आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावला वकील तरुणीच्या अंगावर अॅसिड टाकून सोनसाखळी आेरबाडणाऱ्या तरुणीस रंगेहाथ पकडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : मार्केटमध्ये गर्दीचा फायदा घेऊन बाटलीतून महिलांच्या अंगावर सौम्य अॅसिड फेकून नंतर सोनसाखळी ओरबाडून पळणाऱ्या १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीस रविवारी फुले मार्केटमधून रंगेहाथ अटक करण्यात आली. तिने एका वकील तरुणीसह तिच्या बहिणीच्या अंगावर अॅसिड फेकले होते. रविवारी दुपारी १ वाजता ही खळबळजनक घटना घडली. असा गंभीर प्रकार शहरात पहिल्यांदाच उघडकीस अाला आहे.

हर्षदा किशाेर महाजन (वय १९, रा. बोदवड, जि. जळगाव) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. रविवारी दुपारी अॅड. पूजा अोमप्रकाश व्यास (वय ३०, रा. बालाजी पेठ, जळगाव) त्यांची बहीण आरती व्यास हिच्यासह फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. या वेळी हर्षदा ही त्यांच्या मागून येता होती. तिने हातातील प्लास्टिक बाटलीतून सौम्य अॅसिड पूजा व आरतीच्या अंगावर फेकले. या वेळी अॅड. पूजा यांनी मागे वळून पाहिले तर हर्षदा अॅसिडच्या बाटलीला झाकण लावताना दिसून आली. तिला हटकल्यानंतर तिने पूजा यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून मागच्या बाजूने पळून जाऊ लागली. यामुळे पूजा, आरती यांनी आरडाओरड केली. सर्वांनी मिळून हर्षदा हिला ताब्यात घेतले. तिच्या हातातून तुटलेली सोनसाखळीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. अॅड. पूजा व्यास यांच्या फिर्यादीवरून हर्षदावर जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, हर्षदाच्या बॅगेत उग्र वास येणाऱ्या द्रवाची बाटली सापडली आहे. याच बाटलीत सौम्य अॅसिड असल्याचे पोलिसांनी सांगितले. या द्रवाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

हर्षदा उच्चभ्रू, उच्चशिक्षित तरुणी, वसतिगृहात तपासणी
हर्षदा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बीबीएमचे शिक्षण घेते. विद्यापीठाच्या वसतिगृहात ती राहते. तिचे कुटुंबीय बोदवड तालुक्यात राहणारे असून वडील सधन शेतकरी असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. उच्चशिक्षित, उच्चभ्रू असूनही हर्षदाने असे का केले, हा प्रश्नच आहे. दरम्यान, पोलिसांनी हर्षदाच्या वसतिगृहातील खोली, सामानाची तपासणी केली. त्यात काही ठोस हाती लागले नाही.