आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्याच्या तरुणीला फेसबुकचे ८० लाखांचे पॅकेज; देशभरातून केवळ एकटीची निवड, नोव्हेंबर महिन्यात होणार रुजू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोशनी शिंपी
औरंगाबाद - “उंच घे भरारी तू वादळाला आता घाबरू नको, बळ आहे तुझ्या पंखात माघार आता तू घेऊ नको…’ मोठ्या शहरातील लोकांनीच यश मिळवावे असे काही नाही. उरात प्रचंड ऊर्जा असेल तर भरारीला कोणी रोखू शकत नाही. मागास समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील जालना येथील रश्मी देशपांडे या तरुणीने अटकेपार झेंडा फडकवला आहे. फेसबुकने तब्बल तिला ८० लाख रुपयांचे पॅकेज, शिवाय कंपनीचे २१ लाखांचे शेअर्सही दिले आहेत. नोव्हेंबर महिन्यात ती आयर्लंड येथे फेसबुकच्या कार्यालयात रुजू होणारआहे. 
३१ वर्षीय रश्मीने जालन्याच्या नवयुवक गणेश विद्यालय, श्री. म. स्था. जैन विद्यालयातून दहावी तर जेईएस महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने पुणे विद्यापीठात बी. ई. पदवी मिळवली. स्वीडन, फिनलँड, फ्रान्स आणि अमेरिकन कंपन्यांमध्ये काही काळासाठी नोकरी केली. जुलै महिन्यात फेसबुकने भारतातून उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली. देशभरातून हजारो तरुणांनी यामध्ये भाग घेतला होता. या निवडीच्या ५ तांत्रिक तर २ अतांत्रिक फेऱ्या झाल्या. शेवटी व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याची फेरीही झाली. प्रत्येक फेरीत रश्मी आघाडीवर राहिली. देशभरातून निवड होणारी ती एकमेव तरुणी आहे. आयर्लंड येथील निवासाची व्यवस्थाही फेसबुक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तिच्या निवडीने मराठवाड्याची खासकरून जालन्याची शान वाढली आहे. 

सासरच्या मंडळींनी दिला रश्मीला पाठिंबा
रश्मीचे आईवडील शिक्षक आहेत. त्यांनी लहानपणापासून तिला प्रोत्साहन दिले होते.  तसेच तिला जे  काही करायचे आहे त्यामध्ये नेहमीच स्वातंत्र्य दिले.  आई -वडिलांच्या इच्छाशक्तीला माझ्या प्रयत्नांची जोड मिळाल्याने हे यश मला मिळाले, असे रश्मीने ‘दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले. रश्मी म्हणाली, चार वर्षांपूर्वी माझा विवाह झाला. पतीसह सासरची मंडळीही मला सातत्याने नवे काही करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देतात, असेही ती म्हणाली.
 

मुलगी, सुनेच्या पाठीशी उभे राहा 
भारतीय स्त्रीकडे फक्त चूल आणि मूल म्हणून पाहण्याची पद्धत आहे. मात्र, कुटुंबाने साथ दिली तर संसार सांभाळून करिअरची उंच भरारी घेता येते. याचा अनुभव मी माझ्या यशाच्या प्रत्येक पायरीवर घेते आहे. तमाम माता-पिता, सासू-सासऱ्यांनाही माझी विनंती आहेे की, तुमची मुलगी, सून हुशार असेल तर तिच्या पाठीशी उभे राहा. ती तुमच्या कुळाचे नावही उंचावेल. 
- रश्मी देशपांडे

बातम्या आणखी आहेत...