आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधवांच्या राजीनाम्याची हरिभाऊ बागडेंनाच घाई!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन युतीत प्रवेशाची अनेकांना घाई लागली आहे. पण शुक्रवारी एक अजब दृश्य औरंगाबादेत पाहण्यास मिळाले. अामदारकीचा राजीनामा देण्यासाठी आलेल्या भास्कर जाधव यांच्यापेक्षा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना त्यांचा राजीनामा स्वीकारण्याची घाई दिसून अाली. कारण केवळ दहा मिनिटांचा उशीर नको म्हणून बागडेंनी चक्क चारचाकीतून उतरून दुचाकीवर प्रवास केला. पण नंतर हा प्रवास राजीनामा घेण्यासाठी नव्हे तर बीडच्या नियोजित कामांचे वेळापत्रक बिघडू नये, म्हणून केल्याची सारवासारव भाजपतर्फे करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांना शुक्रवारी दुपारी शिवसेनेत प्रवेश करायचा हाेता. तत्पूर्वी त्यांना अामदारकीचा राजीनामा द्यायचा हाेता. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी विशेष विमान पाठवले. या वेळी जाधवांसाेबत आमदार अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, प्रवक्ते अनिल परबही होते. सकाळी ९ वाजता विमान औरंगाबाद विमानतळावर उतरल्यावर बागडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा ते त्यांच्या फुलंब्री मतदारसंघात उद्घाटन कार्यक्रमात होते. त्यांनी जाधव यांना 'कुंभेफळला या, मी तेथे पोहोचतो,' असा निरोप दिला. त्यानुसार जाधव आणि इतर मंडळी कुंभेफळ येथे भाजप तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके यांच्या कार्यालयात जाऊन थांबली. दरम्यान, चारचाकीतून ताफ्यासह बागडे निघाले. पण कुंभेफळ येथे रेल्वे फाटक बंद होते. फाटकापासून शेळके यांचे कार्यालय जेमतेम ३०० मीटर अंतरावर आहे. दहा मिनिटांत फाटक उघडेल, असे बागडे यांना सांगण्यात आले. पण तेवढाही वेळ न दवडता बागडे चारचाकीतून उतरले. गेटजवळ पलीकडल्या बाजूने उभ्या असलेल्या एका दुचाकीस्वाराच्या मागे बसले आणि शेळकेंच्या कार्यालयात पोहोचले. अर्धा तास जाधव यांच्याशी चर्चा केली. राजीनामा लिहून घेतला. त्यावर मंजूर अशी नोंद केली आणि ते पुन्हा पुढील कार्यक्रमासाठी तर जाधव मुंबईकडे रवाना झाले.

म्हणे बीडला जायचे होते...
'जाधव यांची घाई समजू शकते, पण बागडेंना कशासाठी?' या प्रश्नावर त्यांच्या वतीने भाजप तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके यांनीच उत्तर दिले. ते म्हणाले की, 'फुलंब्री मतदारसंघातील कामांचे उद्घाटन करून बागडे यांना बीड येथे मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या कार्यक्रमास हजेरी लावायची हाेती. रेल्वे फाटकापासून माझे संपर्क कार्यालय खूपच जवळ आहे. त्यामुळे दहा मिनिटे गाडीत बसून राहणे त्यांना याेग्य वाटले नाही.'
 

बातम्या आणखी आहेत...