आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेचे कर्ज एकरकमी फेडण्याची मनपाची तयारी, आमदार सुरेश भोळेंची आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याशी चर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्रत्येक निवडणुकीत हुडको आणि जिल्हा बॅंकेची कर्जफेड हा नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. महापालिकेतील सत्ता बदलानंतर राज्य व केंद्रातील सत्तेचा फायदा होऊन पालिका कर्जमुक्त होईल असे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी भाजपाने एकेक पाऊल टाकायला सुरूवात केली आहे. जिल्हा बँकेच्या कर्जफेडीसाठी स्थानिक पातळीवर निर्णय शक्य आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे कर्ज एकरकमी फेडण्याची तयारी पालिकेने दाखवली असून प्रस्ताव दिला जाणार आहे.


गेल्या 20 वर्षात महापालिकेवरील हुडको व जिल्हा बॅंकेचे कर्जाचा डोंगर प्रचंड वाढला आहे. या दोन्ही वित्तीय संस्थांच्या कर्जफेडीसाठी प्रत्येक महिन्याला पालिकेच्या तिजोरीतून चार कोटी रुपये खर्च होत आहेत. गेली अनेक वर्षे एवढी मोठी रक्कम कर्जाच्या हप्त्यापोटी अदा करावी लागत असल्याने शहरातील मुलभूत सोईसुविधांवर परिणाम झाला आहे. कर्जामुळे पालिका विकास कामे तर करूच शकत नाही; परंतु पालिकेचा प्रशासकीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेळेवर वेतन देताना हातराखून निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे या दाेन्ही कर्जातून पालिकेची मुक्तता करणे हा राजकीय नेत्यांनी अनेकदा संकल्प व्यक्त केला अाहे. त्यादृष्टीने अंतिम स्वरूप काही प्राप्त झालेले नाही. अाता महापालिकेवर भाजपाची सत्ता असल्याने कर्जफेडीच्यादृष्टीने पुन्हा प्रयत्न सुरू झाले अाहेत.


आमदार भोळेंची एमडींसोबत चर्चा
आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हा बॅंकेच्या कर्जफेडीसंदर्भात जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्यासाेबत चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे दुपारी महापालिका अायुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासाेबत चर्चा करून प्रस्ताव देण्याबाबत चर्चा केली. आमदार भोळे हे जिल्हा बॅंकेचे संचालक असून बॅंकेवर भाजपा नेतृत्वाची सत्ता अाहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या कर्जातून मुक्ततेसाठी ही सगळ्यात माेठी संधी मानली जात अाहे. महापालिका यासंदर्भात लवकरच जिल्हा बॅंकेला प्रस्ताव देईल असे अायुक्त डांगे यांनी देखिल सांगितले.


अशी अाहे सध्याची स्थिती
1997 ते 2001 दरम्यान 59 कोटी 34 लाख रुपये कर्ज घेण्यात आले होते. महापालिका दरमहा मुद्दल व व्याजापोटी 1 कोटी रुपयांचा हप्ता जिल्हा बँकेला अदा करीत आहे. जानेवारी 2019 अखेर सुमारे 190 कोटी रुपये जिल्हा बँकेकडे जमा करण्यात आले आहेत. अाणखी दहा महिने कर्जफेडीचा हप्ता अदा करणे बाकी आहे. आताच्या नियोजनानुसार, डिसेंबर २०१९ मध्ये शेवटचा हप्ता राहणार अाहे. त्यानंतर मात्र महापालिका जिल्हा बँकेच्या मुक्त झालेली असेल. दरम्यान, एकरकमी परतफेडीसाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार कुठे अाडकाठी तर नाही ना? याची तपासणी करावी लागणार अाहे.


शेवटचा हप्ता डिसेंबरपर्यंत 
जिल्हा बॅंकेच्या कर्जाचा शेवटचा हप्ता डिसेंबर 2019 पर्यंत आहे. पालिकेकडे मुद्दल व व्याजासह सुमारे 11 कोटी रुपये घेणे आहेत. जिल्हा बॅंकेने एकरकमी परतफेडीची तयारी दाखविल्यास व्याजाची रक्कम कमी होऊन मुद्दल 8 ते 9 कोटी होईल. एकरकमी परतफेडीसाठी पालिकेला सुमारे 2 ते 3 कोटी रुपये अदा करावे लागण्याची शक्यता आहे, असे झाल्यास व्याजाच्या माध्यमातून दर महिन्याला खर्च होणारे 40 ते 45 लाख रुपयांची बचत होणार आहे. यासंदर्भात पालिका प्रशासन लवकरच जिल्हा बॅंकेला प्रस्ताव देऊन संपूर्ण ताळेबंदाची मागणी करण्यात येणार आहे. 


मुद्दल भरल्यास व्याजात मिळणार सवलत 
महापालिकेवरील जिल्हा बँकेच्या कर्जासंदर्भात मार्ग निघू शकतो. त्यासाठी पालिकेने कर्जातील मुद्दलची रक्कम भरावी लागेल. व्याजात सुट देता येईल. यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागेल. शासन यासाठी परवानगी देत असते. यामुळे जिल्हा बँकेचा एनपीए कमी होऊन महानगरपालिकेलाही मदत होईल असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...