Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Jalna: In the absence of demons, activists fought the election

जालना : दानवेंच्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांनीच लढवला किल्ला; सिल्लोडमध्ये नोटाचा डंका

कृष्णा तिडके | Update - May 25, 2019, 09:39 AM IST

आजारपणामुळे १२ दिवस प्रचाराला फिरलेही नाही, तरीही ३ लाख ३२ हजार मतांची घेतली आघाडी

 • Jalna: In the absence of demons, activists fought the election

  जालना - लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जवळपास आठवडाभर रुग्णालयात होते. त्यांच्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांनी किल्ला लढवताना तब्बल ३ लाख ३२ हजार मतांची आघाडी मिळवून दिली. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात दानवे यांना ४० हजारावर मताधिक्य आहे.


  महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दानवेंनी १८ जिल्ह्यांत प्रचारसभा घेतल्या. चंद्रपूर येथील प्रचारसभेदरम्यान उन्हाचा तडाखा बसल्याने त्यांना औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. जवळपास १० ते १२ दिवस दानवे प्रचारातून बाहेर होते. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिल्लोड आणि फुलंब्री येथे प्रचारसभा झाल्या. या दोन्ही सभांनाही ते उपस्थित नव्हते. जालना येथे अमित शाह यांची सभा झाली. त्या सभेत दानवे यांनी भाषण केले नाही. त्यामुळे संपूर्ण प्रचारात दानवे यांना सहभागी होता आले नाही. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत शिवसेनेचे नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर व भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. यात जालना विधानसभेची जबाबदारी मंत्री खोतकर यांनी घेतली तर बदनापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार नारायण कुचे यांनी तर भोकरदन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार संतोष दानवे यांच्यावर होती.

  असे असेल विधानसभेचे चित्र :

  जालना विधानसभा मतदारसंघातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हेच शिवसेनेचे उमेदवार असू शकतील तर त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून माजी आ. कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. भोकरदन विधानसभा मतदारसंघात दानवे यांचे चिरंजीव तथा विद्यमान आमदार संतोष दानवे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यात लढत होऊ शकते. बदनापुरातून दानवे यांना तब्बल ६० हजार मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे येथ नारायण कुचे यांचीच उमेदवारी कायम राहू शकते.

  सिल्लोडमध्ये नोटाचा डंका
  सिल्लोड विधानसभा मतदारसंघात दानवे यांना सर्वात मोठी ७९ हजार ८२५ मतांची आघाडी मिळाली आहे. तर दुसरीकडे येथे नोटा फॅक्टरनेही आपले अस्तित्व दाखवले आहे. सर्व लोकसभा मतदारसंघात नोटाला १५ हजार ६३७ मते मिळाली असताना एकट्या सिल्लोडमधून नोटाला १२ हजार ३९६ मते मिळाली आहेत.

Trending