आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथर्डी : कोणत्याही गोष्टीची नक्कल होत नसते. भगवानबाबांसारखे संत पुन्हा होणार नाहीत, भगवानगडासारखा दुसरा गड होणे शक्य नाही. गड कोणी, कोठे उभारावा यासाठी शहाणपण लागते. प्रत्येक भाविकाच्या हृदयात भगवानगड आहे, अशा शब्दांत भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
पंकजा मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधिस्थळाला गोपीनाथगड असे नाव दिले. तेथे स्वतंत्र कार्यक्रम सुरू करून महंतांच्या भाषणबंदीच्या फतव्यानंतर भगवानगडावर येणे बंद केले. सावरगाव येथे दसरा मेळावा सुरू करून भगवानगडावरील दसरा मेळावा दुय्यम केला. त्यातून निर्माण झालेली खदखद त्यांनी बोलून दाखवली.
श्रीक्षेत्र भगवानगड येथे संत भगवानबाबांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाधी पूजन, दिंडी प्रदक्षिणा, गादी पूजन, गड प्रदक्षिणा आदी कार्यक्रमानंतर महंतांचे कीर्तन झाले. या वेळी ते म्हणाले, जगात चांगले काय चालले ते समजण्यासाठी भाग्य लागते. चांगल्याच्या मागे धावता-धावता कधीकधी बुद्धिमान माणसेसुद्धा स्वतःचे वाटोळे करून घेतात. देवापेक्षा संतांना श्रेष्ठ समजले जात असले, तरी जवळची मंडळी संतांना त्रास देतात. अशा अपमानाचा बदला भाविक घेतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ही महाराष्ट्राची जननी आहे. ज्ञानेश्वरांआधी बहुजन समाजात संत झाला नाही. बोलण्यातून समाज घडवण्यापेक्षा कृतीतून समाज घडवला जावा. गेल्या पाच वर्षांपासून गडासाठी वर्गणी बंद झाली असली, तरी ज्या गडाचे कामकाज सुरळीत सुरू आहे त्याचे नाव भगवानगड आहे. येत्या काळात गडावर संत ज्ञानेश्वरांचे भव्य मंदिर बांधले जाणार असून त्यानंतर भगवानबाबांच्या समाधी
मंदिराचे काम हाती घेतले जाईल, असे शास्त्रींनी सांगितले.
गडावर फक्त कीर्तनाचा आवाज : दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी गडाला भेट दिली. त्यामुळे गडावर पुन्हा राजकीय भाषणे सुरू होणार अशी चर्चा परिसरात सुरू झाली. अशा अफवांचे महाराजांनी खंडन केले. राजकारणमुक्त झाल्याने गडावर शांतता आहे. यापुढे गडावर फक्त कीर्तनाचा आवाज येईल, कुठलेही राजकारण होणार नाही. देशात माहीत नाही, पण अशा निर्णयामुळे भगवानगडाला अच्छे दिन आल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबादहून हजारो भाविक भगवानगडावर
भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या पुढाकाराने औरंगाबाद ते भगवानगड अशा पायी दिंडीमधून हजारो भाविक गडावर दाखल झाले. बाबांच्या प्रतिमेची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. सकाळपासूनच दर्शन रांगा सुरू होत्या. ऊस तोडणीसाठी गेलेले कामगारसुद्धा दर्शनासाठी आवर्जून आले होते. यावर्षीपासून विविध गावांहून पायी दिंड्या येण्याचे प्रमाण वाढले. भाविकांना महाप्रसादाचे वाटप ट्रॅक्टर ट्रॉलीतून करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.