Home | Magazine | Madhurima | Jahnavi Marathe writes about cucumber pickle

काकडीचं लोणचं

जाह्नवी मराठे, मुंबई | Update - Aug 28, 2018, 12:33 AM IST

ही खास बाक्रे म्हणजे आजोळच्या घरची पूर्वापार चालत आलेली माझ्या आईच्या आईची, माझ्या आज्जीची, पाककृती. तवसाची काकडी आली की

 • Jahnavi Marathe writes about cucumber pickle

  ही खास बाक्रे म्हणजे आजोळच्या घरची पूर्वापार चालत आलेली माझ्या आईच्या आईची, माझ्या आज्जीची, पाककृती. तवसाची काकडी आली की, हे लोणचं झालंच म्हणून समजा. चारपाच दिवस फ्रिजमध्ये मस्त टिकतं, अधिकाधिक चढं होतं, पोळी, भाकरी, भात, घावन, धिरडी, भाजणी वडे, थालिपीठ, काकडीचे पातोळे त्याबरोबर तर खासच लागतात.


  याविषयीची एक आठवण म्हणजे माझा मामा माझ्याकडे राहायला आला होता. त्याचं राहायला येण्याचं कारणच मुळी त्याला त्याच्या आईचे म्हणजे आज्जीचे सगळे खास पदार्थ यथेच्छ खायचे होते. तेव्हा त्याला एक गंभीर आजार झाला होता, डाॅक्टरांनी सहा महिन्यांचा अवधी दिला होता. ‘आता शेवटचे दिवस मला माझ्या मनाप्रमाणे हवं तसे जगू दे, खूप झालं पथ्यपाणी,’ असं म्हणाला आणि त्याने मला फोन केला, ‘पिंके, मी चार दिवस येतो तुझ्याकडे आणि तू आईचे सगळे पदार्थ रोज करून थोडे थोडे मला खायला घाल.’ मुलुंडहून बोरिवलीत माझ्याकडे आला मामीसोबत. म्हणाला, ‘आईची चव आपल्याकडे तुझ्याच हातात आली आहे (असं माझे इतरही मामा म्हणतात.) म्हणून आलोय. कर माझ्या इच्छा पूर्ण.’ आणि मला हातात यादीच दिली आज्जी स्पेशल पदार्थांची.त्यात पहिलं काकडीचं लोणचं. मग इतर पदार्थ, म्हणजे उकड, कारल्याची आमटी, दुध्याची भाजी, पंचामृत, वगैरे. पुढच्या चारपाच दिवसांत त्याला करून घातले, थोडं भीत भीत की दुखणं बळावायला नको त्याचं. पण मामीही म्हणाली, ‘पिंके, कर ते म्हणतायत तसं. त्यांची इच्छा आहे. होणार आहे ते होणारच आहे.’ मी केलं सगळं, तृप्त होऊन गेला माझ्याकडून आणि पुढच्या सहा महिन्यात गेलाच. तेव्हा खरं तर तवसाच्या काकडीचा मोसमही नव्हता, मग मी नेहमीच्याच काकडीचं लोणचं केलं होतं. मामा म्हणाला, ‘तुझा हात लागला ना, झाली साधी काकडी तवसाची, आहे काय नाही काय.’


  कृती : तवसाच्या काकडीच्या फोडी कराव्या. मेथ्या दाणे दहा ते बारा, हिंग, हळद असे छोट्या कढल्यात तुपावर थोड्या तळून घ्याव्या. शक्यतो खडा हिंग घ्यावा. मग हे मिक्सरवर चांगलं बारीक वाटून घ्यावं. त्यात लाल मोहरी, एखाददुसरी हिरवी मिरची आणि थोडं पाणी घालून मोहरी चढी होईल असं फिरवावं. आज्जी रवीने घुसळून घ्यायची. मग त्यात दही घालून वरून पुन्हा मोहरी हिंग हळदीची फोडणी जरा गार झाली की ओतायची.


  - जाह्नवी मराठे, मुंबई
  pmar283@gmail.com

Trending