मधुमेहातही खा भरपेट / मधुमेहातही खा भरपेट भात, ‘तळोधी रेड राइस’ ठरेल उपयुक्त

अतुल पेठकर

Nov 09,2018 08:48:00 AM IST

नागपूर - भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. शरद पवार यांनी ईशान्य भारतातील धानाचा स्थानिक जातीशी नैसर्गिक संकर करून ‘तळोधी रेड राइस’ ही नवी जात विकसित केली आहे. हा लाल तांदूळ त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मामुळे कर्करोगासारख्या आजारांवरही उपयोगी सिद्ध होत आहे. शिवाय, मधुमेह, हृदय विकारसारख्या आजारात भात खाणे सोडावे लागते, मात्र, लाल तांदळामुळे भात खाणे सोडावे लागत नाही. त्यामुळे डॉक्टरदेखील लाल तांदळाची शिफारस करीत असल्याची माहिती डाॅ. शरद पवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.


ईशान्य भारतातून (शिलाँग) येथून १५ वर्षांपूर्वी आणलेला तांदूळ उशिरा म्हणजे १६० ते १७० दिवसात परिपक्व होत असे. तसेच दाणा जाड असल्यामुळे शेतकरी लागवड करण्यास उत्सुक नव्हते. डाॅ. शरद पवार यांनी नैसर्गिक संकरातून तळोधी रेड राइस ही नवी जात विकसित केली. ही जात १२५ ते १३० दिवस कालावधीत येते. तांदळाची लांबी ७.८० आणि जाडी १.३० मिलिमीटर असते. सुपर फाइन लांब दाण्याचा रेड राइस सुवासिक असल्याचे डाॅ. पवार यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी अण्णासाहेब पोशेट्टीवार यांच्या शेतीवर डाॅ. शरद पवार यांचे प्रयोग सुरू असतात. धानाच्या नवीन जाती शोधणे व शुद्ध बिजाईची निर्मिती ही दोन महत्त्वाची कामे ते करीत आहेत. विदर्भातील उष्ण वातावरणात चांगले उत्पन्न देणाऱ्या जाती शोधण्यावर त्यांच्या संशोधनाचा भर आहे. बाजारातून घेतलेल्या बीजात भेसळ असते व त्याचा परिणाम तांदळाच्या गुणवत्तेवर होतो, हे चित्र बदलण्यासाठी शुद्ध बीजाईची निर्मिती हे उद्देश त्यांनी ठरवले. अण्णासाहेब पोशट्टीवार यांनी त्यांच्या शेताचा ६ एकराचा पट्टा प्रयोगशाळा म्हणून उपयोगात आणण्यासाठी दिला.

अशी असते नव्या जातीची प्रक्रिया
बाहेरून आणलेली किंवा प्रयोगशाळेत उन्नत केलेली जात पहिल्यांदा लागवडीखाली येते तेव्हा त्यास न्यूक्लीअर प्लॉट म्हणतात, त्यातून चांगल्या बियाण्याची निवड केली जाते. त्यात दुसऱ्या बियाण्यांचा संकर होऊ नये म्हणून लोम्बीला टोपीही घातली जाते. त्यानंतर ब्रीडर प्लॉट, मग फाॅउंडेशन प्लॉट असा चढता क्रम असतो. या सगळ्या प्रक्रियेतून बीज शेतकऱ्यांपर्यंत पोहाेचायला ५ वर्षे लागतात.

असा शिजवा रेड राइस
एक कप रेड राइस धुऊन पाण्यात भिजवून ठेवावा. तीन कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये ५ ते ६ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यावा. स्वादिष्ट व रुचकर भात तयार होतो. इलेक्ट्रिक राइस कुकरमध्ये २५ ते ३० मिनिटांत भात तयार होतो. यापासून पुलाव, इडली, पुडिंग, खीर, दोसा आदी पदार्थ तयार करता येतात.

असे अाहेत रेड राइसचे फायदे : लो-ग्लायसेमिक इंडेक्समुळे डायबेटिस व हार्ट पेशंटसाठी उपयुक्त आहे. मॅग्निजमुळे मेटाबाॅलिझम वाढते, कॅल्शियम, झिंक व आयर्नमुळे हाडे व दात मजबूत होतात. याशिवाय संधिवात व आॅस्टिओ आर्थराइटिसपासून बचाव होतो. सेलेनियममुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. तसेच ‘व्हिटॅमिन-बी’मुळे नर्व्ह सिस्टिम सुधारते. भरपूर फायबर असल्यामुळे पचन संस्था उत्तम काम करते तसेच यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, अशी माहिती डाॅ. पवार यांनी दिली.

X
COMMENT