आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज त्याच्या लाडकीचा पहिला रोजा होता आणि तिच्या आवडीचे सारे पदार्थ इफ्तारीच्या दस्तरख्वानवर त्याला सजवायचे होते. सोबत रंगीबेरंगी फुलांचा हार आणि गुलाबगुच्छही आणायचा होता, तिचं मनाजोगं कौतुक करण्यासाठी.

 

"रोजा सब्र शिकाता आप्लेकू. आपनकतो हर बातमें पैदाईशी बेसब्रे हय. सो यो बेसब्रापन कम करना इ शिकनेका रोजेशे. नुसता भुक्काप्यासा रहके कुच फायदा नै, क्या सम्जी ?

 

चड्डी-बनियन या उन्हाळी लिबासवरूनच गडबडीने मखनी ओढत बाईसाहेब झरझर पायऱ्या चढून गच्चीवर आल्या. आज गल्लीतली देशपांडे काकूंची गच्ची मुसलमान बालबच्चांनी अगदी हाऊसफुल्ल झाली होती. नुसता कलकलाट उडालेला. आज चाँदरात होती,  रमजानचा महिना सुरू झाल्याचा इशारा. आजूबाजूची एकूणएक चिल्लीपिल्ली एकत्र जमून एकमेकांच्या अंगाखांद्यावर हात देऊन एकदुसऱ्याला ओढून डोकावत चाँद पाहण्याची शिकस्त करीत होती. पलीकडे बायकाही होत्याच आणि दूर सगळ्यांच्या मागे आरामखुर्चीत रेलून लक्ष ठेवत, मधूनच आडगेल मुलांना खर्जातल्या आवाजात दरडावून शांत करत असलेल्या देशपांडे काकूही. एखादीला चाँद दिसला की मग ती उत्साहात, "वदेक वदेक व्हां, वू तारके उप्पर, डोंगरान्के बीचमें, झाडके पैलीवर' असं बोट उंचावून दुसऱ्यांना दाखवून, नीट निरखून पाहत दोन्ही हातांची बोटे चुंबून, डोळ्यांना लावत चेहऱ्यावर फिरवी... चेहऱ्यावर अतीव आनंद.

 


दुसऱ्या दिवशी पहिला रोजा. रात्रीच झोपताना दादीला दहादा सांगून झाले, "दादी, मजे रोजेकू उठानेका हां, देक हां. यादशे.' दादीही मग लाडात येऊन, "हो गे मेरी शानी बेटी, उठाती हां. सो आबी' म्हणाली. भल्या पहाटे आख्खं घर जागं झालेलं. लहान्यांच्या किलबिलाटाने मोठेही सगळे डोळे चोळत उठून बसलेले. त्यानंतर दादीबरोबर वुजू झाली. दस्तरख्वान अंथरले गेले. नाष्ट्याच्या वस्तू, चहा, नानकेट वगैरे सगळं बातर्तीब "बिस्मिल्लाह व आला बरकतिल्लाह'ने सुरू करून सफाचटही झालं. मग दादीने थोडा वेळ इकडेतिकडे केलं. तोपर्यंत एकमेकांशी मस्तीही झाली. मग पोटभर "पानी'ही पिऊन झालं. आता रोजेकी निय्यत पढायची वेळ झाली. दादीने मारियाला अगोदरच समजावलं, "तू निय्यत पढू नकोस आब्बीच. दुपेरकू पढाती तुजे मइ, हां ?' शहाण्या बाळाप्रमाणे दादीची आज्ञा तिने ऐकली. त्यानंतर दादीने पुढे आणि तिच्यामागे बाकी सगळ्यांनी, अशी निय्यत केली गेली आणि सगळे आपापल्या कामात, नमाजीत, आन्हिकांत, झोपण्यात वगैरे तितरबितर झाले.

 


दुपार झाली... सकाळपासून दुपारपर्यंत मारियाला हजार सूचना करून झाल्या. धूप में खेलू नकोस, येक जागी बैटके खेल, प्यास लगिंगी. भागाभागी करू नकोस, लै वरडके बोलू नकोस, टीव्ही नै देकना, मोबाइल नै देकना, गंदी बात नै करना, गाल्या नै देना वगैरे वगैरे. दुपारपर्यंत ठीकठाक होतं. दुपारी एक झोप झाल्यानंतर मारियाचा चेहरा कमालीचा उतरला. ओठ सुकलेले. तहान लागलेली. दादीने विचारलं, "की गे, प्यास लगी ना लै ?' मारिया क्षणभर चाचपडली. तरी धीर एकवटून म्हणाली, "लगीया प्यास, पन मइ आज्जिबात कतो आज्जिबात नै पिनाली आब्बी पानी. शाम तक नै कतो नैच पिनाली भला क्या दादी.' आणि सुकलेल्या ओठांवरून तिने जीभ फिरवली. दादीला खूप कौतुक वाटले. तिने मायाळू हसऱ्या चेहऱ्याने मारियाकडे बघत, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत कनवटीला कडाकडा बोटे मोडली. मग काहीसं मनात ठरवत दादी म्हणाली, "चलो, फिर पढनेकी निय्यत आबी?' मारिया जोरात म्हणाली, "हां दादी.' निय्यत पढून झाल्यानंतर वुजू करून दादीसह जुहरची नमाज पढून झाली. मग दादीसारखीच हाती तसबीह घेऊन दादीच्या मार्गदर्शनात एकेक जिक्रही करून झाले. मग थोडा वेळ बैठे खेळ. खेळात मारियाचं लक्ष लागत नव्हतं, तरीही मन गुंतवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत राहिली. उन्हाचा कहर आणि अशात पाणी न...एकूण संयमाची कठोर परीक्षाच की ! मोठी माणसंही हैरानपरेशान तिथे छोट्यांची काय पत्रास ! संध्याकाळी असरच्या नमाजनंतर तर मारिया फारच मलूल झाली... थकली. शांतशांत गप्पगार. अब्बूच्या लक्षात ही गोष्ट येताच त्याची तगमगतगमग झाली. त्याने तिला बाजूला घेऊन हळूच पाणी अॉफर केले. म्हणाला, "येले, गुच्चूप पी... पी जल्दी, कोन नै देकता तौतक. आपला दोनों का सिक्रेट, हां ? ले, ले जल्दी. पी तो.' मारिया विचारात पडली. मग ठामपणे म्हणाली, "अब्बू, पन पन अल्ला देकता आचिंगाच ना ? मजे नै तोडनेका रोजा. मेरा पैला रोजा. मइ पूरा निभानाली.' 

 

अब्बूच्या डोळ्यांतून पानी तरळले. त्याने मारियाला घट्ट मिठीत घेऊन तिचे भरपूर पापे घेतले आणि इफ्तारीच्या तयारीला लागला. आज त्याच्या लाडकीचा पहिला रोजा होता आणि तिच्या आवडीचे सारे पदार्थ इफ्तारीच्या दस्तरख्वानवर त्याला सजवायचे होते. सोबत रंगीबेरंगी फुलांचा हार आणि गुलाबगुच्छही आणायचा होता, तिचं मनाजोगं कौतुक करण्यासाठी. रोजा इफ्तार झाल्यानंतर अब्बूने मारियाला बाजूला घेतले आणि म्हणाला, "बच्चे, तुने रोजा तो भौत आच्चा निभायी, पन पन एक बात तेरे समझ में आयी क्या? मारिया म्हणाली, "कोंची ओ अब्बू ?' अब्बूने उलट विचारले, रोजे का मक्सद क्या हय सो सम्जा तुजे?’ यावर मारियाचा गोंधळलेला चेहरा पाहून तो म्हणाला, "रोजा सब्र शिकाता आप्लेकू. आपनकतो हर बातमें पैदाईशी बेसब्रे हय. सो यो बेसब्रापन कम करना इ शिकनेका रोजेशे. नुसता भुक्काप्यासा रहके कुच फायदा नै, क्या सम्जी ?' यावर मारिया खुद्कन हसली आणि ते निरागस हसू पाहून अब्बूच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

 

इर्शाद बागवान 
bagwan.irshad13.ib89@gmail.com
लेखकाचा संपर्क - ९७६२८२१०८२

 

बातम्या आणखी आहेत...