नटखट न्हनपन / फुटाणे

बरकतभाई अगोदरच्या प्रश्नानेच विचारात पडले होते, त्यांची खरं तर तंद्रीच लागली होती

दिव्य मराठी

Dec 01,2019 12:16:00 AM IST

इर्शाद बागवान

बरकतभाई अगोदरच्या प्रश्नानेच विचारात पडले होते. त्यांची खरं तर तंद्रीच लागली होती. त्यांना विचारात पडलेलं बघून पोरगं अजून म्हणालं, "एत्ता बिचार नै कर्नेका चाचा. उप्परवाला सबकू देता.. आपनबी देते रहनेका... चलो जाऊं क्या.. सलामालेकूम.'

जेवणं उरकल्यानंतर बरकतभाईंनी नेहमीप्रमाणे दुकानाचं शटर उघडलं. चॉकलेट गोळ्यांच्या बाटल्यांवर कपडा मारला. एक बडीशेपची पुडी फोडून हातावर घेऊन चोळली अन् तोंडात टाकली. चघळत चघळत खुर्चीत बसले आणि समोरचं एक पुस्तक हातात घेतलं. वाचू लागले. वाचता वाचता लागलेली तंद्री एका आवाजाने तुटली.


"चाचा, वू फुटाणेकी पुडी केत्तेकू ओ?'


बरकतभाईंनी नजर उचलून इकडेतिकडे पाहिलं. कुणी दिसेना. उभे राहिले. काउंटरखाली नजर टाकली. एक काउंटरपेक्षा बारकुळं पोरगं मान वर करून किलकिल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहात होतं. मग नजर वळवून मागे दाखवत म्हणालं, "वू वू.. तुमारे पिच्चेके.. फुटाणे.. केत्तेकू?'


"पाच रूपय.' बरकतभाई.


मग जीन्सच्या खिशात हात घालून त्यानं चिल्लर तळहातावर घेतली. मोजली. "एक.. दोन... पाच..हा.. इल्लेव', म्हणत तळहात पुढे केला. "देव येक मजे.'


बरकतभाईंनी पैसे मोजले. म्हणाले,"चारच हय यो. येक रुपाया कम हय.'


"ऐसाकैसा ? आँ ? ऐसाकैसा कम हय ? मैने मोजा ना आब्बीच. एदेको.. इ येक.. हां ? .. इ तीन.. हां ? ... अन् इ पांच.'


बरकतभाई मनापासून हसले. म्हणाले, "किस्का रे तू ?'


"सुलेमानका', पोरगं त्वरित उत्तरलं. बरकतभाईंना विचारात पडलेलं बघून पुढे अजून म्हणालं, "तुमें नै पैचानते वो. सुलेमान कतो तुमारेह्यांका नै. सांगलीका. हमारी खाला र्हती ह्यां. उस्केकन आयलेय हामें.'


बरकतभाईंना पोरगं आवडलं. म्हणाले, "ला वू चार रूपय...'


परत वैसाच ! चार नै वो.. पांच हय.. एदेको...'


भ ला भ ला पांच रुपय.. ला वू इदर. देता तुजे क्या हुना सो.'बरकतभाई म्हणाले.


वैसा नको. तुमारा घाटातुबी कैकू ? शिद्दा देको.. पांच हय. नैतो बुलिंगे.. एत्तेशे छोरेने फँसाया कर्के.'


बरकतभाई पुन्हा मन भरून हसले. म्हणाले, "एत्ते बडेबडे बातां का शे शिक्या रे तू ?'


पोरगं म्हणालं, "आब्बाके दुकान्पे बैटता ना मइ, सांगलीमें. सब देकता. बेपार. आब्बा बोल्ते, फसवाफसवीका धंदा नै कर्नेका कबी.'


"बराबर हय, भला बोल बाबा आबी... क्या हुनाय तुजे ?' बरकतभाई म्हणाले.
"फुटाणे हुनाय... पन सुनोतो... ओ चाचा... सुन्ते क्या अब ?...'
"हां बोल.'


"मेरा ठीकंय. मेरेकने हय पैशे... मै लिउंगा क्याबी खानेकू... तुमारे दुकान्मेंशे.. पन एकांदा गरीबका बच्चा आया तुमारेकने..उस्केकन पैशेच नचे अजिबात. कोन कतो कोनच नै देता आचिंगा उस्कू पैशे. खानेकू लेनवास्ते...अन् उस्कू कुच्तुबी खानासा लग्या तुमारे दुकानमेंका... तो पैशे नचेतुबी तुमें दिंगे क्या उस्कू खानेकू ?... ऐसाच फुकट ?... की पैशेपैशेच कर्ते बैटिंगे ?'


बरकतभाईंनी फुटाण्याची पुडी देण्यासाठी हातात धरली होती. पोराने ती पुडी घेतली. म्हणालं, "आच्चे हय ना फुटाणे ?'


बरकतभाई अगोदरच्या प्रश्नानेच विचारात पडले होते. त्यांची खरंतर तंद्रीच लागली होती. त्यांना विचारात पडलेलं बघून पोरगं अजून म्हणालं, "एत्ता बिचार नै कर्नेका चाचा. उप्परवाला सबकू देता.. आपनबी देते र्हनेका... चलो जाऊ क्या.. सलामालेकूम.'


पोरगं रस्त्याला लागलंही होतं अन् बरकतभाईंच्या चेहऱ्यावरचे आश्चर्यकारक भाव अजून तसेच होते.


लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२

X