आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटली : मवाळ वाजपेयी युगाचा अखेरचा दुवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर त्यांचे अनेक मित्र व आप्तस्वकीयांनी त्यांच्याविषयी अनेक हृदयस्पर्शी अनुभव शेअर केले. मीदेखील माझी एक आठवण सांगू इच्छितो. नोव्हेंबर २०१४ मध्ये मी त्यांना आणि पी. चिदंबरम यांना २०१४ मधील निवडणुकीवर लिहिलेल्या माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आमंत्रित केले होते. दोघांनीही आमंत्रण स्वीकारले, पण कार्यक्रमाच्या ४८ तासांपूर्वी जेटलींचा काॅल आला. ते म्हणाले, ‘काही भाजप समर्थकांनी मला प्रकाशनाला जाऊ नये, असा सल्ला दिला आहे. तुम्ही पंतप्रधान मोदींविषयी काही वादग्रस्त लिहिले आहे का?’ मी संतुलित उत्तर दिले, ‘यात २०१४ च्या निवडणुकीवरील  नि:पक्ष आणि प्रामाणिक निरीक्षण आहे. तसेच तुम्हाला सल्ला देणाऱ्यांपैकी कुणी हे पुस्तक वाचले असेल की नाही शंकाच आहे.’ जेटली हसले, म्हणाले, ‘हे बरोबर आहे. नेते पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी करतात, पण ती त्यांनी वाचलेली नसतात. पण हे नि:पक्ष पुस्तक असेल तर मी तुमच्यावर विश्वास ठेवून तेथे उपस्थित राहीन.’ ते कार्यक्रमास आले देखील.  आज समाज, राजकारण आणि न्यूजरूममध्ये आपण-ते, राष्ट्रवादी-राष्ट्रविरोधी, उदारवादी-छद्म उदारवादी गटात विभाजन झालेले असताना हा प्रसंग अगदी बोलका आहे. तुम्ही मोदी समर्थक आहात का विरोधी, हा फक्त प्रश्न नाही. आपल्या विभागल्या गेलेल्या जगाचा आरसा आहे. येथे संवाद म्हणजे कर्कश चर्चा एवढाच अर्थ निघतो. जुन्या शाळेच्या मित्रांचा व्हाॅट्सअॅप ग्रुपदेखील राजकीय मतांमध्ये विभागला आहे. तुम्ही बीफ खात असाल तर त्यावरून तुम्ही ‘चांगले’ हिंदू आहात की नाही हे ठरते.  इथेच जेटली वेगळे दिसतात. समकालीन भाजप नेत्यांमध्ये ते जवळपास अद्वितीयच. मोदींच्या ‘लोकप्रिय’ प्रतिमेच्या आसपासही ते नव्हते. त्यांनी कधीही लोकसभा निवडणूक जिंकली नाही. २०१४ मध्ये पंजाबएेवजी दिल्लीतून निवडणूक लढले असते तर कदाचित ते जिंकलेही असते. त्यांच्या वक्तृत्वात सुषमा स्वराज यांच्यासारखा बाणेदारपणा नव्हता, पण एका अर्थाने दोघेही संसद आणि बाहेरही परस्परांचे ‘प्रतिस्पर्धी’ होते. कदाचित ते अमित शहांप्रमाणे राजकारणाचा ध्यास घेतलेले नव्हते. ते कायदा, क्रिकेट, पुस्तके तसेच इतर गोष्टींचाही आनंद घेत होते, त्यामुळे ते बहुआयामी होते. इतरांपेक्षा अधिक उठून दिसणारा त्यांचा एक गुण म्हणजे संकुचित विचारसरणीच्या गटातटांपासून अलिप्त राहणे. राजकारण आणि वैयक्तिक गोष्टी खऱ्या अर्थाने ते वेगळे ठेवू शकत होते. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला जमलेल्या सर्वपक्षीय, सर्व विचारधारांच्या कोंडावळ्यातून हे स्पष्ट दिसत होते.  अर्थात वैचारिक मतभेद असलेल्यांप्रति जेटलींचा ठोस दृष्टिकोन नव्हता, असे नव्हे. मागील वर्षी त्यांनी कथित नक्षली कारवायांसाठी काही मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेवर लिहिलेल्या ब्लाॅगमध्ये त्यांना ‘आधे-माओवादी’ असे म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘हेतुपुरस्सर किंवा अजाणतेपणाने हे लोक भूमिगतांचा जाहीरपणे वावरणारा चेहरा बनले आहेत. ते लोकशाहीचाच भाग असून त्यांनी आंदोलकांचा मुखवटा ओढला आहे. ते लोकशाहीचीच भाषा बोलत असून देशातील अनेक भागांमध्ये त्यांनी मानवी हक्कांच्या आंदोलनावरही ताबा मिळवला आहे. असे असले तरी ते नेहमी नक्षलवादाचे समर्थन करतात. ’ सर्वांना एकाच गटात तोलल्याबद्दल मी आक्षेप घेत त्यांना फोन केला. अर्धा तास चर्चेनंतर त्यांनी मला एक सल्ला दिला, ‘तुम्ही या मुद्द्यावर एक विरोधी ब्लाॅग लिहावा.’ एखाद्या विषयावर चर्चा असल्यास कर्कश वादविवाद न घालता समजूतदारपणे मुद्दे मांडायचे असल्यासच टीव्ही चर्चेत बोलवा, अशी त्यांची इच्छा असे. ९०च्या दशकातील उत्तरार्ध आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीला ‘द बिग फाइट’च्या पॅनलमध्ये मी द्विधा मन:स्थितीत होतो तेव्हा जेटली, कपिल सिब्बल आणि सीताराम येचुरींना चर्चेसाठी बोलावले. यामुळे कार्यक्रमही चांगला होत आणि अँकरचे कामही सोपे होत असे. कॅमेरा सुरू करायचा आणि या तिन्ही विद्वानांचे मत एेकत राहायचे. या वक्त्यांपैकी कुणीही विरोधकांना पाकिस्तानात जाण्यास कधीच सांगितले नाही. उलट जेटली तर माझे कुटुंब मूळ पाकिस्तानातले असल्याचे सांगत असत. जेटली हे मवाळ वाजपेयी-अडवाणी युगातील अखेरचा दुवा होते. त्यात काँग्रेसविरोधी राजकारण होते, पण विचारसरणीच्या आधारे नागरिकत्व ठरवणाऱ्या शक्तिशाली राष्ट्रवादाची जहरी छटा नव्हती. मोदी-शहांच्या युगात जेटलींचे येणे ही त्यांची ताकद आणि कमजोरीही होती. यातून पक्ष आणि मित्र मोदींप्रति त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा दिसून येतो. पण याच वेळी एक नेता म्हणून त्यांच्या मर्यादाही दिसून आल्या. नोटबंदीच्या निर्णयावेळी ते स्वत:च्या नेतृत्वगुणाला आव्हान देऊ शकले नाहीत.  एकूणच जेटली हे लुटियन्स गट आणि राजकारणात मोठे पद मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या नवमध्यमवर्गादरम्यान सांधण्याचे काम करणारे अखेरचे व्यक्ती होते. मोदी-शहांचे राजकारण जुन्या व्यवस्थेला धक्के देत नष्ट करण्यासारखे असते. यामुळे समाजातील दुही अधिक वाढत जाते. काश्मीरचे उदाहरण ताजे आहे.  जेटली आदेश देण्याऐवजी हळुवारपणे समजावून सांगत. त्यामुळे जीएसटी कौन्सिलसाठी ते कायम स्मरणात राहतील. त्यामुळे मोदी २.० लादेखील जेटलींसारख्या कायम सोबत राहणाऱ्या व्यक्तीची उणीव जाणवेल.