आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्रातील राजकारण उत्तरेत : मोदी सरकारला रेड्डींचा बाहेरून पाठिंबा शक्य, राज्यसभेतही साथ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आंध्र प्रदेशात ऐतिहासिक विजयानंतर वायएसआरसीपीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्ली गाठली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. जगनमोहन रेड्डी ३० मे रोजी विजयवाडा येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. जगन यांनी मोदींना शपथ समारंभाचे निमंत्रणही दिले. तत्पूर्वी जगन यांची रविवारी सकाळी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. 


जगन रेड्डी उभय नेत्यांच्या भेटीनंतर विशेष राज्याच्या दर्जाबद्दल ते म्हणाले, भाजपला लोकसभा निवडणुकीत २५० जागा मिळाल्या असत्या तर आम्हाला केंद्र सरकारवर खूप जास्त अवलंबून राहण्याची गरज नव्हती. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता त्यांना आमची गरज नाही. जेवढे करता येईल तेवढे आम्ही केले. आम्ही मोदींना आमच्या परिस्थितीची कल्पना दिली आहे. भाजपला २५० जागा मिळाल्या असत्या तर चित्र वेगळे असते. आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या दस्तऐवजांवर त्यांनी स्वाक्षरीही केली असती. वास्तविक आंध्रला विशेष दर्जा देणाऱ्या सरकारलाच केंद्रात पाठिंबा दिला जाईल, असे जगन यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. सूत्रांच्या मते, जगन यांनी मोदींशी रालोआ सरकारला बाहेरून पाठिंब्याबाबत चर्चा केली. विशेष राज्यासाठी पाठिंबा देण्याचा आग्रह जगन यांनी शहा यांच्या भेटीत केला. याप्रसंगी वायएसआर काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विजय साई रेड्डीदेखील उपस्थित होते. 


> उपेंद्र कुशवाह यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या रालोसपाच्या दोन आमदारांनी जदयूमध्ये प्रवेश केला. विधानसभेच्या अध्यक्षांनी दोन्ही आमदारांना जदयूचे आमदार म्हणून मान्यता दिली आहे. 
 

वायएसआरसीपीने २२ लोकसभा जागा जिंकल्या

वायएसआरसीपीने जगन यांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशात २५ पैकी २२ जागी विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत पक्षाने १७५ पैकी १५१ जागा संपादन केल्या. रालोआतून बाहेर पडलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला विधानसभेत केवळ २३ जागा मिळाल्या. 
 

 

आंध्र प्रदेशात आघाडी : भाजप राज्यात वायएसआरसीपीसह नवी आघाडी करणे आता शक्य 
लवकरच भाजप आंध्र प्रदेशात जगनमोहन यांच्या पक्षासोबत आघाडी करणे शक्य आहे. कारण येथे टीडीपीने भाजपची साथ सोडली आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीदेखील जगन यांचा पक्ष व भाजप यांच्यात आघाडी होईल, असा कयास लावला जात होता. जगन यांच्यावर अनेक केसेस चालू होत्या. त्यामुळे भाजप आघाडीसाठी फार उत्सुक असल्याचे दाखवत नव्हते. राज्यात यंदा भाजपला विधानसभा व लोकसभेत प्रत्येक एक जागा गमवावी लागली. मताधिक्क्यदेखील १ टक्क्याने घटले. २०१४ मध्ये भाजपला लोकसभेत राज्यातून ३ व विधानसभेत ७ जागा मिळाल्या होत्या. 
 

राज्यसभेत सहकार्य  : जगन यांचे राज्यसभेत २ खासदार, पुढल्या वर्षी आणखी होतील

मोदींच्या नेतृत्वाखालील नूतन सरकार आगामी काळात तिहेरी तलाक, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकासह इतर अनेक विधेयके संसदेच्या पटलावर मांडणार आहेत. ही विधेयके आधी लोकसभेत मंजूर झाल्यानंतरही राज्यसभेत हिरवा कंदील मिळू शकला नसल्याने रखडली. कारण राज्यसभेत रालोआला बहुमत नाही. त्यामुळेच राज्यसभेत वायएसआरच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. रेड्डी यांच्या पक्षाकडे सध्या दोन खासदार आहेत. २०२० मध्ये आंध्रतून चार सदस्य राज्यसभेवर निवडून जातील. हे सर्व वायएसआरचे असतील. त्याशिवाय २०२२ मध्येदेखील आणखी चार पोहोचतील. टीडीपीचे सध्या सात खासदार आहेत.