आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरण भागवणार नांदेडपर्यंतच्या लोकांची तहान; विष्णुपुरी धरणात बुधवारपर्यंत पोहोचेल पाणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मराठवाड्यात पावसाअभावी दुष्काळाची स्थिती गंभीर होत चालली आहे. या दुष्काळग्रस्त भागाची तहान आता एकटे जायकवाडी धरण भागवणार आहे. नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे तुडुंब भरलेल्या जायकवाडी धरणातून सध्या माजलगाव धरणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यानंतर विष्णुपुरीमध्येदेखील पाणी सोडण्याची मागणी होत आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ३० दलघमी पाणी सोडण्याची मागणी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. सध्या सर्व बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येत असून  बुधवारपर्यंत विष्णुपुरी प्रकल्पात जायकवाडीचे हे पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. जायकवाडी धरण ते विष्णुपुरी प्रकल्पाचे अंतर ३३० किमी आहे.

पावसाअभावी जायकवाडी वगळता या विभागात धरणे कोरडी आहेत. त्यामुळे औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि नांदेडसाठी जायकवाडी तारणहार ठरणार आहे. 
 

बंधाऱ्यासाठी धरणातून सुटले १५० दलघमी पाणी
जायकवाडीतून सर्व बंधाऱ्यांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. यात हायड्रोमधून आतापर्यंत ५०.३७ दलघमी, तर आठ दरवाजांतून ९६.७९ दलघमी पाणी सोडण्यात आले. या माध्यमातून सर्व बंधारे या हंगामात २५ टक्के भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
 
दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणी सोडण्याची वेळ
विष्णुपुरी बंधाऱ्यात पिण्यासाठी पाणी सोडण्याची फारशी गरज पडत नाही. बीड तसेच  परभणी जिल्ह्यात पाऊस पडल्यानंतर विष्णपुरीत पाणी येते. मात्र, यंदा दहा वर्षांनंतर पाणी सोडण्याची दुसऱ्यांदा वेळ आली. 
 
माजलगावसाठी सोडले ३२ दलघमी पाणी
जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. आतापर्यंत उजव्या कालव्यातून ३२ दलघमी पाणी सोडण्यात आले. माजलगावसाठी अडीच टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यांतील खरिपाच्या क्षेत्रासाठी याचा लाभ होत आहे.
 
 
आपेगाव हिरडपुरी, जोगलादेवी, मंगरूळ, राजाटाकळी, लोणीसावंगी, ढालेगाव, मुदगल मुळीपर्यंत पाणी पोहोचले आहे. डिग्रस बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडीतून साधारण २०० ते २५० दलघमी पाणी सोडण्याचे नियोजन आहे.
 
१५ दलघमी पाणी देणार
विष्णुपुरीतून ३० दलघमी पाण्याची मागणी आहे. डिग्रस बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. साधारण १५ दलघमी पाणी विष्णुपुरीत देण्याचे नियोजन आहे. जायकवाडीतून बंधाऱ्यासाठी सोडलेल्या पाण्यामुळे नांदेडसह परळी थर्मल आणि माजलगावकरांची अडचण दूर होणार ओह. 
- अजय कोहिरकर,कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे महामंडळ
 
२६५३ दलघमी साठा सध्या जायकवाडीत
१९१५ दलघमी यातील उपयुक्त पाणीसाठा
 

बातम्या आणखी आहेत...