आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरशाद : ज़िंदगी धूप तुम घना साया...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसुंधरा काशीकर

एखाद्या निवांत क्षणी आपल्या बायकोला जवळ बसवून, तिचा हात हातात घेऊन ही गझल ऐका... तिला म्हणा, ‘ही तुझ्यासाठी आहे...’ पुढचे कष्टाचे हजार डोंगर ती सहजपणे उचलेल... तुमच्यासाठी..! तसंही कृतज्ञतेइतकी सुंदर गोष्ट या जगात दुसरी नाही..!


‘साथ साथ’ या १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातली ज्येष्ठ शायर, गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी लिहिलेली ही गझल! अतिशय साध्या-सोप्या शब्दांत किती सुंदर आणि नेमकं व्यक्त होता येतं, याचा ही गझल म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. जावेद अख़्तर यांच्या क़लमची हीच खरी ताकद आणि हेच खरं सौंदर्य. ‘जश्न-ए-रेख़्ता’ या दिल्लीतील महोत्सवात त्यांना ऐकता आलं. त्यावेळी ते प्रत्येक ठिकाणी कठीण शब्द सोपा करुन सांगत होते. श्रोत्यांना शायरीतला दडलेला अर्थ समजावा ही त्यांची तळमळ खूपच भावली. 

ज्या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर जावेद साहेबांनी ही गझल लिहिली आहे, ती समजून घेणे महत्वाचे आहे. अविनाश हा तडफदार, आदर्शवादाने भारलेला, मूल्यांशी बांधिलकी असलेला तरुण करिअरमध्ये स्ट्रगलर आहे. गीता ही संपन्न घरातील मुलगी त्याच्या प्रेमात पडते. जीवनाच्या संघर्षात होरपळून निघत असलेल्या अविनाशने गीतासाठी म्हटलेली ही गझल! ‘तुमको देखा तो ये ख़्याल आया... ज़िंदगी धूप तुम घना साया...’ प्रियकर-प्रेयसी, मित्र-मैत्रीण, दोन मित्र वा मैत्रिणी, गुरू-शिष्य किंवा अगदी परमेश्वरावर विश्वास असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा ही गझल लागू होऊ शकते.  तुमच्यावर निरपेक्ष, निर्हेतूक, अकारण प्रेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी ही गझल  आहे. मग त्या अर्थाने ती आईसाठी तर सर्वांत जास्त लागू आहे. प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचा एक शेर आठवतोय...

सख्त राहों में आसान सफर लगता है  

ये मेरी माँ की दुआओं का असर लगता है ।
ज्या ज्या स्त्रियांनी त्यांच्या नवऱ्याला अशी भक्कम साथ जीवनात, संसारात दिली आहे, त्या सर्वांना ही गझल लागू पडते. अनेक वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रात छापून आलेला फोटो मला आठवतो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई यांचं निधन झालं होतं. तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी बाळासाहेबांचा मीनाताईंच्या चेहऱ्यावर शेवटचे हात फिरवतानाचा तो विलक्षण भावुक फोटो होता. त्या फोटोखालची कॅप्शनही मला जशीच्या तशी आठवतेय... ‘आणि बाळासाहेबांनी आपल्या सावलीला अखेरचा स्नेहस्पर्श केला..’  त्या वेळी त्यांच्या मनातही हेच आलं असेल का...

तुम चले जाओगे तो सोचेंगे 

हम ने क्या खोया हमने क्या पाया ।
जगण्याच्या प्रचंड गतीमध्ये सोबतच्या माणसाचं असणं किती महत्वाचं आहे, त्याची साथ किती मोलाची आहे, हे अनेकदा लक्षात येत नाही, जाणवत नाही. अचानक ती व्यक्ती आयुष्यातनं निघून जाते, तेव्हा कळतं की आपण काय गमावलंय... ही व्यक्ती अबोलपणे, आपलं अस्तित्वही न जाणवू देता आपल्यासाठी किती करत होती.. हिने किती खस्ता खाल्ल्या... रजनीश यांनी एखाद्याच्या मृत्यूनंतर लोक रडतात, त्याचं यथार्थ विश्लेषण केलं आहे. ते म्हणतात, कोणाच्या मृत्यूनंतरचं लोकांचं रडणं हे दु:खापेक्षा पश्चात्तापातून आलेलं असतं. कळत-नकळत झालेला अन्याय, न केलेलं कर्तव्य आणि राहून गेलेल्या गोष्टी यांतून आलेला अपराधीभाव आणि पश्चात्तापाचे ते अश्रू असतात. नात्याला संपूर्ण न्याय दिलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात कदाचित अश्रू येणारही नाहीत...आज परत मनात एक इच्छा निर्माण झाली. आणि आम्हाला आधीपासूनच माहित होतं ही इच्छा काही पूर्ण होणार नाहीये.. म्हणून परत एकदा आम्हीच आमच्या मनाची समजूत काढली. ‘आज फिर दिलको हमने समझाया..’ कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, अशी दु:खं वा संकटं आपल्या वाट्याला येतील... पण, काळाची (अव)कृपा की अशा प्रसंगांना सामोरं जावं लागलं..  असं का झालं असेल बरं..? वक्त ने ऐसा गीत क्यूँ गाया...

ही गझल गैरमुसलसल प्रकारातली आहे. गैरमुसलसल म्हणजे, जिच्यात वेगवेगळ्या विषयांवर शेर येतात ती गझल. उर्दूमध्ये अशाच गझलांचं प्रमाण जास्त आहे. या गझलेतही पहिला आणि तिसरा शेर अर्थाच्या दृष्टीने परस्परांशी संबंधित नाही. जगजीत सिंग यांना ज्या गझलांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली, त्यातली ही एक आहे. जगजीत यांचा कोणताही कार्यक्रम या गझलेशिवाय पूर्ण होत नसे आणि त्यांनी सुरूवातीचं हमिंग म्हणून ‘ज़िंदगी धूप...’ असं म्हटलं की जो टाळ्यांचा कडकडाट व्हायचा, त्यातून माहोल आणखीनच भावविभोर होत असे. सुदैवानं हे मला अनुभवता आलं... कुलदीप सिंग यांचं संगीत असलेली ही गझल ऐकताना जगजीत-चित्राचं आधीचं हमिंग जरूर ऐका. या गझलेतलं सिग्नेचर इन्स्ट्रूमेंट म्हणजे बासरी.. तीही कमालीची श्रवणीय आहे. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये या गझलेतील ‘तुम चले जाओगे तो सोचेंगे’ हा शेर म्हणताना जगजीत चित्राजींकडे इतकं सुंदर नि अर्थपूर्ण बघायचे... उनका वो देखना देखने के लिए ये ग़ज़ल सुनो और देखो... 

आणखी एक जरूर करा.. एखाद्या निवांत क्षणी आपल्या बायकोला जवळ बसवून, तिचा हात हातात घेऊन ही गझल ऐका... तिला म्हणा, ‘ही तुझ्यासाठी आहे...’ पुढचे कष्टाचे हजार डोंगर ती सहजपणे उचलेल... तुमच्यासाठी... तसंही कृतज्ञतेइतकी सुंदर गोष्ट या जगात दुसरी नाही..!

बातम्या आणखी आहेत...