आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१६०० अंश तापमानात वितळलेले लोखंड अंगावर पडून ५ कामगार ठार, ६ जण गंभीर

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • स्टील कंपनीत तप्त लोहरस साच्यात ओतताना अपघात
  • तीन जणांचा जागीच कोळसा, सर्व मृत-जखमी कामगार परप्रांतीय

जालना - सोळाशे अंश सेल्सियस तापमानात वितळवलेल्या लोखंडाचा तप्त रस अंगावर पडल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. उपचारांदरम्यान दोन जणांची प्राणज्योत मालवली. या भीषण दुर्घटनेत ६ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जालना एमआयडीसीतील ओम साईराम स्टील कंपनीत गुरुवारी दुपारी ४ वाजेदरम्यान ही घटना घडली. भंगार वितळल्यानंतर तयार झालेले लोखंडाचे पाणी क्रेनद्वारे बिलेट (पट्ट्या) तयार करण्याच्या साच्यात ओतताना हा प्रकार घडला. रात्री उशिरा कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुरुवारी कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू होते. दुपारी ४ वाजेदरम्यान अचानक लोखंडाचे वितळते पाणी भट्टीच्या खाली आणि बाजूला काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडले. यात तीन जण जागीच ठार, तर ८ कामगार जखमी झाले. घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने तातडीने तिन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. जखमींना जालन्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. एकाच रस्त्यात, तर दुसऱ्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.शवविच्छेदनासाठी उशीर

दुर्घटनेतील सर्व कामगार इतर राज्यांतील असल्याची माहिती सामान्य रुग्णालयात मृतांची ओळख पटवण्यास आलेल्या कामगारांनी दिली. त्यांनी मृतांची नावेही पोलिसांना सांगितली. मात्र, कंपनीच्या रेकाॅर्डवर नेमकी नावे व पत्ता पाहिल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवून शवविच्छेदन करता येईल, असे पीएसआय प्रमोद बोडले यांनी सांगितले. 

 

मृतदेह तब्बल चार तास पडून

दुपारी चार वाजता तीन मृतदेह थेट सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. सर्वप्रथम अपघात विभागाला ही माहिती देण्यात आली. मात्र, कुणाचेच नाव नसल्यामुळे ड्यूटीवरील डॉक्टरांनी याची नोंद घेतली नाही. त्यानंतर मृतदेह थेट शवविच्छेदनगृहातच हलवण्यात आले. तब्बल ४ तास मृतदेह पडून होते.२०१७ च्या घटनेची पुनरावृत्ती  

जालना शहरात २०१७ मध्ये अंगावर लोखंडाचे पाणी पडल्यामुळे सात जण ठार झाल्याची घटना एका कंपनीत घडली होती. या घटनेचीच पुनरावृत्ती ओम साईराम कंपनीत घडलेल्या घटनेतून समोर आली आहे.दुर्घटना झालेल्या स्टील कंपनीत अशी होते प्रक्रिया > ओम साईराम कंपनीत आठ टनांची भट्टी आहे. त्यात लोखंड वितळण्याचे काम केले जाते.

> भंगाराच्या विलगीकरणानंतर लोहचुंबकयुक्त क्रेनने भंगार उचलून फर्नेस (भट्टी) मध्ये टाकले जाते. 

> भट्टीत १६०० अंश सेल्सियस तापमानात वितळवून तयार झालेले पाणी साच्यात ओतले जाते. यातून लोखंडाच्या बिलेट (पट्ट्या) तयार होतात. त्यापासून सळयांची निर्मिती केली जाते.  
 


> याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळला भेटी देऊन पाहणी केली. तसेच सामान्य रुग्णालयातही येऊन मृत आणि जखमींची नावे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा या कामगारांची ओळख पटवण्यात यश आले.