आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISRO Chandrayaan 2: सर्वच तांत्रिक अडथळे दूर, आता 22 जुलैला लॉन्च होणार भारताची चंद्र मोहिम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) ने चंद्रयान-2 चे लॉन्चिंग पुढील आठवड्यात होणार असल्याचे जाहीर केले आहे. इस्रोने जारी केलेल्या माहितीनुसार, 22 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी भारताची दुसरी चंद्र मोहिम अंतराळात झेपावणार आहे. या मोहिमेचे प्रक्षेपण 15 जुलै रोजी रात्री 2 वाजून 51 मिनिटांनी निश्चित करण्यात आले होते. परंतु, काउंटडाऊनला अवघे काही मिनिटे शिल्लक असताना मोहिम पुढे ढकलण्यात आली. संशोधकांनी ही मोहिम टाळण्यासाठी वेहिकलमध्ये आलेला तांत्रिक बिघाडाचे कारण दिले होते. त्या सर्वच समस्या आता दूर करण्यात आल्याचे इस्रोच्या जनसंपर्क विभागाचे सहाय्यक संचालक बीआर गुरुप्रसाद यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

 

चंद्रयान-2 चे वजन 3,877 किलो
चंद्रयान-2 भारताच्या सर्वात शक्तीशाली रॉकेट जीएसएलवी मार्क-III ने लॉन्च केले जाणार आहे. या रॉकेटमध्ये तीन मॉड्यूल ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) असतील. या मोहिमेच्या माध्यमातून इस्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अर्थात डार्क साइडवर लँडर उतरवणार आहे. यावेळी चंद्रयान-2 चे वजन 3,877 किलो राहील. ही मोहिम चंद्रयान एकच्या तुलनेत तीन पटीने वजनी आहे. लँडरमध्ये असलेल्या रोव्हरचा वेग प्रति सेकंद एक सेंटिमिटर राहील.

 

ऑक्टोबर 2018 मध्ये देखील पुढे ढकलले चंद्रयान-2 चे लॉन्चिंग
इस्रोने चंद्रयान-2 ऑक्टोबरमध्येच लॉन्च करण्याचे ठरवले होते. परंतु, यानंतर तारीख पुढे ढकलून 3 जानेवारी आणि नंतर 31 जानेवारी 2019 करण्यात आली. यानंतर तज्ज्ञांनी त्यास 15 जुलै रोजी प्रक्षेपित करणार असल्याचे ठरवले. यावेळी जीएसएलवी मार्क-3 मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्याने पुन्हा प्रक्षेपण टाळण्यात आले होते.