Home | Magazine | Rasik | Irshad Bagwan writes about Endowment

मैय्यत

इर्शाद बागवान | Update - Apr 28, 2019, 12:10 AM IST

मयत कशी असते हे पहिल्यांदाच याची डोळा पाहायला मिळत होतं.

 • Irshad Bagwan writes about Endowment

  मयत कशी असते हे पहिल्यांदाच याची डोळा पाहायला मिळत होतं. त्यातही येणारे जाणारे ‘ये, क्या करती रे तू ह्या? बच्चान्ने नै तडमडनां बडे लोगान्में. चल, उदर भायर जा के खेल', असा दरडावणीयुक्त सल्ला देत. तिकडे दुर्लक्ष करत हटकून जागा धरत गुपचूप बघाबघी चालली होती.

  मध्यरात्री फोन खणखणला. आळसावून अनिच्छेनेच कानाला लावल्यानंतर कादीरभाईंच्या चेहऱ्यावरचा रंग झरझर बदलत गेला. फोन हातून गळून पडला. खडबडून जागे होत स्वतःला प्रयत्नाने सावरून सगळ्यांना जागे करत ती वाईट बातमी त्यांनी सगळ्यांसमोर ठेवली.


  कादीरभाईंची लांबची चुलत बहीण, चाळिशीच्याही आतली, अचानक दगावली होती. घरावर शोककळा पसरली. त्यात गाव लांब असल्याने मयत इथेच, या जुन्या घरी आणायचा निर्णय परस्परच कादीरभाईंच्या मोठ्या भावंडांनी (पैशांनी मोठ्या असलेल्या धेंडांनी) घेतला होता. इथेच सर्व सोपस्कार घडणार होते. पहाटे पहाटेच या बातमीने अख्खं घर जागं झालं.

  छोटी मुले गाढ झोपेत होती. इथे आता तासा-दीड तासात गर्दी व्हायला सुरुवात होणार हे ताडून छोट्या मुलांना शेजारच्या घरात जागा करून झोपेतच हलवण्यात आले. हॉल मोकळा करून चटई - रजई वगैरे अंथरण्यात आली. मध्यरात्रीच्या सुनसान रस्त्यावर उभारून ताटकळत झोप उडालेले बाप्ये गप्पा मारत गाडीची वाट बघत पाय दुखवून घेत उभे राहिले.

  मयत आलं... धांदल... रडारड... पहिला भर... हे सगळं उरकल्यावर घरात रजईवर मयत ठेवण्यात आली. पाण्यासाठी दिवसाउजेडी उठणारी गल्ली या कालव्यामुळे आज तासभर आधीच जागी झाली. कानाफुसी होत बातमी गल्लीत सर्वकर्णी पोहोचती झाली.

  खबर पोहोचत जाईल तसे एकएक पाहुणे सांत्वनाला येऊ लागले. गल्लीतलेही लोकं कानोसा घेत गुपचूप चौकशी करत बातमीला भिडू लागले. खूप जवळचे विशेषतः स्त्रिया आल्यानंतर जोशपूर्ण आकांत उठू लागला. क्षणभरात वडीलधाऱ्या बाप्यांच्या दरडावणीने मुसमुसत शांतही होऊ लागला.

  स्वप्नाळू गोजिरे मस्तीभरे डोळे आजच्या सकाळी शेजारच्या घरात उघडले. पापण्यांची फडफड करत भोवतालाचा अदमास घेत मेंदूची कवाडे धाडधाड वाजवण्यात आली. परिस्थिती लक्षात येऊन एकदाचे भोकांड पसरले गेले. एक कान मुलांना झोपवलेल्या खोलीकडे लावून चाची मुलांवर लक्ष ठेवून होत्या. आवाज ऐकल्यानंतर त्यांनी धावत जाऊन एलिझाला उचलून घेतले,

  ‘अल्ले अल्ले, चूप रे मेरा सुन्ना. मेरी चांदी. मेरा हिरा. शाना ना तू? नै रोते. नै रोते शाने बच्चे. चूप.'
  बेरकी डोळे चाचीवर स्थिरावले. नाकपुड्या फुगल्या. रागाने थरथरल्या. तोंडातून ब्रह्मास्त्र बाहेर पडले,
  ‘मजे ह्या कोन्ने सुलाया सो पैले बोलो.'

  चाची गारद... क्षणभरासाठी गप्प. एवढ्यात हातापायांची जलद हालचाल करून स्वतःला सोडवून घेत बाईसाहेब आपल्या घराकडे पळाल्याही. चाची मागून हाकारत राहिल्या, पण परिणाम शून्य.
  पळत मागच्या दाराने आत शिरत कोणालाही न जुमानत बाईसाहेबांनी थेट हॉलशेजारचा उंबरा गाठला. तिथे कोपरा धरून किलकिल्या डोळ्यांनी निरीक्षण सुरू झाले. मुसमुसती रडारड चालू होती. एखादं कोण आलं की कल्ला व्हायचा. दोन्ही हात गालांवर दाबून धरत डोळे गच्च मिटून, शहारून ऐकत नंतर हळूच डोळे अर्धवट उघडत शांत वातावरणाचा अदमास घेत मयतीचं बारीक निरीक्षण चालू झालं. मयत कशी असते हे पहिल्यांदाच याची डोळा पाहायला मिळत होतं. त्यातही येणारे-जाणारे ‘ये, क्या करती रे तू ह्या? बच्चान्ने नै तडमडनां बडे लोगान्में. चल, उदर भायर जा के खेल', असा दरडावणीयुक्त सल्ला देत. तिकडे दुर्लक्ष करत हटकून जागा धरत गुपचूप बघाबघी चालली होती.

  मयताचा फक्त चेहरा उघडा. बाकी शुभ्र कापडाने संपूर्ण अंग झाकलेलं. ते नीट पाहून झाल्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या मोठ्या दीदीला प्रश्न विचारणे सुरू झाले. ‘दीदी, क्या हुया गे वू फुफ्फून्कू? मरे कतो क्या? का गय उनो? बोलनाले नै वय उनो आबी? आल्लाकने जा के क्या करनाले? जाताना कैसा जानाले? कोन्शे गाडीमेंशे? केत्ते बजे पोचनाले? आल्लाने की मार्या उन्कू? जन्नत कैशी आस्ती? व्हां कोन कोन असता? गाडी आस्ती क्या व्हां येत्ती बडीवाली? अन् आल्ला का आस्ते? उनो क्या काम करते?...' वगैरे वगैरे. दीदी पुरती भंजाळून गेली न् म्हणाली, ‘शूsssक. येकदम शांत बैटनेका.' एवढ्यात पलीकडच्या दारातून मोठ्ठी आज्जी आली न् एलिझाला तिच्या दीदीसकट समजावून बाहेर काढले. ‘जाव भायर. मैय्यत देकते नै न्हन्ने बच्चे. जाव उदर रस्तेपे उंट आयलाय. इ लेव पैशे. चक्कर मारके आव उंटपर्शे. जाव.'
  हिरमुसत तोंड बारीक करून एलिझा अनिच्छेनेच बाहेर आली. तिच्या एवढुशा मेंदूला आत्ताच मृत्यू समजून घ्यायचा होता न् एकूणेक सगळ्या मोठ्या माणसांना नुसती खेळाचीच पडलेली होती.

  इर्शाद बागवान
  [email protected]
  लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२

Trending