आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला रडू दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एव्हाना शाळेबाहेर आणि आतही पहिल्या दिवसाची गर्दी होऊ लागलेली. सारे पालक आपल्या छोट्याछोट्या मुलांना समजावत, गोडीगुलाबीने शाळेत नेऊन वर्गात बसवण्याच्या कामगिरीत मग्न होते. एखाददुसरं "खट' कारटं गाडीवरून अजिबात उतरायचंच नाव न घेता तिथेच ठाण मांडून टिपेच्या चढ्या आवाजात "भोंगा' काढत होतं. साऱ्या बापांचीच जणू सत्त्वपरीक्षा होती आज! त्यांचीच खरी 'शाळा' झाली होती. 

 

"अब्बू, मइ क्या बुली सो तुमना सुनने आते के नै ?'
आपण किरकोळ समजलेल्या भात्यातून हा अग्निबाण सुटलेला पाहून अब्बू चपापले आणि त्यांच्या  तोंडापाशी आलेला घास तोंडाशीच थबकला. झालं होतं असं, की आज शाळेचा पहिला दिवस होता. दिदीची शाळेची तयारी चालली होती आणि बाईसाहेबांनाही आज नव्या शाळेत पहिलं पाऊल ठेवायचं होतं. तेव्हा मम्मी दोघींना तयार करत होती आणि अब्बू नाश्ता करत होते. 
अब्बू म्हणाले, 'क्या हुया बेटी ?'
"मइ विठ्ठलरखमाईके देवलमेंच बैटनाली भलाक्या. दुसरे इस्कूलमें अजिबात जानाली नै.'
"अरे, पन तू बडी हुइलीय ना आबी ? तो देवलमें नै जानेका आबी. आबी बडे इस्कूलमें जानेका. दिदीसारकी बडी इस्कूल हय हमारे गुंजूकीबी. हमारी गुंजू आबी व्हां जानाली. हय क्या नै ?'
"नै नै नै ! दिदीसारकी नै. दिदीकीच. दिदीकीच इस्कूलमें जानाली मइ. नैतो देवलमें. समझमें आया ?'
आता अब्बू सरसावून बसले. हे प्रकरण त्रासदायक होऊ घातलंय याची अब्बूला नीटच कल्पना आली. ते पुढे म्हणाले,
"अरे पन तुजे मालूमंय क्या, वू केत्तीकेत्ती भारी इस्कूल हय सो ? व्हां खिलौने हय, मस्त मस्त छोऱ्या हय, बाईतो केत्ते आच्चे हय मालूमंय ? उनो गाने बोलते, डान्स करते, ढोल बजाते, हौर हौर कतो, साssरे बच्चान्कू क्या देते मालूम ?...कॕडबरी ! येत्ती बडीक्बडी कॕडबरी देते. आपन व्हाच जानेका हां.'
नाही म्हणता ही एवढीसारी प्रलोभने कानावर पडता बाईसाहेबांच्या चेहऱ्यावरची एखाददुसरी आठी थोडीफार सैल झाल्यासारखी वाटली अब्बूला. पण, पण हा त्याचा भ्रमच होता. 
"नै नै नै कतो नै. मजे देवलमेंच जानेका हय. हय बोलेतो ह य.'
आता यांवर काय बोलणार! तरी अब्बूने थोडंफार इकडतिकडच्या गप्पा मारून ती जिद्दीची वेळ मारून नेली. 
शाळेला सोडायला आज मम्मी आणि दिदीही होत्या. गाडीवरून सगळे शाळेपर्यंत पोहोचले. मॕडमनी शाळा दुरूनच नजरेवर तोलली आणि पापण्यांवरून झटकन जणू आख्खी शाळाच झटकून देत म्हणाल्या,
"अब्बू, तुम्नां बुलीती ना मइने, देवलमें जानेकाय कर्के. मइ यो इस्कूलमें जा ना ली न ई.'
आता पुन्हा समजावणीची वेळ आली. 
एव्हाना शाळेबाहेर आणि आतही पहिल्या दिवसाची गर्दी होऊ लागलेली. सारे पालक आपल्या छोट्याछोट्या मुलांना समजावत, गोडीगुलाबीने शाळेत नेऊन वर्गात बसवण्याच्या कामगिरीत मग्न होते. एखाददुसरं "खट' कारटं गाडीवरून अजिबात उतरायचंच नाव न घेता तिथेच ठाण मांडून टिपेच्या चढ्या आवाजात "भोंगा' काढत होतं. साऱ्या बापांचीच जणू सत्त्वपरीक्षा होती आज! त्यांचीच खरी 'शाळा' झाली होती. 
अब्बूने समजावत गुंजूला शाळेत आणलं. तर तिथेही तीच गत. पाटावर ओळीने मुलंमुली बसलेली होती आणि त्यांतल्या निम्म्यांची तरी आपापल्या सुरांत मग्न कीर्तने लागली होती. शाळेतल्या बाई आपल्या कुवतीनूसार कधी दरडावत, कधी प्रेमाने जवळ घेत, खाऊ देत मुलांना शांत करायचा निष्फळ प्रयत्न करत होत्या. दुसऱ्या बाई पालकांना नम्रपणे बाहेरचा रस्ता दाखवत होत्या. तर तिसऱ्या बाई हातात 'छळ्ळ छळ्ळ छळ्ळ' वाजणारी डफली घेऊन एकीकडे मुलांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत तर दुसरीकडे त्या मंडईसदृश गोंगाटात उलट अधिकची भरच टाकत होत्या. 
गुंजूला पुढेच खाली बसवत अब्बूही तिच्या बाजूला क्षणभर बसले. म्हणाले, 
"मेरा शाना बच्चा. इस्कूलमें बैटनाला. बाई उस्कू खाख्खा देनाले, हत्ती न् मुंगीकी, सशेकी न् कासवकी, परीकी, बागकी कहानी बोलनाले, गाना बोलनाले, मस्त मस्त डान्स करनाले. देख, केत्तेसारे दोस्तां हय गुंजूके. सबसंगात दोस्ती करनेकी, हां? मइ अन् मम्मी ह्याच हय भायर बैटेले. थोडी देर बैटनेका अन् डब्बा खा के घरकू जानेका. हुय्या !'
या कॕसेटच्या उत्तरादाखल गुंजूनेही आपलं भोकांड पसरलं आणि आधीच्याच गोंगाटात आपलंही अधिकचं दान टाकलं. आता मम्मीची समजावण्याची बारी. 
अब्बू थोडा बाजूला होत सभोवताल टिपू लागला. त्याला "ते' पोरगं नजरेस पडलं. तेच ते, जे गुंजूबरोबर देवळातल्या शाळेत गेल्यावर्षी बसायचं. त्याची आई त्याला बरोब्बर अकराच्या ठोक्याला शाळेत सोडून कामावर निघून जायची. तू बस, बसू नको, रड, काय घालायचा तो धिंगाणा घाल. मी निघाले. असं. आणि तोही जणू आई आणि बाई यांचा विरोध कृतीतून करत असल्यासारखा असा वरच्या सूरात रडायचा की आख्खं देऊळ दुमदुमून जायचं. आणि तेही नॉन- स्टाॕप ! अकरा ते एक हे दोन तास फक्त रडू रडू अन् रडूच. अब्बूने इथेही पाहिलं. त्याच्यात किंचितही बदल झालेला नव्हता. इथेही तीच गत होती. बाईंनी समजावल्यानंतर हळूहळू आख्खा वर्ग शांत झाला होता पण हा आपल्यातच मग्न, रडतच होता. कुणालाही न जुमानता.  मम्मी गुंजूला समजावत होती तोवर अब्बूने मग हळूच बाहेरची वाट धरली. मम्मीही मग गुपचूप बाहेर आली. थोडा वेळ गुंजूचा रडण्याचा आवाज येत होता. 
दुपारी आणायला गेलेल्या अब्बूला गुंजूच्या नखशिखान्त जाळून टाकणाऱ्या नजरेचा अगोदर सामना करावा लागला. त्यानंतर फुरंगुटून ‘मेरेसंगात बात करू नको अजिबात. ग ट्टी.' अशी धमकीही मिळाली. पण येताना आइस्क्रीमचं दुकान बघितल्यानंतर रागाचा फुगा निसटून दूर आकाशात भुर्र उडाला अन् गोग्गोड हसू ओठांमागून लपतछपत बाहेर आलं. अस्सल जिवंतपणाचं. निरागस. 


लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२

बातम्या आणखी आहेत...