आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीमा भागातील उचगाव मराठी साहित्य अकादमीने आयोजित केलेले साहित्य संमेलन बेळगाव येथे नुकतेच झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध लेखक प्रा. मिलिंद जोशी या संमेलनाचे अध्यक्ष होते. समाजात निर्भय, निकोप वातावरण निर्माण करण्याचे भान राज्यकर्त्यांना राहिलेले नाही. त्याचे स्मरण करून देणे, ही साहित्यिकांची जबाबदारी आहे, असे मत त्यांनी मांडले. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश...
महाराष्ट्राच्या सीमा भागात होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहताना एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू अशा मनोवस्थेत मी उभा आहे. अश्रू अशासाठी आहेत, की गेली साठ वर्षे आपण सीमा लढा देत आहोत. मात्र, राजकीय इच्छाशक्ती दुबळी असल्यामुळेच केंद्र सरकारला हा प्रश्न सोडवता आला नाही. या लढ्यात जे एकशे पाच हुतात्मे झाले, त्यात या परिसरातले शेतकरी, कामगार होते. त्यांच्या प्राणाचे काहीच मोल नाही का? आपल्याला न्यायालयात निश्चित न्याय मिळेल, असा मला विश्वास आहे. न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि या भागातील मराठीजन यांनी परस्परांत समन्वय आणि संवाद ठेवला पाहिजे. महाराष्ट्रातील साहित्यिक आणि विचारवंत आजवर सीमावासीयांसोबत होते, यापुढेही ठामपणे राहतील. समाधान याचे आहे की, या भागात होणाऱ्या संमेलनांनी लढ्याला नेहमीच बळ दिले आहे. आपण सीमावासीय मराठी भाषेचे सीमेवरचे रक्षक आहोत. आपल्यामुळेच या भागात मराठी भाषा आणि संस्कृती टिकून आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आपण मराठीचा झेंडा डौलाने फडकत ठेवला आहे.
साहित्य संमेलन हा मराठी समाजाचा वाङ्मयीन उत्सव आहे. अन्नामुळे माणसाच्या शरीराचे भरणपोषण होते. कसदार साहित्यामुळे माणसाचे भावनिक आणि वैचारिक भरणपोषण होते. तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपल्याला केवळ यंत्रमानव तयार करायचे नाहीत. ज्यांच्या डोळ्यांत अश्रू येऊ शकतात, तेच इतरांचे अश्रू पुसू शकतात. अशी हाडामांसाची संवेदनशील जिवंत माणसे घडवायची असतील तर तंत्रज्ञानाच्या जोडीला जगण्याचे तत्त्वज्ञानही हवे. माणसाची विवेकशक्ती जागृत करणाऱ्या साहित्यामुळेच समाजाच्या नैतिक आणि भौतिक जीवनातील दरी कमी होऊ शकते. एके काळी साहित्यनिर्मितीचा केंद्रबिंदू पुण्या-मुंबईतच होता. आज सर्व विभागातले आणि आर्थिक स्तरातले लोक लिहू लागले आहेत. अनुभवसंपन्नतेमुळे त्यांचे साहित्य मुख्य प्रवाहात महत्त्वाचे ठरत आहे. चाकोरीबाहेरचे अनुभव साहित्यात येत आहेत. एकसुरी लेखनामुळे आणि मर्यादित अनुभवविश्वामुळे साहित्याला आलेले साचलेपण दूर झाले आहे. या लेखकांच्या प्रयोगशीलतेमुळे रचनेचे नवे घाट निर्माण होत आहेत. समाजमाध्यमांमुळे साहित्याचे लोकशाहीकरण झाल्यामुळे अभिव्यक्ती घडत आहे. मानव्याची प्रतिष्ठापना हेच त्यांच्या लेखनाचे ध्येय असावे. 'पवित्र मजला आणिक गहिवर माणुसकीचा' हाच त्यांचा सूर असावा. त्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे अधिष्ठान असावे एवढीच अपेक्षा. लेखन ही केवळ शब्दांची आतषबाजी नाही, ती जीवनाची उपासना आहे. पोकळ शब्दांना काहीच अर्थ नसतो. शब्दांमागे लेखकाला प्रतिभेचं, अनुभवाचं आणि साधनेचं संचित उभं करावं लागतं. तेव्हाच शब्दांना अर्थगांभीर्य प्राप्त होतं.
एकारलेपणाच्या मानसिकतेमुळे ज्ञानक्षेत्राची आणि विचारक्षेत्राची आज अपरिमित हानी होताना दिसते आहे. समाजात ज्ञानसत्तेचा दरारा दिवसेंदिवस कमी होतो आहे. समाजातील बुद्धिवंतांना न्यूनगंडाने आणि भयगंडाने पछाडले आहे. आपल्या सत्त्वाच्या बळावर आपण वाटचाल करू शकणार नाही याचा न्यूनगंड आणि आपण व्यवस्थेशी जुळवून घेतले नाही तर आपले काय होणार, याचा भयगंड. त्यामुळे चुकीचे घडत असतानाही विचारवंत मूग गिळून गप्प आहेत. हे समाजासाठी आणि देशासाठी घातक आहे. विचारवंतांची कृतिशून्यता आणि कृतिवीरांची विचारशून्यता या दोन्ही गोष्टी समाजासाठी घातक आहेत. पंथाभिमान, स्वमतांधता आणि अनर्थकारी धर्मवेड या गोष्टी देशालाच नव्हे तर जगाला विनाशाकडे नेणाऱ्या आहेत. आज ज्ञानाचे क्षेत्र गढूळ झाले आहे. या क्षेत्राला व्यक्ती आणि विचारविद्वेषाच्या ग्रहणाने ग्रासले आहे. आजच्या समाजातले सर्व विषय भावनिक आणि अकारण संवेदनशील झाले आहेत. 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता।।' हा तुकोबांचा बाणा अंगी बाणवण्याचे सामर्थ्य आज किती विचारवंतांत राहिले आहे? साहित्यिक, कलावंत, संशोधक, पत्रकार आपल्या लेखनातून, कलाकृतीतून आणि संशोधनातून सत्याचाच शोध घेत असतात. सत्याला कोणताही रंग नसतो. सत्य कोणतीही बाजू घेत नाही. सत्याच्या पाठीशी बहुमत कधीच नसते. ते नेहमीच अल्पमतात असते. तरीही सत्याचे मोल कधीही कमी होत नाही. सत्य मांडण्यासाठीचे निर्भय आणि निकोप वातावरण समाजात निर्माण करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असते. तिचे भान राज्यकर्त्यांना राहिलेले नाही. राज्यकर्त्यांना त्याचे स्मरण करून देणे ही साहित्यिक, कलावंत, विचारवंत, संशोधक, पत्रकार यांची जबाबदारी आहे.
वाचनाची सक्ती करून वाचनसंस्कृती विकसित होत नाही. समाजाला साहित्याभिमुख करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. वडीलधारी माणसे आणि शिक्षक वाचताना दिसले तरच पुढची पिढी वाचणार आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक आहे. आपली भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी आपल्यातली 'मराठीपणाची' ज्योत तेवत ठेवणे महत्त्वाचे आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदने प्रथम मनात उमटतात, नंतर ती उच्चारातून आणि कृतीतून प्रकटतात. आपले भाषाप्रेम आंतरिक जाणिवांतून प्रकट होत राहिले तर भाषा आणि संस्कृती कधीच मरणार नाही.
शब्दांकन : जयश्री बोकील, पुणे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.