आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरच्या चारदिवारीचा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशांत समावेश, देशातील ३७ स्थळांना आजवर यादीत स्थान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - राजस्थानातील गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयपूर येथील चारदिवारीचा (परकोटा) युनेस्कोने सांस्कृतिक वारसा स्थळांत समावेश केला आहे. ही देशासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. जागतिक वारसादिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा झाली. शनिवारी अझरबैजानची राजधानी बाकूमध्ये झालेल्या जागतिक वारसा स्थळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दाेन वर्षांपूर्वी अहमदाबाद शहराचा समावेश या यादीत झाला होता. आतापर्यंत १६७ देशांतील १०९२ स्थळांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात भारतातील ३७ वारसा स्थळे आहेत. कोणत्याही शहरास हा दर्जा मिळाल्यानंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पर्यटनास चालना मिळून अर्थव्यवस्था बळकट होते. त्याचबरोबर लोकांना रोजगारही उपलब्ध होतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जयपूरबाबत सरकारकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. युनेस्कोची संस्था इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स (आयसीओएमओएस)च्या शिफारशीवरून कोणत्याही शहर वा क्षेत्रास अद्भुत वारशामुळे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले जाते. आयसीओएमएसने २०१८ मध्ये जयपूरची पाहणी केली होती. त्यानंतर बाकूमध्ये आयोजित बैठकीत १६ देशांचा पाठिंबा  मिळाला. जयपूरची वारसा स्थळे  आदर्श आहेत. परकोट्यात चंद्रमहल, जंतर-मंतर, हवामहल, नाहरगड, अल्बर्ट हॉल, प्राचीन मंदिरे, हवेली परकोटा आणि दरवाजे ही जयपूरला वारसा स्थळांचे शहर म्हणून ओळख देतात. 

 

बॅबिलोनियन हे चार हजार वर्षांपूर्वीचे शहरही यादीत

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ समितीने इराकच्या ३० वर्षांच्या प्रयत्नांनंतर १० किमी क्षेत्रात पसरलेल्या प्राचीन मेसोपोटामियातील शहर बॅबिलोनियन जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला. इराकचा यासाठी १९८३ प्रयत्न सुरू होता. या प्राचीन शहराचे आजवर केवळ १८ टक्के उत्खनन झाले आहे. बगदादच्या दक्षिणेला सुमारे १०० किमी दूर अंतरावर फरात नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे प्राचीन शहर बॅबिलोनियन साम्राज्याचे प्रमुख केंद्र होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...