पहिल्या निवडणुकीपासूनच प्रचारात / पहिल्या निवडणुकीपासूनच प्रचारात गाजतोय शेतकऱ्यांचा मुद्दा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव  

बाबा आढाव  

Jan 29,2019 10:10:00 AM IST

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पुण्यात नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या. केवळ घरमालकांनाच मतदानाचा हक्क होता. उमेदवार घरावर नोटांची पताका लावून मतदानाचा भाव दाखवत आकर्षित करत होते. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये पहिल्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले. नंतर प्रादेशिक अस्मितांनी जोर धरला. पूर्ण बहुमत न देता, विरोधकांचीही प्रमुख भूमिका राहील, याकडे लक्ष देण्याचे काम दाखवत मतदारांनी प्रगल्भतेचे दर्शन घडवले आहे. अगदी पहिल्या निवडणुकीपासूनच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रचार केला जायचा.


१९४८ मध्ये काँग्रेसमधून शेतकरी कामगार पक्ष, सोशालिस्ट पार्टी, डाव्या संघटना वेगळ्या झाल्या. मी सोशालिस्ट पार्टीच्या प्रचारात सहभागी होतो. सायकल वा पायीच बहुतांश प्रचार व्हायचा. कार्यकर्ते गोळा करण्यासाठी दवंडी देणे, सायकलला भोंगा लावून फिरणे, पत्रके वाटणे, काव किंवा कार्बोइडने भिंतीवर उमेदवारांची माहिती लिहिणे अशा गोष्टी केल्या जात होत्या.

लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत पुण्यातून काँग्रेसच नरहरी विष्णू गाडगीळ, सोशालिस्ट पार्टीकडून एस.एम.जोशी, केशवराव जेधे रिंगणात उतरले. पहिली लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्रितच झाली. दोन्हींत काँग्रेसला बहुमत मिळाले. पराभूत एस.एम.जोशींना जनतेने दोनच वर्षात १९५४ मध्ये विधानसभेवर निवडून दिले. जनता कशी अंकुश ठेवते, हे निवडणुकीत अनुभवयास मिळाले. महागाई, भाववाढ, दुष्काळ, शेतकरी प्रश्न हे प्रचाराचे मुद्दे त्या काळीही कळीचे होते.

१९५२ मधील पहिल्या लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेस सत्तेत आली. १९६० मध्ये महाराष्ट्र स्वतंत्र झाला. १९६२ ते ६७ या काळात देशपातळीवर काँग्रेस हटावचा नारा देत प्रादेशिक पक्षांनी राज्याराज्यात उभारी घेतली होती. १९६७ च्या निवडणुकीत गैरकाँग्रेसी सरकार सत्तेवर येऊ लागले. केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, काश्मीर, आेडिशात प्रादेशिक पक्षांना बहुमत मिळाल्याने काँग्रेस पक्ष अडचणीत आला होता.. यानंतर आघाड्यांची सद्दी सुरू झाली आणि देशातील राजकारणाची दिशा पालटली.

दोन वेळा अपयश, पण डिपॉझिट वाचवले
हमाल-कष्टकरी, धरण आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर मी काम करत होतो. यामुळे सोशालिस्ट पक्षातर्फे १९६७ मध्ये मला खेडमधून प्रथमच उमेदवारी मिळाली. निवडणूक चिन्ह झोपडी होते. विरोधात काँग्रेसचे रघुनाथ खाडिलकर होते. दुसरी निवडणूक १९७१ मध्ये लढवली. त्या वेळी माझे चिन्ह झाडू होते. अनंतराव कोळोखे प्रतिस्पर्धी होते. दोन्ही निवडणुकांत मला जिंकता आले नाही. मात्र, डिपॉझिट गमावले नाही. सत्ताधारी काँग्रेसकडे प्रचाराची मोठी यंत्रणा होती. आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करत. आता मात्र प्रचंड बदल झाला आहे. अमाप पैसे खर्च केले जातात. यात केंद्रस्थानी मतदार आहे की नाही, असाच प्रश्न पडतो.

X
COMMENT