आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हट्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुशराची नजर चौफेर फिरू लागली. वेफर्स, चिप्स, कुरकुरे, मॅगीवरून घरंगळत, बिस्किटं, नानकेट्स्, बर्गर्स, केक्स करत, पेस्ट्री, चॉकलेट्स, लॉलीपॉप, अशी सगळ्या दिखावू झगमगाटावर थांबत, झिरपत, स्थिरावत वाहत शेवटी समोरच्याच काचेपलीकडे ओळीने मांडलेल्या किंडरजॉयवर थबकली. तिच्या नजरेत चमक उठली.

 

"मजे किंडरजॉय हुना कतो हुनाच. किंडरजॉयच लेनाली मइ देको मम्मी, दुस्रा कूssच नक्कोय मजे, हां !', बुशराची गाडीवर बसल्यापासूनच भुणभुण सुरू झाली. ़


मम्मीची सगळी मंडई करून होईतोवर तिच्या तोंडात किंडरजॉयशिवाय दुसरं काही नव्हतं. मम्मीने समजावल्यापुरतं ती थोडावेळ शांत बसायची. मग मम्मीचं भाजी निवडून घेणं, मंडईतलं वातावरण - तिथले व्यापारी, इतर ग्राहक, हिरव्यागार भाज्या, लालेलाल टोमॕटो वगैरे सगळं नीट पाहायची. थोडा वेळ तिला किंडरजॉय विसरल्यासारखं व्हायचं. आजुबाजूचं गोंगाटपूर्ण वातावरणात मिसळल्यासारखी तीही तिथल्या अस्तित्वाला न्याय देत आतून खूश व्हायची. ताजी भाजी हाताळायची. त्याचा वास घेऊन बघायची. फील करायची. पण हे सारं घडलं पहिली फक्त दहा ते पंधरा मिनिटंच. त्यानंतर तिला पुन्हा किंडरजॉय आठवला आणि धोसरा सुरू झाला, "घरकू जाताना आपण किंडरजॉय लेनेका हां मम्मी.' झालं !
"तुजे बूली ना मैंने बुशरा, किंडरजॉय नै कतो नै. येदेक इ ककडी देक तो, केत्ती थंडीगार ताजीताजी हय ना ? लेनेकी आपन तुजे ?...अन् इ केले लेनेके क्या मिठ्ठेमिठ्ठेशाद. तुजे आवडते नां ?' या सगळ्यावर मग बाईसाहेबांची जळजळीत तिखट प्रतिक्रिया म्हणजे, "मजे नको कुच. जाव..फू गट्टी !'
मंडईनंतर गाडी बेकरीच्या दिशेला वळली. सारा रस्ताभर मॅडम शांतच होत्या. फुरंगुटलेल्या. मम्मीनेही मुद्दा विसरायला जरा वेळ जाऊ द्यावा म्हणून गप्प राहायचं ठरवलं. उगा धगीत हात कशाला घाला ? 
बेकरीजवळ आल्यानंतर गाडी पार्क करून चालताना मम्मीने पाहिले, बुशरा रस्त्याकडेच्या छोट्या मंदिराबाहेर बसलेले भिकारी पाहात होती. त्यात दोन छोटी तिच्याएवढी मुलंही होती. त्यांच्या हातात कुणीतरी दिलेल्या शिळ्या भाकरीचे तुकडे होते. ते तुकडे आनंदाने खात ती तिथल्यातिथे आनंदात बागडत होती. एकमेकांशी मजेत खेळत होती. मधूनच कुणी भाविक मंदिरासमोर उभे राहून हात जोडताना दिसला की त्याला, "ओ दादा, ओ दादा' करून मागे उभारून हात पसरत होती. त्यांचे चेहरेच इतके निरागस आणि बेगुनाह होते की त्यांना उसनी लाचारी चेहऱ्यावर आणण्याची काहीही गरज पडत नव्हती. तरी बहुतेकजण त्यांच्याकडे सवयीने किंवा नेहमीच्या अलिप्ततेने दुर्लक्ष करून निघून जात होते. क्वचित कुणी वाईट भाषेत झिडकारतही होते, पण ते तेवढ्यापुरतेच. ती मुलं त्या झिडकारण्यालाही आपल्या रोजच्या जगण्यातला अनिवार्य भाग समजून पाठीवर टाकत पुन्हा हसत होती. त्या भाकरीच्या शिळ्या तुकड्याचा घास घेत मजेत बागडत होती. झिडकारण्यातल्या नेमक्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर आलेले समजुतीचे भाव त्यांना इतक्या बालवयातही आलेल्या पोक्त समजेचे दर्शन देत होते. आणि नेमके याच्या उलट त्यांच्याशी झिडकारून वागणाऱ्या मोठ्या लोकांमधील अपक्व बुद्धीचेही. 
हे पाहत असताना बुशराची पावले थबकली, क्षणभर मम्मीचीही. ती मुले मम्मीजवळही आली. तिने त्यांना मंडईतल्या पिशवीतला काही खाऊ दिला आणि ते बेकरीकडे जाऊ लागले. मम्मी शांत होती. जणू बुशराच्या मेंदूमध्ये आत्ताचा प्रसंग पाहून तयार झालेल्या प्रश्नांच्या सरबत्तीचीच वाट बघत असल्यासारखी. इतक्यात बुशरा सुरूच झाली. 


"मम्मी, इ येत्ते न्हन्ने बच्चान्कू अल्ला खानेकू नै देता व्हय ? इनके मम्मीअब्बू का हय? इनका घर किदर हय? इनकू नवे कपडे नै मिलते व्हय? न्हानेकू नै मिलता व्हय? लोकान्ने झिडकारेतुबी इनकू रोना कैसा नै आता? बाशी रूटी खातानाबी उनो हसते कैसा? एकबी खिलोना नसताना खेलते कैसा? अल्लाकू इनपर रहम कैसा नै आता?....
बेकरीत आल्यावर तिथेच बाजूला घेऊन मम्मीने तिला थोडक्यात समजावले. "एदेक बुशरा, इ दुन्यामें अल्लाने किसकू ज्यादा किसकू कम पैशे देयले असते. पैशेका कूच नै. पन वू हालातमें र्हताना आपन आमाल कैशे करते वू देखता आस्ते आल्ला. सच्चे आमाल, नेक आमाल की झुठ्ठे आमाल. तो आपला काम इ हय के आपन आपली हालातके हिसाबशे र्हनेका. अन् इसका शुकर अदा करते र्हनेका. शुकर अदा कैसा हुइंगा? तो आपलेशे कम दर्जेके, खस्ता हालातमें आचेले लोगान्कू देखनेका. कतो दिलपाश्शे शुकर अदा हुता. आबी देक, तू क्या मंगतीती? किंडरजॉय, हय क्या नै? उस्कू लगनाले चालीस रुपय. तो इ बिचार करनेका, की वूच चालीस रुपयमें इ गरीब बच्चे येकटैमका खानातुबी पेट भरके खाइंगे क्या नै? तो आपला काम हय की आपले हिसाबशे आपलेशे गरीब लोगान्की मदत करते र्हनेकी. अमीरीतरप नै तो गरीबीतरप देखनेका. सम्जी?' मम्मीचं लेक्चर सगळंच काही बुशराच्या डोक्यात आलं नसावं. तसंही ते नीट समजण्याएवढी बुशरा मोठीही नव्हती. परंतु तिच्यापुरतं थोडंफार काही तिच्या झोळीत पडलंच. 


बेकरीत खारी, टोस्ट, बटर, केक, नानकेट, बिस्कीटं, लाडू, गुलाबजाम, कॕडबरीज्, अशा निरनिराळ्या गोष्टींची भरपूर रेलचेल होती. दुकान वस्तूंनी अगदी ओसंडून वाहात होते. बेकरीवाला गिऱ्हाईकांनी मागितलेल्या चीजां अदबशीरपणे देण्यात अगदी मग्न झाला होता. लोकांच्या नजरेतली अजून हवे, अजून हवे ची हाव नीट निरखून बघणाऱ्याला अगदीच स्पष्ट दिसत होती. मम्मीही आपल्याला लागणाऱ्या चीजां घेण्यात गुंतली. बुशराची नजर चौफेर फिरू लागली. वेफर्स, चिप्स, कुरकुरे, मॕगीवरून घरंगळत, बिस्कीटं, नानकेट्स्, बर्गर्स, केक्स् करत, पेस्ट्री, चॉकलेट्स्, लॉलीपॉप, अशी सगळ्या दिखावू झगमगाटावर थांबत, झिरपत, स्थिरावत वाहत शेवटी समोरच्याच काचेपलिकडे ओळीने मांडलेल्या किंडरजॉयवर थबकली. तिच्या नजरेत चमक उठली. क्षणभर.. अगदी क्षणभरच. पुढच्याच क्षणी तिच्या नजरेसमोर ती मंदिराबाहेरची मुलं आली. हातात भाकरीचा शिळा तुकडा घेतलेली... मजेत बागडणारी. तिने प्रयत्नपूर्वक आपली नजर तिथून बाजूला वळवली. आता तिच्या नजरेतली हट्टाची रेषा निवळली होती. नजर अगदी शांत भासत होती. कुठल्याशा निश्चयाने ओतप्रोत भरलेली.  मम्मी दुरूनच हे सारे पाहात होती. तिच्या चेहऱ्यावर  वेगळ्याच समाधानाची लहर उमटली. तिने बुशराला जवळ घेऊन मिठी मारत तिची घट्ट पप्पी घेतली, "मेरा शाना समझदार बच्चा' म्हणत...


लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२

बातम्या आणखी आहेत...