आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरखण्यातला आनंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारक्याचे लक्ष त्या माशांकडे गेले. तो जवळ जाऊन त्या प्रत्येक माशाकडे निरखून पाहू लागला. चकचकीत निमुळते खवल्याखवल्यांचे अंग आणि उघडे निर्जीव डोळे. ते डोळे तो बराच वेळ हरवून जात एकटक पाहत राहिला. जरा वेळाने मग हळूच हात लावून बारक्या बारक्या बोटांनी माशाला स्पर्श करून ते थंडगार अंग अनुभवात जमा करू लागला.

 

जाव्या - अकल्या, रैशा - इर्फ्या, शारख्या - चैत्या, पत्या - सिद्धू अशा चार जोड्या चार सायकली काढून डबलसीट टांग मारून तयार होत्या. आजचा प्रोग्रम लईच सिक्रेट होता. गुपचूप एकेक सायकल हळूच काढून रस्त्यावर आणली गेली. जोडीदार स्थानापन्न झाले. पँडल फिरू लागले तशी इर्फ्याने जोर लावूनही सायकल स्पीड पकडेना. तेव्हा इर्फ्याने सायकल थांबवून वळून पाहिले तर रैशाचा शर्ट धरून बारक्या अंगात असेलनसेल तेवढा जोर लावून मागे ओढत होता. त्याच्या तोंडातून ‘मइबी आनाला, मइबी आनाला'चा एकच धोशा चालू होता. मनासारखे भटकायला, फक्त खेळायला अनुकूल असा सुटीचा काळ आला होता आणि आता ऐन निघतेवेळी बारक्या आडवा आलेला. 


रैशा सायकलवरून उतरला. त्याने बारक्याला लाडाने समजावले. ऐकत नाही बघून पोकळ ढोसही देऊन झाला. बारक्याचा एकच गजर, “मइबी आनाला, मइबी आनाला.' या रखडारखडीने इर्फ्याही वैतागला. त्याने खिशातून रुपया काढला. बारक्याच्या हातात बळेच कोंबत रैशाकडे बघून लटका राग दाखवत तो म्हणाला, ‘बारक्या लै शाना बच्चाय. रैशा, तुजे आजिबात समस्ताच नै देक. इ ले रे बारक्या. तुजे क्या हुना वू खाख्खा ले हां. जा दिकू. हामें लगीच आते भला क्या?' बारक्याने अंगार फुललेल्या डोळ्यांनी इर्फ्याकडे पाहिले. हातातल्या रुपयाकडे पाहिले आणि छाती भरून श्वास घेऊन सोडत त्याने रुपया बाजूच्या गटारीत रागात भिरकावला. रैशाचा शर्ट धरून पुन्हा गजर सुरू झाला, ‘भैया, मइबी आनाला, मइबी आनाला, मजेबी लिजाव, मजेबी लिजाव.'
आता मात्र रैशा खूप वैतागला. पण एवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. त्याने इर्फ्याला डोळा मारला न् इशाऱ्यानेे सायकल पुढे न्यायला खुणावले. जरा सायकल पुढे गेली तसा बारक्याच्या हातून शर्ट सोडवून पळत जाऊन रैशाने सायकलवर टांग मारली. इर्फ्या तयारच होता. रैशा बसला तसे त्याने होतानव्हता तेवढा सगळा जोर लावून वेगात पँडल मारायला सुरुवात केली. बारक्या रडतरडत सायकलच्या मागे पळत सुटला. शक्य तितक्या वेगाने. पण इर्फ्याने हुशारीने त्याला मागे टाकले आणि ती टोळी पसार झाली. बारक्याने बराच वेळ, अगदी बारीक होत होत नजरेपासून ओझल होईतो सायकलचा पाठलाग केला. शेवटी सायकल समोरून गायब झाल्यानंतरच त्याचे बारकेबारके पाय थकून थांबले. चड्डी सावरून कमरेतून वर ओढत गुडघ्यांवर पंजे टेकून त्याने थोडा दम खाल्ला. घामाघूम झालेल्या केसांमधून हात फिरवला. मागे वळून पाहिले. घर बरेच लांब राहिले होते. पळण्याच्या नादात आपण बरेच लांब आलो याची बारक्याला जाणीव झाली. त्याचा चेहरा आणखीनच रडवेला होऊ लागला. आणि इतक्यात त्याची नजर समोरच्या डेरेदार वडाच्या पारावर पडली. पारावर म्हातारीकोतारी मंडळी गप्पांचा फड जमवून बसलेली होती. पाराला वेढा टाकून चप्पल शिवणारे, पॉलिश करणारे, मडकी डेरे विकणारे यांच्याबरोबरच एका कोपऱ्यात नदीचे ताजे मासे विकणाराही बसला होता. त्याच्यासमोर एका आयताकृती लाकडी चौरंगावर मासे ओळीने मांडले होते. बारक्याचे लक्ष त्या माशांकडे गेले. तो जवळ जाऊन त्या प्रत्येक माशाकडे निरखून पाहू लागला. चकचकीत निमुळते खवल्याखवल्यांचे अंग आणि उघडे निर्जीव डोळे. ते डोळे तो बराच वेळ हरवून जात एकटक पाहत राहिला. जरा वेळाने मग हळूच हात लावून बारक्या बारक्या बोटांनी माशाला स्पर्श करून ते थंडगार अंग अनुभवात जमा करू लागला.  


मासेवाल्याचे लक्ष गेले तसा तो म्हणाला, ‘क्या रे छोरे, तुजे मच्ची लै आवडती? जिंदा मच्ची दिखाऊ क्या तुजे?’
बारक्या हरखून म्हणाला, ‘दिताव तो जी चाचा.'
मासेवाल्याने आपल्या मागचे गोलाकार पारदर्शी पात्र बारक्यासमोर धरले न् म्हणाला, “एदेक.'
बारक्या आता ते चमचमणारे आणि वळवळत फिरणारे चिंगळे जीव पाहण्यात अजूनच रंगून गेला. त्यांच्या हालचाली मन लावून निरखताना बारक्याच्या चित्तवृत्ती फुलारून आल्या. मनात सगळीकडे फक्त आनंदीआनंद पसरला. इतका की काही वेळापूर्वी रैशाभैयाने केलेली आपली फसगत तो पार विसरून गेला. 
एवढ्यात पारावरच्या गणीभाईंनी त्याला पाहिले. ते म्हणाले, ‘तू पिंजारी के शकीलकाच ना रे छोरे? अन् येत्ते लंबा एकलाच कैकू रे आयास? चल भाग दिकू घरकू.'


हे शब्द कानावर पडताच बारक्याला आपले घर आठवले आणि झटकन पिछेमूड करत तो घराच्या दिशेने धूम पळत सुटला, रैशाभैयाने गंडवल्यामुळे पाहायला मिळालेल्या चकचकीत चलाख माशांचा गोड किस्सा आपल्या बोबड्या बोलीत अम्मीला रंगवून सांगण्यासाठी.

इर्शाद बागवान 
bagwan.irshad13.ib89@gmail.com

 लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२
 

बातम्या आणखी आहेत...