आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
प्रवीण पाटील
चोपडा - अवघ्या काही मिनिटांपूर्वी ज्या आई-वडिलांनी प्रेमाने आशीर्वाद दिले. लाडका भाऊ, आत्या व अन्य नातेवाइकांनी हसतखेळत निरोप घेतला, तेच १२ जण अपघातात मृत्यूमुखी पडल्याच्या धक्क्याने नववधू मंजुश्रीचे अश्रू गोठले. मात्र, या भीषण अपघाताची एकदम माहिती मिळाल्यास मंजुश्रीला मानसिक धक्का बसेल, या भीतीपोटी नातेवाईकांनी तिला देवदर्शनासाठी चांगदेव येथे जायचे आहे, अशी खोटी बतावणी केली. यानंतर प्रवासात तुझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. यामुळे शंकेची पाल चुकचुकलेल्या मंजुश्रीने माहेरी चिंचोल (ता.मुक्ताईनगर) येथे पाऊल ठेवताच समोर आई-वडील, भाऊ व अन्य नातेवाइकांचे मृतदेह पाहून हंबरडा फोडला. मंजुश्रीचे नातेवाईक यशवंत चौधरींनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली.
चोपडा पालिकेतील आरोग्य निरीक्षक व्ही.के.पाटील यांचे सुपुत्र प्रतीक आणि चिंचोल (ता.मुक्ताईनगर) येथील मंजुश्री यांचा विवाह ३० जानेवारीला झाला. यानंतर रविवारी (दि.२) सासरकडील मंडळींनी रिसेप्शन ठेवले होते. या कार्यक्रमात नातेवाईक व स्नेहींनी हजेरी लावून नवदांपत्यास शुभाशीर्वाद दिले. त्यात नववधू मंजुश्रीचे आई-वडील, भाऊ व अन्य जवळील नातेवाईक देखील सहभागी होते. रात्री ९.३० च्या आसपास हा कार्यक्रम संपला. यानंतर मंजुश्रीचे आई-वडील, भाऊ, दोन आत्या, आत्याच्या सुना, चुलत बहिणी व अन्य आप्तेष्ट तीन वेगवेगळ्या वाहनांमधून चिंचोलकडे रवाना झाले. प्रवासात रात्री ११ वाजेच्या सुमारास हिंगोणेजवळ तीनपैकी एका वाहनाला डंपरने दिलेल्या धडकेत १२ जण ठार व ५ जखमी झाले. ही माहिती मिळताच चोपडा येथील पाटील परिवाराला जबर हादरा बसला. मात्र, एवढ्या भीषण अपघाताची माहिती नववधू मंजुश्रीला कशी सांगावी? या चिंतेत सर्व जण पडले. रात्रभर त्यांची ही घालमेल सुरू होती. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी असलेले प्रतीक व मंजुश्रीचे चोपडा येथील नातेवाईक यशवंत चौधरी हे सोमवारी सकाळी ७ वाजता व्ही.के.पाटील यांच्या घरी आले. यानंतर त्यांनी देवदर्शनासाठी चांगदेव येथे जाऊ, अशी खोटीच बतावणी मंजुश्रीला केली. यानंतर नवदांपत्य मंजुश्री व प्रतीक, व्ही.के.पाटील यांच्यासह ते चारचाकीने सकाळी स्वत:च्या घरी आले. यानंतर देवदर्शनाचे कारण खरे वाटावे यासाठी सर्वांना घेऊन वेले येथील साईबाबा मंदिर गाठले. येथून सर्वांनी चांगदेवकडील प्रवास सुरू केला. वाहनात व्ही.के.पाटील व त्यांच्या पत्नी मधल्या सीटवर, तर नवदांपत्य मागील सीटवर बसले होते.
अपघातातील मृतांची नावे
मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (६५), प्रभाकर नारायण चौधरी (६०), अाश्लेषा उमेश चौधरी (२८), रिया जितेंद्र चौधरी (१४), प्रभाबाई प्रभाकर चौधरी (५५), सोनाली जितेंद्र चौधरी (३४), प्रियंका नितीन चौधरी (२८), चालक धनराज गंभीर कोळी (२८), शिवम प्रभाकर चौधरी (१६, सर्व रा. चिंचोल, ता. मुक्ताईनगर), सोनाली सचिन महाजन (३४, रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर), सुमनबाई श्रीराम पाटील (५५, रा. निंबोल, ता. रावेर), संगीता मुकेश पाटील (४०, रा. निंबोल ता. रावेर)
जखमींची नावे :
चिंचोल गावाच्या सरपंच सुनीता राजेंद्र चौधरी (२४), अन्वी नितीन चौधरी (४), सर्वेश नितीन चौधरी (९), मीना प्रफुल्ल चौधरी (३०, सर्व रा. चिंचोल), अदिती मुकेश पाटील (१४, रा. निंबोल).
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.