political / १९८० च्या जळगाव-नागपूर दिंडीने राजकारणाला कलाटणी 

किस्सा निवडणुकीचा : ३९ वर्षांपूर्वी निघालेल्या पहिल्या राजकीय दिंडीमुळे शरद पवारांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली होती 

Sep 01,2019 09:15:00 AM IST

जळगाव : राजकीय यात्रांचे प्रेरणास्थान राहिलेली महाराष्ट्रातील पहिली शेतकरी दिंडी १९८० मध्ये जळगाव ते नागपूरदरम्यान निघाली हाेती. यातून शरद पवारांचा राष्ट्रीय राजकीय क्षितिजावर उदय झाला. या दिंडीत पवारांच्या संघटनकाैशल्याची चुणूक दिसल्याने दिल्लीत त्यांच्या नेतृत्वात पहिली किसान रॅली निघाली. अंतुले सरकारविराेधातील या दिंडीमागची पवारांची ताकद अाेळखून राजीव गांधींनी त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेतले.

तत्कालीन विराेधी पक्षनेते शरद पवार यांच्या नेतृत्वात शेतकरी प्रश्नांवर ७ डिसेंबर १९८० राेजी ही दिंडी निघाली. विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते ग.प्र. प्रधान, बाबा आढाव, शिवाजीराव देशमुख, एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख, एस.एम. जाेशी, राजारामबापू पाटील, प्रभा राव, प्रतिमा दंडवते, नानासाहेब गाेरे, बापूसाहेब काळदाते, जाॅर्ज फर्नांडिस, मृणाल गाेरे, गाेविंदराव अादिक, ए.बी. वर्धन, अरुण मेहता, ना.धाें. महानाेर, ईश्वरलाल जैन ही मंडळी सहभागी हाेती. नागपूर अधिवेशनापर्यंत पाेहाेचण्यापूर्वीच ही यात्रा बरखास्त करण्याची अंतुले सरकारची रणनीती हाेती. मात्र पवारांनी शेतकऱ्यांना गनिमी काव्याने रात्रीतून नागपुरात घुसवून मुख्यमंत्र्यांसह दिल्लीकरांचीही झाेप उडवली.

शरद पवारांनी 'प्लॅन बी'च्या युक्तीने पाेहऱ्याच्या जंगलात असा दिला होता चकवा...
२० डिसेंबर राेजी ही यात्रा पाेहरेत (जि. अमरावती) पाेहाेचली. खासदार यशवंतराव चव्हाण तिथे सहभागी झाले. शासनाने या जंगलात पाेलिस बळाचा वापर करून यात्रा उधळण्याचे नियाेजन केले. विश्रामगृहातील शिपाई, चहावाला व काही लाेकांना पवारांच्या भाेवती हेर म्हणून ठेवले हाेते. हे लक्षात आल्यानंतर पवारांनी कधी शेकाेटीच्या, तर कधी शाैचाला जाण्याच्या निमित्ताने प्लॅन बी तयार केला. यशवंतराव, पवारांसह काही जणांना पाेलिसांनी अटक केली. त्यांनी अटकेपूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात वेळ घालवला. पाेलिस यंत्रणा या ठिकाणी अडकून हाेती. दुसरीकडे पवारांनी दत्ता मेघे यांच्यासह अन्य नेत्यांवर आधीच जबाबदारी साेपवून २५ डिसेंबर राेजीच काही अांदाेलकांसह यात्रा नागपुरात घुसवण्याचे नियाेजन केले हाेते.

अभिनेते दिलीपकुमारही आले, मात्र परत पाठवले
अभिनेते दिलीपकुमार दिंडीत सहभागी हाेण्यासाठी अाले. शरद पवारांनी मात्र त्यांना नागपुरात येण्यास मनाई केली. 'गर्दीसाठी तुम्हाला बाेलावले असा अर्थ निघू नये म्हणून तुम्ही लांबच राहा,' असा पवारांचा निराेप ना.धाें.महानाेर यांनी दिलीपकुमार यांना दिला हाेता. जब्बार पटेल, निळू फुले, डाॅ.श्रीराम लागू ही मंडळीही याच कारणामुळे गेली नाही.

X