शाळा

इर्शाद बागवान

Apr 02,2019 10:17:00 AM IST

बालवयात कुटुंबाला हातभार म्हणून किशाच्या बापानं त्याला पैसे कमवायला जुंपलं. पण शिकून मोठं होण्यातला आनंद वेळीच किशाच्या लक्षात आला. आणि त्यानं शाळेकडं धूम ठोकली.


तुझी मस्ती उतरवतो थांब,’ म्हणत गजाभाऊने कोपऱ्यात ठेवलेला फोक काढला. बाहेर ओसरीत भरलेल्या बादलीत बुचकळला न् आत येत सपासप सपासप किशाच्या अंगावर एकामागून एक फटके मारू लागला. प्रत्येक फटक्यागणिक किशा’ ये आये, नको, नका मारू, आsss,’ असा आर्त विव्हळत रडू लागला.


किशाचा आवाज कानी पडताच बाहेर दगडावर धुणं धुवत बसलेली यल्ली पळत आली न् किशाच्या अंगावर पडली. त्या धामधुमीत चार फटके तिलाही पडले न् शेवटी हात मध्ये घालत तिने फोक धरून हिसकावला. गजाभाऊ किशाला आणि तिलाही बराच वेळ शिव्या देत होता.

झालं होतं असं, किशाला त्याच्या बापाने, म्हणजेच गजाने आज शाळेला दांडी मारायला लावली होती. नेमकी आजच तोंडी परीक्षा होती म्हणून काल रात्री जागून किशाने इंग्रजीचं सारं पुस्तक उलटंपालटं केलं होतं. एवढी तयारी केलेली अन् सकाळ बाप म्हणतो, गाढवं घिऊन तिकाटण्याव ये. हे काही त्याला रुचलं नव्हतं. त्याने आई, यल्लीमार्फत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण उलट तिलाच एक सणसणीत मुस्कटात खावी लागली. मग तो गुमान गाढवं हाकलत तिकाटण्यावर गेला. तिथे रस्त्याकडेला वाळूचा ढीग होता. तो गाढवांवर लादून आत बोळातल्या बांधकामाच्या जागी रिता करायचा होता. बाप घमेल्याने वाळू टाकत होता, किशाला गाढवाच्या पाठीवरचं पोतं सावरून धरायचं होतं, न् फोक हातात घेऊन दिशा दाखवत, ढोसलत, मारत वेळेत गाढवांची नेआण करायची होती. नऊ वाजल्यापासून हे काम सुरू झालेलं. किशाची चिडचिड झालेली. आधीच रात्रीचं जागरण करून एवढा अभ्यास केलेला अन् आता परीक्षा बुडवून हे काम. पाठीवरचं पोतं सावरून धरत गाढवाकडे बघता बघता त्याला वाटलं, आपणही शेवटी या गाढवासारखेच होणार. शिकणं सुटलं - अन् ते या अशा बापाच्या पुढे किती दिवस टिकून राहतंय काय की! की मग आपल्यात अन् या गाढवात फरक तो काय राहणार? असा विचार चालू असतानाच बापाने पाटी ओतली. किशा आपल्यातच गुंतल्याने पोतं निसटलं आणि भरलेली वाळू खाली सांडली तशी बापाची सण्ण्कन् कानाखाली बसली न् तोंडून शिव्यांचा पट्टा चालू झाला. किशा कळवळला. तरी जरा वेळाने सावरत पोतं नीट धरून उभा राह्यला.
गाल चोळत मुसमुसत गाढवाला हाकलताना किशा विचार करू लागला, आपण असंच राहिलो तर आपलं काही होणार नाही. मार तर असाही खावा लागतोय अन् तसाही. तेव्हा परीक्षा बुडवून मार खाण्यापेक्षा, काम बुडलं तरी चालेल, शिकणं राहता कामा नये. हे मनात ठरल्यावर त्याला हायसं वाटलं. बापाच्या माराच्या भीतीपेक्षा, शिकण्यातला आणि शिकून मोठ्ठं व्हायच्या स्वप्नातला
आनंद कैकपटीने जास्त होता. तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर उतरला. आणि गाढवं बोळात सोडून देत, हातातला फोक भिरकावत किशा शाळेच्या दिशेने धुम् पळत सुटला.


इर्शाद बागवान, सातारा
[email protected]

X
COMMENT