आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दराेडा प्रतिबंधक पथक २४ तासांत बरखास्त करण्याचे ‘आयजीं ’चे आदेश

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पथकाची नियुक्तीच अवैध असल्याचा दिला निर्वाळा
  • पथकासंदर्भात अनेक तक्रारी आल्याचाही केला उल्लेख
  • तरुणाला दरोड्याच्या गुन्ह्यात अडकवले चौकशी अहवालानंतर होणार कारवाई

कृष्णा तिडके 

जालना - एका युवकाला खाेट्या गुन्ह्यात अडकवल्याची तक्रार आल्यानंतर आठ दिवसांपूर्वी विशेष पाेलिस महानिरीक्षक डाॅ.रवींद्रकुमार सिंघल यांनी दराेडा प्रतिबंधक पथकासह कदीम जालना पाेलिस ठाण्याचे निरीक्षक आणि इतर ११ पाेलिस कर्मचाऱ्यांची चाैकशी सुरू केली आहे. चाैकशी अहवाल अद्याप आलेला नसला तरी दराेडा प्रतिबंधक पथकाच्या अनेक तक्रारी आल्या असून त्याची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे सांगत आयजींनी हे पथक २४ तासांच्या आत बरखास्त करण्याचे आदेश एसपींना दिले आहेत.जालना शहरातील यशाेदीपनगरातील अनिल गोरखनाथ वलेकर या तरुणाने आपल्याला दराेड्याच्या खाेट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याची तक्रार आयजी  सिंघल यांच्याकडे २५ फेब्रुवारी रोजी केली हाेती. तक्रारीसोबत पुरावे म्हणून सीसीटीव्ही फुटेजही दिले होते. त्यानुसार  सिंघल यांनी पैठणचे अपर पोलिस अधीक्षक भामरे यांना लगेच जालना येथे पाठवले. भामरे यांनी २६ फेब्रुवारी रोजी दिवसभर या प्रकरणाची चौकशी केली. यात ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हे आरोप करण्यात आले होते त्यांनाही पोलिस अधीक्षक कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. या संदर्भातील अहवाल आयजींकडे अद्याप पोहोचलेला नाही. मात्र हा अहवाल येण्यापूर्वीच आयजींनी हे पथक २४ तासांच्या आत बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय या पथकाची नियुक्ती कोणत्या आदेशान्वये करण्यात आली आहे याचाही बोध होत नसल्याचे यात म्हटले आहे. आयजींनी सोमवारी दुपारी जालना पोलिस अधीक्षक एस.चैतन्य यांना हे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता जालना येथील दरोडा प्रतिबंधक विभाग बरखास्त केला जाणार आहे. विशेष म्हणजे दरोडा प्रतिबंधक विभागातील तीन कर्मचाऱ्यांच्या एस.पी. एस.चैतन्य यांनी शुक्रवारी या पथकातून अन्य ठिकाणी बदल्या केल्या होत्या. मात्र आता आयजींनी हे पथकच बरखास्त करण्याचे आदेश दिल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षकांनीच हे पथक नियुक्त केले होते. विशेष म्हणजे एक पोलिस निरीक्षक आणि काही पोलिस कर्मचारी येथे नियुक्त करण्यात आले होते. आता या सर्व कर्मचाऱ्यांचीही अन्यत्र बदली केली जाणार आहे. आयजी कार्यालयातील सूत्रांनुसार या पथकासंदर्भात जेवढ्या तक्रारी आल्या आहेत त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. शिवाय भामरे यांनी केलेल्या चौकशीचा अहवालही लवकरच आयजींकडे पोहाेचणार आहे. त्या अहवालानंतर आणखी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे जालना पोलिस दलाला आयजींनी हा मोठा दणका दिल्याचे बोलले जात आहे.अहवाल लगेच सादर करा

दरोडा प्रतिबंधक विभागाचे पथक २४ तासांच्या आत बरखास्त करून त्याचा अहवाल विशेष पेालिस महानिरीक्षक कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर आवश्यकता असेल तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त पथकाचे कामकाज चालवण्यात यावे, अशा सूचनाही एसपींना देण्यात आल्या आहेत. ही होती प्रमुख तक्रार

अनिल वलेकर याने आयजींकडे तक्रार केली होती. त्यात दरोडा प्रतिबंधक विभाग आणि कदीम जालना पोलिसांनी आपल्याला ३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घानेवाडी येथील ढाब्यावरून गोड बोलून एसपी कार्यालयात नेले. तेथे बसवून ठेवत रात्रीजेवणही दिले. नंतर ४ जानेवारी रोजी पहाटे आपल्याला पळून जात असल्याचे सांगत दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याचे म्हटले होते.यांची सुरू आहे चौकशी 


दरोडा प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांच्यासह पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव नागरे, खंदारे, आर्य, चिंचोले, आडेप, निकाळजे, गणेश जाधव, कृष्णा चव्हाण, रमेश काळे व इतर दोन पोलिस कर्मचारी अशा १३ जणांची यात चौकशी सुरू आहे.

 

तक्रारींची चौकशी होणार


दरोडा प्रतिबंधक पथकाच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्या सर्व तक्रारींची चौकशी केली जाईल. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र तत्पूर्वी हे पथक बरखास्त करण्याच्या सूचना एसपींना दिल्या आहेत. पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे. त्यामुळे तक्रारी आल्यानंतर पथक बरखास्तीच्या सूचना दिल्या आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक भामरे यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो आल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ.रवींद्रकुमार सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक, औरंगाबाद

 

बातम्या आणखी आहेत...