू. डुग्गूs, तू अजिबातच सुन्ता नै देक मेरा. सरक पिच्चे, सरक पिच्चे दिकू. व्हां खुर्चीपर बैट दिकिंगे. बंगला बनानेकाय ना आप्लेकू?... मछ्तं मछ्तं?... तो दिदीका सुन्नेका! ..हां ?’ अलिना डुग्गूला समजावत होती पण डुग्गू रांगत रांगत पुन्हा पत्त्यांशीच येत होता. हातात पत्ते घेऊन लाळ गाळत मजेत चघळत होता. दिवाळीची सुट्टी अशी रंगात आली होती. जागोजाग मुलांची टोळकी काहीबाही नियोजन करण्यात दंग होती.
गल्लीतला रस्ताही याला अपवाद नव्हता. मुलांची नुसती झिम्मड उडाली होती त्यामधूनच वाहनांची ये-जाही चालू होती. कोणी नवा पाहुणा पहिल्यांदाच या गल्लीत आला तर नक्कीच ही मुलांची संख्या बघून आश्चर्याने त्याचा आ वासल्याशिवाय राहिला नसता इतकी मुलं. इतक्यात गल्लीच्या वरच्या टोकाला मेनरोडवर काहीतरी मोठ्ठा गलका झाला. काय झाले हे पाहायला सगळी चिल्लीपिल्ली पळाली.
झालं होतं असं की एका दुचाकीने जोरात करकचून ब्रेक दाबल्याने एक छोटा मुलगा त्या आवाजाने घाबरून कानावर हात दाबून धरत चेहरा झुकवून डोळे गच्च मिटून रस्त्यातच थरथरत बसला होता. इकडे काय झालं ते पाहायला गर्दी वाढू लागली परंतु कुणालाही त्या मुलाला जवळ जाऊन प्रेमाने बाजूला घेऊन यायचे साधे सुचत नव्हते. उलट रस्ता जाम झाल्याने गाड्यांचे हॉर्न सवयीनुसार जास्तच कर्कश वाजू लागले होते आणि जमलेल्या गर्दीमधून मोठी जाणती माणसंही नेणत्यासारखी त्या घाबरलेल्या मुलावर ओरडून त्याला बिचाऱ्याला अजूनच घाबरवत होती. या गोंधळात तो अजूनच जास्त बिथरून काही न सुचल्याने आताशा जोरात रडू लागला होता. अलिनाने आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे गर्दी कापत सगळ्यांच्या पुढे येऊन ते दृश्य पाहिले. काही सेकंदांचाच वेळ गेला असेल - नसेल, मनाशी काही ठरवून दोन्ही हात पसरवून गाड्यांना थांबण्याचा इशारा करत ती त्या मुलाजवळ आली. तोपर्यंत एव्हाना गर्दीतून तिलाही हटकण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. परंतु तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून अलिनाने जवळ येऊन त्या मुलाला नीट बघितले. अरे! हा तर नाजीमचाचांचा मुज्जू होता. ती त्याच्या जवळ येऊन बसली. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. म्हणाली, “अरे मुज्जू, मेरा शाना बच्चा. क्या हुया रे तुजे?... एत्ता स्ट्राँग बच्चा तू? ... अन् इ हॉर्नके आवाजकू डरतां? ... चल उठ. आपण बंगला बनानेकाय. पत्त्यान्का. तू आनाला ना मेरेसंगात? बंगला हुया कतो आपण मछ्तं मछ्तं फ्रूट आईस्क्रीम खानेका शिवाचाचाके दुकानपर जा के. आवडता ना तुजे? ... चल उठ फिर. चल जल्दी. बंगला बनानेकू...’,असं बोलता बोलता त्याला कुशीत घेऊन ती उठलीसुद्धा.
इकडे एव्हाना गर्दीला अन् गाडीवानांना बहुधा अलिनाची ती कृती पाहून थोडीशी अक्कल आली होती म्हणून हॉर्नचा कलकलाट आणि दंगा थोडा शांत झाल्यासारखा वाटत होता. अलिनाने मुज्जुला कुशीत घेतले अन् रस्त्यावरून बाजूला आली. आता ट्रॅफिक सुरळीत झाले. गर्दीही पांगली. मेनरोडवरून बाजूला गल्लीत आल्यानंतर तिने मुज्जूला खाली उतरवले. तो आता बराच शांत झाला होता. अलिनाच्या बोटाला धरून तो खुशीत गल्लीतली वाट चालू लागला, “दीदी आपण मछ्तं मछ्तं बंगला बनानेका ना?’ म्हणत...
लेखकाचा संपर्क: ९१६८२०१९०१
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.