आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळ आहे त्यालाही काही सांगायची...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदार जोशी 


महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना तुम्हाला-आम्हाला नवीन नाहीत. दररोजचं वर्तमानपत्र अशा पद्धतीच्या एकाही बातमीशिवाय जणू पूर्णच होत नाही. पण आपण करतो काय? पीडितेचा अगदीच जीव गेलेला असेल तर बातमी वाचतो. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी फॉलोअपचीही वाट पाहतो. हळहळतो. खेद व्यक्त करतो. आणि नंतर शांत बसतो.  फार फार तर घरातल्या आया-बहिणींना चार सूचना देऊन कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मिळवतो. पण हे असं कुठवर चालणार? याला काही अंत आहे का नाही? केवळ मेणबत्त्या लावून निषेधापुरतं किती दिवस मर्यादित राहायचं? या आणि यासारख्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी, कायमस्वरूपी उपायाच्या शोधात दिव्य मराठीनं अभियान सुरू केलंय. त्या विचार मंचावर व्यक्त झालेल्या मान्यवरांच्या मतांचा हा मथितार्थ
...

उदाहरण १ - तो सहावीत होता, कायम गोंधळ घालणारा आणि हट्ट करणारा रोहित (नाव बदलले आहे) अचानक शांत झाला. कोपऱ्यात बसून मोबाइलवर चोरून चोरून काहीतरी पाहायला लागला. आईच्या ही गोष्ट लक्षात आली. अवघ्या ११-१२ वर्षांचा मुलगा अश्लील क्लिप पाहत होता. आईने त्याची ही सवय मोडण्याचा प्रयत्न सुरू केला. आई शिक्षिका असल्यामुळे ते तिला सहज शक्य झाले. रोहित इयत्ता आठवीत गेल्यानंतर त्याला आईने ‘सेक्स’ हा शब्द नेमका काय आहे, हे समजून सांगितले. अायुष्यात प्रत्येक जण मोठा होतो. वेळ आल्यानंतर ही गोष्ट प्रत्येकाच्या वाट्याला येते. त्यातून प्रजनननिर्मिती कशी होते, हे सगळं समजावून सांगितले. त्यानंतर पूर्वीसारखा रोहित कुटुंबाला मिळाला. आता हा प्रसंग सांगताना रोहितची आई स्वाभिमानाने सांगते की, मी समाजाला एका वासनाधीन तरुणापासून वाचवले. 

उदाहरण २ - मेट्रो सिटीत राहणारा अनमोल (नाव बदलले आहे) बारावीत बोर्डात आला. अचानक त्याची वागणूक बदलली तो एकटा राहू लागला. मला आत्महत्या करावीशी वाटते आहे, असे कुटुंबीयांना सांगू लागला. त्याच्या या वागण्यामुळे घरातील वातावरण एकदम बदलले. हसते-खेळते कुटुंब तणावात राहू लागले. कोणीतरी समुपदेशकाकडे जाण्याचा सल्ला दिला. काउन्सेलरने अनमोलला एकांतात बोलते केले आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला. मला हस्तमैथुन करण्याची सवय लागली आहे. हे करताना माझ्या जवळच्या नातेवाईक महिलांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर येतात. माझं आणि त्यांचं नातं काय? आणि हे मी काय करतोय? हे करणे म्हणजे मला गुन्हा वाटतो. यासाठी मी मला कधीही माफ करू शकणार नाही. म्हणून मला या जगात राहायचे नाही. काउन्सेलरने कुटुंबीयांची मदत घेऊन त्याला विश्वासात घेतले. वयात येणाऱ्या या भावना आहेत आणि त्यातूनच होणारा हा प्रकार आहे. त्यातून कसे दूर व्हायचे याचेही मार्ग सांगितले. त्यानंतर मात्र अनमोल मोकळा झाला. 

उदाहरण ३ - गजबजलेल्या बाजारपेठेतील एक साडीचे दुकान. दुकानाच्या मालकिणीसह सगळ्या सेल्समनदेखील महिलाच. साधारण एक ३५ ते ४० वर्षे वयाचा पुरुष हा त्याच्या बायकोसोबत दुकानात आला. बायको साडी घेण्यात गुंग असतानाच हा पुरुष मात्र अगदी वखवखलेल्या नजरेने दुकानातल्या महिला सेल्समनकडे पाहत होता. त्याची ही नजर सेल्समनने कदाचित ओळखली असेल आणि मनात प्रचंड राग, द्वेष आणि चीड असूनही त्याकडे दुर्लक्ष केले. कदाचित या वखवखलेल्या नजरांची आणि या हपापलेल्या पुरुषी वृत्तीची तिला सवय झाली असावी. 

समाजात महिलांवर अत्याचाराच्या घटना समोर आल्यावरच त्यांची चर्चा होते. पीडिता कशी चुकीची आहे, तिच्या बिनधास्तपणामुळेच हे संकट तिच्यावर ओढवले आहे, असे अनेक निष्कर्ष काढले जातात. मात्र ज्या पुरुषी वृत्तीतून हा प्रकार घडतो त्याचा विचार कधीच होत नाही. मागच्या आठवड्यात  हैदराबादलाही अशीच अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर चर्चा सुरू झाल्या. देशभरात आंदोलनं सुरू झाली. या सगळ्या गोष्टींचे वार्तांकन करताना एक गोष्ट जाणवली की, आता त्याला काहीतरी सांगायची वेळ आली आहे. वरचे तीन प्रसंग याच चर्चेत सहभागी झालेल्यांनी कथन केले. 

‘स्मार्ट बॉय’का नको?

शाळांमध्ये ‘स्मार्ट गर्ल’ हा उपक्रम राबवला जातो. मात्र वयात येणाऱ्या मुलांसाठी समुपदेशनाचे प्रयत्न तुरळकच पाहायला मिळतात. त्यामुळे इंटरनेट आणि मोबाइलच्या युगात हव्यासापोटी जे माझ्यापासून लपवले जाते ते मला कळलेच पाहिजे या हट्टापोटी मिळेल तिथून मिळेल तशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न या टीनेजर्सकडून होताना दिसतो. डोळ्यांना दिसते ते प्रत्यक्षात करायचे ही हाव डोक्यावर आणि मनावर कधी ताबा घेते हे कळतही नाही. अशाच वेळी बाबा रे, आयुष्याच्या एका टप्प्यावर हे सगळं तुला मिळणार आहे. ‘थोडा धीर धर’ असं सांगणारा किंवा सांगणारी व्यक्ती जर मिळाली तर कदाचित वासनाधीन आणि हपापलेल्या नजरांपासून हा समाज मुक्त होईल. त्यामुळे या गोष्टींचा बाऊ न करता, त्यावर संस्कृती आणि संस्कारांचा आव न आणता ज्याप्रमाणे मराठीतील व्याकरण, गणितातील प्रमेये, विज्ञानातील सूत्रे आणि नागरिकशास्त्रातील कर्तव्ये जितक्या सहजपणे शाळांमध्ये आणि घरांमध्ये शिकवली जातात, तेवढ्याच साध्या पद्धतीने वयात येतानाचे बदल मुलांना सांगायची वेळ आली आहे.