आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही चाहूल आहे... तिला केवळ घटना मानू नका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र भटनागर

जेएनयूमध्ये हिंसा. अमेरिकेची इराणविरुद्ध अघोषित युद्धाची तयारी. पाकिस्तानातील नानकाना साहिबवर हल्ला. गुजरात, राजस्थानातील रुग्णालयांमधून बालकांच्या मृत्यूचे धडाधड येणारे आकडे. अर्थव्यवस्थेचे वाढत चाललेले आचके. हे सगळे मथळे आहेत. वृत्तपत्रांचे, वृत्तवाहिन्यांचे. २०२० चा प्रारंभ करणारा आठवडा त्यांच्याच भोवती फिरत होता. त्यांच्यावरच चर्चा आणि वादही झाले. पण, ही फक्त बातम्यांची शीर्षकेच आहेत? केवळ घटना आहेत, ज्या घडल्या आणि विषय संपला! नाही. ही चाहूल आहे, काहीशी ऐकू आल्या-न आल्यासारखी. त्या फक्त घटना आहेत म्हणून आपण स्वस्थ राहू शकत नाही. हे आघात आपल्या जीवन स्तरावर परिणाम करणारे आहेत. आपल्या आशा- आकांक्षा आणि स्वप्नांना चिरडताहेत. आश्चर्य याचे आहे, की या अशा घटना आहेत, ज्यासाठी कुणा एकाला जबाबदार धरता येत नाही. त्या व्यक्तिकेंद्रित नव्हे, तर विचार आणि व्यवस्थाकेंद्रित आहेत. समूह, संस्था, संघटना, सरकारांकडून केले जाणारे प्रहार आहेत, ज्यांचा थेट आणि जोरदार मार वेचून वेचून एकेका माणसावर पडतो आहे.

जेएनयूमध्ये ज्या तऱ्हेने तोंड झाकून गुंड घुसले आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींना रक्तबंबाळ केले, ज्याप्रकारे पोलिस मूक प्रेक्षक बनले, ज्या पद्धतीने जेएनयूच्या समर्थनार्थ आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांसह देशभरातील विद्यापीठांत, कॅम्पसमध्ये विद्यार्थी एकजूट झाले, ते अत्यंत धोकादायक संकेत देणारे आहे. यामध्ये फक्त जेएनयू बदनाम होत नाहीय. तमाम शिक्षण संस्थांमध्ये संताप, तणाव आणि अराजकाचे वातावरण निर्माण होत असल्याचे त्यातून दिसत आहे. दुसरी घटना लहान मुलांच्या मृत्यूशी संबंधित आहे. हा विषय केवळ गुजरात वा राजस्थानचा नाही. देशभरातील रुग्णालयांमध्ये दरवर्षी ८ ते ९ लाख मुले जन्मानंतर महिनाभरात मृत्युमुखी पडतात. लाखो-कोटींच्या योजनांनंतरही निरागस बालकांना वाचवण्यात यश येत नाही. चंद्र- मंगळाला स्पर्श करण्यापेक्षा या निष्पापांचा मृत्यू रोखणे जास्त महत्वाचे आहे. मंदिर, काश्मीरही तेव्हाच मन:शांती देतील, जेव्हा घरांच्या अंगणात मुलांचा चिवचिवाट असेल. शिक्षण आणि आरोग्यच कशाला? अर्थव्यवस्थाही उद्ध्वस्त होते आहे. अमेरिकेच्या युद्धज्वराने जगापुढे संकट उभे केले आहे. आपण दररोज अशा कोणत्या ना कोणत्या दुर्घटनेचा बळी ठरतो आहोत. त्यातून मार्ग काढणारा कुठला रस्ता, गल्ल्या नाहीत. ज्या गल्ल्या आहेत त्या धुडगूस घालणाऱ्यांनी, दगडफेक करणाऱ्यांनी, वाहने जाळणाऱ्यांनी भरलेल्या आहेत. नवे वर्ष नवी उमेद घेऊन येते, पण जे सुरू आहे त्यामुळे निराशाच वाढली आहे. कशा थांबतील या घटना? कसे आयुष्यात पुन्हा अच्छे दिन येतील? कशी दूर होईल निराशा? सारे प्रश्न आपल्यावर परिणाम घडवत असतील, तर त्यांची उत्तरे आम्हालाच शोधावी लागतील.

देवेंद्र भटनागर, स्टेट एडिटर दिव्य भास्कर, गुजरात
 

बातम्या आणखी आहेत...