• Home
  • National
  • Jammu and Kashmir confines restrictions on 13 14 police stations

J &K / जम्मू-काश्मिरात केवळ १३-१४ पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रात निर्बंध, 'कलम ३७० रद्द'ला एक महिना पूर्ण 

खोऱ्यात बहुतांश निर्बंध शिथिल, बाजारपेठा मात्र अजूनही बंदच 

Sep 04,2019 07:45:00 AM IST

नवी दिल्ली/ श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये केवळ १३-१४ पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रात कलम १४४ नुसार काही निर्बंध लागू आहेत. केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीबाबत माहिती देताना हे स्पष्ट केले. केंद्रीय गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर प्रशासन रोज याबाबत माहिती देत असल्याचे ते म्हणाले.
काश्मीरमधील बहुतांश भागांत निर्बंध शिथिल असून बाजारपेठा आणि सार्वजनिक परिवहन मात्र बंद आहे. श्रीनगरमधील अधिकाऱ्यांनुसार, ९२ टक्के भागांतून निर्बंध हटवण्यात आले आहेत. कुपवाडा व हंदवाडा वगळता इतर भागांत संचार सेवा सुरू असून सरकारी कार्यालयेही उघडली आहेत. कर्मचाऱ्यांची उपस्थितीही चांगली आहे. काश्मीर खोऱ्यात ४ हजारांहून अधिक शाळा-महाविद्यालये उघडली आहेत.


सरपंचांना विमा संरक्षण : काश्मीर खोऱ्यातील सरपंच, ग्रामप्रधान यांना विमा संरक्षण दिले जाईल. काश्मीरच्या एका शिष्टमंडळाला गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत हे आश्वासन दिले.


पाच युवकांना गावातच रोजगार : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील किमान पाच युवकांना गावातच रोजगार दिला जाईल, असे पीएमओचे मंत्री जितेंद्रसिंह यांनी सांगितले.


कलम ३७० : शहा, नड्डा यांची माजी राज्यपाल जगमोहन यांच्याशी चर्चा
कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपने अभियान सुरू केले असून या अंतर्गत भाजप अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांची भेट घेतली. जगमोहन १९८४ ते ८९ या काळात आणि नंतर १९९० मध्ये जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांच्या काळात राज्यात प्रचंड दहशतवादी कारवाया सुरू होत्या.

X