आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात सन १८७२मध्ये सुरू झाला रथाेत्सव; २३० मण लाकडापासून यावलचे त्र्यंबक मिस्त्रींनी साकारला हाेता रथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील श्रीराम मंदिर संस्थानच्या रथाेत्सवाला सन १८७२मध्ये सुरुवात झाली. साग व तिवसाच्या २३० मण लाकडापासून यावलचे त्र्यंबक नारायण मिस्त्री यांच्या कलाकुसरीतून दाेन वर्षात हा रथ साकारला हाेता. रथाेत्सवाचा मार्ग गेल्या ७० वर्षांपूर्वी विस्तारला गेला. त्यापूर्वी रथाचा मार्ग हा जुने जळगाव पुरताच मर्यादित हाेता. जळगाव शहराचा मानबिंदू असलेला रथाेत्सव साेमवारी अाहे. यानिमित्ताने श्रीराम मंदिर संस्थान व अप्पा महाराज समाधीचे सातवे गादीपती मंगेश महाराज यांनी रविवारी (दि.१८) 'दिव्य मराठी'ला ही माहिती दिली. 


जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्रीरामांचा रथ अन‌् त्याचा उत्सव असावा, अशी कल्पना अप्पा महाराजांना सुचली. त्यांनी त्यावेळच्या मंडळींसाेबत या विषयावर चर्चा केली अाणि त्यातून रथाच्या निर्माणाला चालना मिळाली. यावल येथील त्र्यंबक नारायण मिस्त्री यांना त्यासाठी पाचारण करण्यात अाले हाेते. रथासाठी सातपुड्यातून साग व तिवसाची लाकडं मागवण्यात अाली. २३० ते २५० मण लाकडांनी रथाची निर्मिती करण्यात अाली. अाठ ते दहा जणांच्या मदतीने दाेन वर्षात अाकर्षक अशा रथाची निर्मिती झाली. 

 

१४६ वर्षांची अादर्श परंपरा; खान्देशातील भाविक येतात दर्शनाला 
- १८७२ या वर्षी कार्तिक महिन्यात रथाेत्सवाला अप्पा महाराज यांनी सुरुवात केली हाेती. ७६ वर्षे हा रथ श्रीराम मंदिरापासून निघून जुने जळगाव, भवानी माता मंदिराकडून लालशा बाबा दर्गासमाेरून पुन्हा श्रीराम मंदिराजवळ पाेहाेचायचा. 


- ७० वर्षांपूर्वी रथाेत्सव मार्गाचा विस्तार झाला. हा मार्ग अाधी चार किलाेमीटरचा हाेता. अाता जळगाव पीपल्स बंॅक, घाणेकर चाैक मार्गे लालशा बाबा दर्गावर रथ जाऊ लागला. रथाेत्सवाचा हा मार्ग अाता साडेसात किलाेमीटर अंतराचा अाहे. 
- २५ फूट रथाची उंची अाहे. रथाचे लाकूड चकाकते राहावे म्हणून त्याला बेलाच्या तेलाचे लेपन लावले जायचे. मात्र माती, धुळीचा थर बसून नक्षीकाम बुजले गेले हाेते. त्यानंतर पुन्हा चकाकीसाठी प्रयत्न करण्यात अाले. 
- २००२ या वर्षी साेने वितळण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री वापरून धुळीचे थर काढण्यात अाले. त्यासाठी २० दिवस लागले हाेते. त्यानंतर रथाला बेलतेलाएेवजी वाॅर्निश लावण्यात येत अाहे, असे विलास हरी चाैधरी यांनी सांगितले. 

 

१६ फूट लांब पुष्पहार 
जुन्या जळगावातील श्रीराम फुल भांडारचे संचालक समाधान बारी यांच्याकडून गेल्या १२ वर्षांपासून रथाला १६ फूट लांब लाल झेंडू, शेवंती व गुलाबाचा पुष्पहार रथ लहान विठ्ठल मंदिर येथे पाेहाेचल्यावर अर्पण केला जाताे. थाेरले वारकरी मित्र मंडळ (माराेती पेठ, जुने जळगाव) यांच्या सहकार्याने भाविकांना साबुदाणा खिचडी वाटप सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान हाेईल. मंडळातर्फे या उपक्रमाचे यंदाही सूक्ष्म नियाेजन करण्यात अाले असल्याचे समाधान बारी यांनी पत्रकाद्वारे कळवले अाहे. 

 

शहराला अाज यात्रेचे स्वरूप 
रथाेत्सवाच्या मार्गावर स्वागत कमानी, शुभेच्छा फलक, भगवे ध्वज लावण्यात अाले अाहेत. साेमवारी सकाळी ११ वाजता श्रीराम मंदिर संस्थान व अप्पा महाराज समाधीचे गादीपती मंगेश महाराज यांच्या हस्ते श्रीराम प्रभूंच्या उत्सव मूर्तीची पूजा व अारती हाेऊन मूर्ती रथावर विराजमान हाेईल. या वेळी रथाेत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, अामदार सुरेश भाेळे, महापाैर सीमा भाेळे, उपमहापाैर डाॅ. अश्विन साेनवणे, पाेलिस पाटील प्रभाकर पाटील यांची उपस्थिती राहील. अप्पा महाराज यांचे मित्र लालशा बाबा यांच्या भिलपुऱ्यातील दर्गावर उत्सव समितीतर्फे चादर चढवण्यात येते. त्यानंतर बालाजी मंदिर मार्गे रथ रात्री १२ वाजता मूळ जागेवर पाेहाेचताे. जुना कापड बाजार व्यापारी असाेसिएशनतर्फे यंदा एक हजार किलाे साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप हाेईल. त्यासाठी अध्यक्ष प्रदीप श्रीश्रीमाळ, सचिव कांतिलाल रंगवाले, महेंद्र जैन, सुनील श्रीश्रीमाळ, सचिन जांगडा, तेजपाल जैन व सदस्य परिश्रम घेत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...