आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चष्मा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इर्शाद बागवान   

अब्बू हसले. म्हणाले, “तुमचं खरंय डॉक्टर. टीव्ही, मोबाइलने फारच अत्याचार केलाय सगळ्यांवरच. खरं तर दोषी आपण मोठेच आहोत. मोठ्यांचं अनुकरण हे लहान जीव करत असतात. पण इथे आमच्या या छोट्याची गोष्ट थोडी वेगळी आहे. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं तसं अब्बूने माजिदला आत्ताचं चित्र डॉक्टरांना दाखवायला सांगितलं.
 
काही काळ माजिदचं डोकं खूप खूप दुखायचं. डोळे चुरचुरायचे. क्वचित डोळ्यांतून पाणीही यायचं. डोळ्यांखाली काळसर छटाही उगवली होती त्याच्या. त्यावेळी तो खूपच सडी असायचा. त्याला काही म्हणता काही सुचायचंच नाही. जणू एक फेज असायची ती. पण एका टाइम पिरियड नंतर पुन्हा जैसे थे. त्या काळात तो भलतीच उत्साही असायचा. तेव्हा तो निव्वळ भिर भिर भिर भिर भिरभिरायचा, अगदी मनमोहक फुलपाखरूच जणू. त्याला काय करू नि काय नको असं होऊन जायचं. चित्रं काढायचा माजिदला भारी नाद. त्याने मेहनतीने काढलेली अशी चित्रं भलतीच जिवंत वाटायची. ते त्याचं पॅशन होतं. कुठलंही चित्र बघितलं किंवा काही नवीन कल्पना सुचली की ती चटकन कागदावर उतरवल्याशिवाय त्याला चैनच पडायची नाही. आणि चित्र काढतानाची तंद्री! ती तर विचारूच नका. जोपर्यंत चित्र मनासारखं कागदावर उतरत नाही तोपर्यंत तो जणू या जगातच नसायचा. मग अम्मी जेवणासाठी हाका मारतेय किंवा दिदी त्याची खिल्ली उडवतेय किंवा मग अब्बू काही बोलताहेत किंवा कुणी मित्र खेळायला वगैरे बोलावतोय, काही म्हणजे काही त्याच्या कानापर्यंतही पोहोचायचं नाही. एकदा मान खाली गेली की डोक्यातलं मटेरियल हातामार्गे कागदापर्यंत सुखरूप पोहोचोस्तोवर ती काही वर व्हायची नाही. इतकी एकरूपता आताच्या या धावपळीच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. तर या एकतानतेमुळे झालं शेवटी असं की माजिदचं डोकं फारच दुखू लागलं. अब्बूच्या हे लक्षात आल्यावाचून राहिलं नाही. त्याने एकदा हाताने डोकं चेपत बसलेल्या माजिदला पाहिलं अन्  विचारलं, "क्या रे माजू, क्या हुया क्या ? शीर की दबान्लगे ?' 
माजिद म्हणाला, "अब्बू, मेरा शीर लै दुक्ते.' 
"अन् कौशे दुक्ते वू ?',अब्बूने विचारले आणि थुड्डीला बोटांनी उचलत त्याचे डोळेही न्याहाळले तेव्हा त्याला माजिदच्या डोळ्यांखाली उतरलेली काजळीसारखी गोल वर्तुळंही दिसली. 
माजिद म्हणाला, "चार पाच दिनां होय. इ आय्साच हुते अब्बू. लै कतो लै शीर दुक्ता. ऐसा लग्तां जैसा के कोन्तुबी फतरेशे शीरच फोडते जनु.' अन् हे बोलतानाच त्याला काहीतरी भारी सुचलं आणि त्याचे डोळे त्या कल्पनेने चमकले. चेहऱ्यावर सुखाची रेषा उमटली. अब्बूने हे ऐकलं आणि लगेचच ठरवलं की संध्याकाळी शाळेतून परतताना माजूला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे न्यायचंच. 

संध्याकाळी शाळेतून परत येताना अब्बू माजिद आणि दिदीला घेऊन डोळ्यांच्या दवाखान्यात गेला. दवाखान्यात थोडीफार गर्दी होती. नंबर लावून तिथल्या खुर्च्यांवर तिघे बसले. पण या दोघांना शांत थोडेच बसवेल! दोघांचा दंगा सुरू झाला. एकमेकांना मार, आगेमागे पळ, जोरजोरात ओरड तर कुठे काय तर कुठे काय ! अब्बूने "अरे गच्चूप बैटो रे. क्या काल्वा लगायलाय इ ? दवाखाना हय रे पोट्ट्यान्नो, मंडई नैना', म्हणत आपल्या परीने दोघांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला. पण परिणाम शून्य. परंतु अब्बूच्या तोंडची तोडकीमोडकी भाषा ऐकून बाजूलाच नंबर लिहून घेण्यासाठी बसलेल्या बाई मात्र भलत्याच खूष झाल्या. त्यांनी मग अब्बूची नक्कल करण्याचा मोडकातोडका प्रयत्न करत, "सुन्ने आता नाही काय तुमाला पोरांनू ? एकदम शांत बैठो उदर. नै तो डॉक्टरकू बडा इंजेक्शन देने सांगतीव देखो हां', म्हणत दटावलं तेव्हा कुठे दोघे खुर्चीवर गप्प बसले. दिदीची तरीही चुळबूळ सुरू होतीच. परंतु माजिदने आपली सॅॕक उघडून कागद पेन्सिल बाहेर काढली आणि गुपचूप रेषांचं मोहक जाळं विणायला सुरूवात केली. नंबर आल्यानंतर बाईंनी नाव पुकारले तेव्हा माजिद कागदावर शेवटचा हात मारत होता. अब्बूने घाई केली."अरे, चल जल्दी. नंबर आयलाय आप्ला वदेक. उठ उठ.' आणि हे म्हणत असतानाच त्याची माजिदच्या हातातल्या चित्रावर नजर पडली.

डॉक्टरांनी डोळे तपासले. माजिदला चष्मा लागला होता. डॉक्टरांनी प्रोसिजर पूर्ण करत बोलत होते.. "काय ही आजकालची मुलं? टिव्ही, मोबाईल स्क्रीनच्या निळ्या चक्रात अडकलेली. पाच वर्षाच्या मुलांनाही चार डोळे! आम्हांला तर पन्नाशीपर्यंत चष्मा नव्हता. 

अब्बू हसले. म्हणाले, "तुमचं खरंय डॉक्टर. टिव्ही, मोबाईलने फारच अत्याचार केलाय सगळ्यांवरच. खरंतर दोषी आपण मोठेच आहोत. मोठ्यांचं अनुकरण हे लहान जीव करत असतात. पण इथे आमच्या या छोट्याची गोष्ट थोडी वेगळी आहे. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं तसं अब्बूने माजिदला आत्ताचं चित्र डॉक्टरांना दाखवायला सांगितलं. 

त्या चित्रावर नजर पडताच डॉक्टर तीन ताड उडालेच!  बराच वेळ ते चित्र निरखत होते. मग म्हणाले, "शाब्बास बेटा. हे खूपच आतून आलेलं आहे. वाटत नाही इतक्या छोट्याशा मेंदूत एवढ्या घडामोडी घडत असतील असे. तू खूप मोठा होशील.' 

अब्बू म्हणाले, "डॉक्टर, हे प्रकरण वेगळं आहे हे तर तुम्हांला पटलं असेलच. तरीही डोळ्यांची काळजी घ्यायच्या दृष्टीने तुम्ही त्याला काही सुचवा जरूर. कारण एकदा कागद आणि पेन्सिल मिळाली की माजिद आपल्यातच दंग होतो. आपली कल्पना पूर्ण कागदावर उतरेपर्यंत त्याला चैन पडत नाही. आणि हे करताना तो भान हरपतो. अगदी टक लावून डोळे कागदावर रोवलेले असतात त्याचे त्यावेळी. 
डॉक्टरांनी मग डोळ्यांची काळजी घेण्याबाबत त्याला काही सूचना केल्या परंतु अब्बूलाच भान हरपून काम करण्यातल्या आनंदाबाबतचं मोठ्ठं लेक्चर डॉक्टरांकडून ऐकावं लागलं. 

बाहेर पडताना एकीकडे अब्बू विचारात पडला होता तर दुसरीकडे माजिद मात्र भरपूर खूश होता, त्याच्या मनातल्या निराकाराला कागदावर नुक्ताच आकार प्राप्त झाला होता ना ?

लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२