आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षेत मद्यधुंद तरुणाकडून विद्यार्थिनीची छेडखानी; रिक्षेने माता-भगिनींनी एकट्याने प्रवास करणे जीवावर बेतण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महाविद्यालयातील क्लास आटाेपून एक विद्यार्थिनी दाणाबाजारात घरगुती साहित्य खरेदीसाठी गेली हाेती. तेथून ती रिक्षेने परत येत असताना शेजारी बसलेल्या मद्यधुंद तरुणाने तिची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून या विद्यार्थिनीने आरडाआेरड केली. त्यानंतर धावून आलेला जमावाने या तरुणाला बदडून जिल्हापेठ पाेलिसांच्या ताब्यात दिले. जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयासमाेर बुधवारी दुपारी २.३० वाजता हा प्रकार घडला. संशयितावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

नदीम महेमूद पिंजारी (वय २८, रा. हरिविठ्ठलनगर) असे मद्यधुंद युवकाचे नाव आहे. यावल तालुक्यातील आडगाव-कासारखेडे येथील एक विद्यार्थिनी जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात बी.ए. तृतीय वर्षात शिकत आहे. ती महाविद्यालयात येण्यासाठी आडगाव येथून बसने येते. बुधवारी सकाळी ती महाविद्यालयात आली. क्लास संपल्यानंतर ती घरगुती साहित्य घेण्यासाठी दाणा बाजारात गेली हाेती. झाडू व इतर घरगुती साहित्य खरेदी केल्यानंतर गावी जाण्यासाठी तिला बसस्थानकात यायचे हाेते. त्यासाठी ती खैरनार आॅप्टिकल्सजवळ रिक्षाची प्रतीक्षा करीत हाेती. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास एम.एच.१९ सी.डब्ल्यू १५९६ ही रिक्षा तिच्याजवळ येऊन थांबली. त्या रिक्षामध्ये पूर्वीच एक युवक बसलेला हाेता. खैरनार आॅप्टिकलजवळून ती बसस्थानकात येण्यासाठी त्या रिक्षात बसली. रिक्षात बसल्यानंतर ताे युवक तिच्याकडे एकटक बघत हाेता. रिक्षा पाेलिस अधीक्षक कार्यालयाजवळ आल्यानंतर त्याने थेट गळ्यात हात घालून तिला जवळ आेढले. या प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या विद्यार्थिनीने त्याला दूर लाेटले. तिच्याजवळ असलेल्या झाडूने त्याला मारत जाेरजाेरात आरडाआेरड करू लागली. त्या रिक्षाच्या पाठीमागे हिमांशू अशाेक तिवारी (रा. ममुराबाद) हे दुचाकीवर येत हाेते. तिची आरडाआेरड त्यांना एेकू आली. त्यांनी तातडीने समाेर दुचाकी आणत चालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले. त्याने रिक्षा थांबवल्यानंतर नागरिक गाेळा झाले. झालेल्या प्रकाराबाबत तिने नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी त्याला रिक्षातून खाली आेढले. ताे मद्यधुंद अवस्थेत हाेता. नागरिकांनी त्याला चांगलाच चाेप दिला. हा प्रकार पाेलिस अधीक्षक कार्यालयाजवळ झाला. या प्रकाराने ती विद्यार्थिनी प्रचंड घाबरलेली हाेती. तिच्या अंगाचा थरकाप उडाला हाेता. चालक रिक्षासह घटनास्थळावरून पळून गेला. प्रचंड गाेंधळ झाल्यानंतर शहर पाेलिस ठाण्याचे याेगेश साबळे व तुषार मराठे हे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी नदीम याला पकडून िजल्हापेठ पाेलिस ठाण्यात आणले. त्यावेळी पाेलिसांनी नाव विचारले असता नदीम महेमूद पिंजारी (रा. हरिविठ्ठलनगर) असे नाव त्याने सांगितले. रिक्षाचालक मित्र असल्याची माहितीही त्याने दिली.

 

पाेलिसांच्या निर्लज्जपणाचा कळस 
> रिक्षेत छेडखानीचा प्रकार दुपारी २.३० वाजता घडला. जिल्हापेठ पाेलिसांनी पीडित युवतीला तक्रार घेण्यासाठी अडीच तास बसवून ठेवले. महिला अधिकाऱ्याने ही तक्रार घेणे आवश्यक हाेते. परंतु, जिल्हापेठ पाेलिस ठाण्यातील महिला कर्मचारी रजेवर असल्याने तक्रार घेण्यासाठी कुणीही उपस्थित नव्हते. 


> स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलिस उपनिरीक्षक निता कायटे या सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठला आल्या. त्यांनी थेट जिल्हापेठचे सहायक निरीक्षक आराक यांना फाेन लावला. ही तक्रार घेण्यासाठी तुमच्या महिला कर्मचाऱ्याला बाेलवायचे हाेते. एवढ्या वेळेस तक्रार घेते, असे त्यांना सांगितले. 


तक्रारदार कसे येतील समाेरॽ 
भेदरलेली विद्यार्थिनी या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गेली. त्यावेळी तिने झालेला प्रकार ठाणे अंमलदाराला सांगितला. उद्दाम ठाणे अंमलदाराने तिला घटना कशी घडली, अशी विचारणा केली. त्यावेळीही पीडित विद्यार्थिनीचा अंगाचा थरकाप हाेत हाेता. पाेलिसाच्या या प्रश्नाने ती गर्भगळीत झाली. नाइलाजाने तिला पुन्हा सांगावे लागले. सहायक पाेलिस निरीक्षक संदीप आराक तेथे आले. त्यांनी तक्रार घेण्यासाठी महिला पाेलिस कर्मचाऱ्याला बाेलावले. थाेड्या वेळात त्या युवकाचे आई-वडील तेथे आले. त्याच्या आईने थेट त्या विद्यार्थिनीला ताे काेठून बसला हाेता, तू काेठून बसली हाेती, अशी विचारणा करायला सुरुवात केली. त्यावेळी आराक यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त करीत बाहेर जाण्यास सांगितले. पाेलिस ठाण्यात रडतच तिने या प्रकाराची माेबाइलवरून पालकांना माहिती दिली.