आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना - आर्थिक व्यवहारातील कोट्यवधी रुपये डुबावे म्हणून चार लाख रुपयांत व्यापाऱ्याचा खून करण्याची सुपारी दिली. यानंतर सुपारी घेतलेल्याने इतर दोन जणांच्या मदतीने तीन दिवस म्हणजे ७२ तास व्यापाऱ्याच्या दैनंदिन हालचालीवर पाळत ठेवली. नंतर चौथ्या दिवशी दुचाकीवरून येणाऱ्या पती-पत्नीचा पाठलाग करून पिस्तुलातून गोळी मारली. परंतु, सुदैवाने ती गोळी कानाला निसटती लागल्याने व्यापारी जखमी झाला. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अठरा दिवसांत या ‘थरारक’ गुन्ह्याची उकल केली.
जालना शहरातील व्यापारी विमलराज सिंघवी हे पत्नीसह जॉगिंगसाठी गेले असता, त्यांच्यावर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली होती. गोळी झाडल्याचा आवाज येताच सिंघवी व त्यांच्या पत्नीने मागे पाहिले असता, चारजण पळून गेले होते. दरम्यान, जखमी झालेले सिंघवी यांना खासगी रुग्णालयात दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी गोपनीय सूत्र हलविले असता, हा गुन्हा सोमिनाथ ऊर्फ पप्पू रामभाऊ गायकवाड (करोडी ता. जि. औरंगाबाद, ह.मु. शिवनगर, जालना) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, दत्ता बाबासाहेब जाधव (अंबा, ता. परतूर), जालिंदर सर्जेराव सोलाट (मांडवा, ता. बदनापूर) यांच्यासह गुन्हा केला असल्याची कबुली दिली. राजेश मानकचंद नहार (परतूर, जि. जालना) याच्या सांगण्यावरून व्यापाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
यावरून वरील चारही आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांच्या ताब्यातून एक बोलेरो जीप, एक मारुती सुझुकी, स्विफ्ट डिझायर कार, एक गावठी पिस्तूल, मोबाइल असा ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, एएसपी समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, एपीआय दुर्गेश राजपूत, कॉन्स्टेबल सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, अंबादास साबळे, हिरामन फलटणकर, रंजीत वैराळ, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, संदीप मांटे, विलास चेके, किरण मोरे, सूरज साठे, मंदा बनसोडे यांनी केली आहे.
...अशी ठेवली पाळत
सिंघवी हे दररोज सकाळी उठल्यानंतर जॉगिंगसाठी कसे जातात, कशाने जातात, सोबत कोण असतं, कुठे थांबतात, किती वेळ पार्कमध्ये फिरतात, घरी किती वाजता येतात यावर तीन दिवस पाळत ठेवली. यानंतर चौथ्या दिवशी गोळीबार केला.
आरोपींवर खुनाचे गुन्हे
राजेश मानकचंद नहार (परतूर) याने आरोपी सोमीनाथ ऊर्फ पप्पू रामभाऊ गायकवाड याला सिंघवी यांचा खून करण्यासाठी सुपारी दिली होती. यानंतर सोमीनाथ याने इतरांना सोबत घेऊन हा प्लॅन रचला होता. दत्ता बाबासाहेब जाधव यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत.
अजून गुन्हे उघडकीस येणार
पिस्तूल कोठून आणले, सुपारी कशी घेतली, असे काही गुन्हे केले आहेत का, या बाजूने तपास सुरू आहे. या आरोपींमुळे अजून गुन्हे उघडकीस येणार आहेत.
राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.