आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - महाराष्ट्रात सीएए लागू नाही करायला यांच्या बापाचे राज्य आहे का असे खळबळजनक विधान भाजप नेते आशीष शेलार यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार नाही असे जाहीर केले. सीएए आणि एनआरसीने मुस्लिमांसारखेच हिंदूंना सुद्धा नागरिकत्व सिद्ध करणे कठिण जाणार आहे असेही सरकारने नोंदवले आहे. त्यावरच भाजपने ही वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख
मुंबईतील नालासोपाऱ्यात एका कार्यक्रमामध्ये बोलताना आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. सीएएच्या मुद्द्यावर ठाकरेंवर टीका करताना शेलार म्हणाले, "हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?" एवढेच नव्हे, तर शिवसेनेवर सुद्धा शेलार यांनी घणाघात केला आहे. "शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल." ते पुढे म्हणाले, "नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या कायद्यांविरोधात मुस्लिम समाजाच्या तरुण विद्यार्थ्यांनी मुंबईत एक आंदोलन उभे केले आहे. काही दिवसांपूर्वी एका युवा नेत्याने गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलनात सहभागी घेतला होता. त्यावेळी फक्त सरकारविरोधीच नव्हे, तर देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनस्थळी राष्ट्रवादीचे नेते गेले आणि त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोण? गृह मंत्री कुणाचे? असे असतानाही राज्यात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठा कट रचला जात आहे आणि हा कट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आजूबाजूला फिरत आहे." असा गंभीर आरोप आशीष शेलार यांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.