आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या परळीतील सभेच्या सुरक्षा व्यवस्थेत ‘इस्रायल’चे पथक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमोल मुळे 

बीड - पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ ऑक्टोबर रोजी परळीत प्रचार सभा घेणार आहेत.पंतप्रधानांच्या या दौऱ्याची सध्या प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असून विशेषत: सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिस विभाग तयारी करत आहे. मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत इस्रायलहून खास ५ जणांचे पथक परळीत दाखल होत आहे. शिवाय, पोलिस दलातील विविध शाखांचे राज्यस्तरावरील प्रमुख अधिकारीही बीडमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आयजी रवींद्र सिंगल, एसपी हर्ष पोद्दार यांनी सोमवारी परळीत जाऊन बंदोबस्ताच्या सूचना दिल्या आहेत. 

 विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांच्या वतीने प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. मोठ मोठाले नेते प्रचारात उतरल्याने निवडणुकांत रंगत आली आहे. आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडत आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुमारे दहा सभा होणार आहेत. यात बीड जिल्ह्यात परळीत १७ ऑक्टोबर रोजी  मोदींची सभा होत आहे. पंतप्रधानांची सभा म्हटले की त्यांची सुरक्षा व्यवस्था, त्यांचे राजशिष्टाचार पाळणे महत्वाचे त्यात प्रचार सभा म्हणजे कुणी विरोधकांनी गोंधळ घालू नये यासाठी सुरक्षा यंत्रणांना विशेष काळजी घ्यावी लागते. सध्या यासाठी पोलिस प्रशासन सध्या बंदोबस्ताची तयारी करत आहे. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार पोद्दार हे यासाठी परळीत तळ ठोकून आहेत. 

दरम्यान, अत्युच्च सुरक्षा असलेल्या पंतप्रधानांच्या ताफ्यात बुलेटप्रूफ कारचा समावेश तर असणार आहेच मात्र, सभास्थळी सुरक्षेसाठी खास इस्रायलहून पाच जणांचे विशेष पथक सुरक्षा व्यवस्थेत असणार आहे. हे पथक मोदी येण्यापूर्वीच दोन दिवस आधी  परळीत दाखल होणार असून सर्व परिसराची पाहणी करणार आहे. प्रामुख्याने ड्राेन विरोधी काम करण्याची जबाबदारी या पथकाची असणार असल्याचे सांगण्यात आले. 
 

पथकाची बडदास्त 
थेट इस्रायलहून येणारे हे पथक  विमानाने औरंगाबादेत येणार असून तिथून त्यांना पोलिस दलाने विशेष वाहनाची व्यवस्था केली आहे. या वाहनाने ते परळीत पोहोचतील. त्यांच्या मदतीला दुभाषी म्हणून पोलिस कर्मचारी दिले आहेत. शिवाय त्यांना सभास्थळी टेंट, इन्व्हर्टर यासह इतर आवश्यक साहित्य पुरवण्याच्या सूचना आहेत. 
 

आयजी, एसपी तळ ठोकून
सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कसर राहू नये यासाठी आयजी रवींद्र सिंगल, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार परळीत तळ ठोकून आहेत. सभा स्थळाला तीन दिवस आधीपासूनच सुरक्षा देण्यात येत आहे. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरुन यासाठी बंदोबस्त मागवण्यात आला आहे. अपर अधीक्षक विजय कबाडे, अपर अधीक्षक स्वाती भाेर, उपअधीक्षक राहुल धस हेसुद्धा बंदोबस्त प्रक्रियेत बारीक बारीक बाबींवर काम करत आहेत.
 
 

अॅन्टी ड्रोन पथक
महाराष्ट्र पोलिसांनी हे इस्रायलचे पथक सुरक्षा व्यवस्थेत सहभागी करून घेतले आहे. मुख्यतः सभा परिसरात येणाऱ्या ड्रोनबाबत हे पथक काम करेल अशी माहिती आहे. याबाबतचे पत्र वरिष्ठ कार्यालयाकडून आले अाहे. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही यासाठी सध्या सुरक्षेची तयारी केली जात आहे.
- हर्ष पोद्दार, पोलिस अधीक्षक ,बीड