आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमध्ये ताब्यात घेतलेल्या नेत्यांचे हाॅटेलचे बिल झाले तब्बल 2.65 कोटी रुपये

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याच्या गेल्या ५ आॅगस्टच्या निर्णयानंतर कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याच्या नावावर ताब्यात घेतलेले अनेक माजी मंत्री आणि आमदारांसह विविध पक्षांच्या नेत्यांना विविध हाॅटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या हाॅटेलमधील राहण्याचे तीन महिन्यांचे बिल २.६५ कोटी रुपयांवर गेल्याने अधिकारी हबकले आहेत. या प्रकारावर टीका सुरू होताच आता या नेत्यांना ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पर्यायी ठिकाणे शोधण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल काॅन्फरन्स, पीपल्स डेमाेक्रॅटिक पार्टी आणि पीपल्स काॅन्फरन्ससह विविध राजकीय पक्षांच्या ३१ नेत्यांना भारतीय पर्यटन मंडळाच्या सेंटाॅर हाॅटेलमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून ताब्यात ठेवण्यात आले आहे. हाॅटेलचे बिल अडीच कोटींच्या वर गेल्यामुळे टीका सुरू झाल्यानंतर या राजकीय कैद्यांना पर्यायी ठिकाणी पाठवण्यास सुरुवात झाली आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ‘हाॅटेलमधून हटवण्यात आलेल्या राजकीय नेत्यांना जगप्रसिद्ध दल सरोवराच्या किनारी स्थानांतरित करण्यासाठी पर्यायी ठिकाणांचा शोध अधिकारी करत आहेत. हाॅटेलमध्ये थंडीपासून बचाव करण्याची योग्य व्यवस्था नाही, हिवाळ्यात नेत्यांना तेथे ठेवणे कठीण होईल. हाॅटेलला लागून असलेल्या एस. के. आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात व्यवस्था करण्यात अधिकारी अपयशी ठरले आहेत. त्याशिवाय हाॅटेलतर्फे देण्यात आलेले बिलही त्यांच्या चिंतेचे कारण आहे. हाॅटेलने तीन महिन्यांचे २.६५ कोटी रुपयांचे बिल गृह विभागाला सोपवले आहे. सरकारला प्रति कैदी ६००० रुपये ते ८००० रुपयांचे बिल दिले जात होते. पण फक्त ८०० रुपयेच मंजूर केले जातील.’ सूत्रांनी सांगितले की, दोन नेत्यांना एका कक्षात ठेवले जात आहे आणि त्यांना शाकाहारी भोजन दिले जात आहे. आठवड्यात फक्त एकदा चिकनचा एक तुकडा दिला जातो. या नेत्यांना आमदारांच्या हाेस्टेलमध्ये हलवण्याची अधिकाऱ्यांची योजना होती, पण हे हाेस्टेल याआधीच काही सरपंच आणि महापालिका सदस्यांच्या ताब्यात आहे. 

विविध राजकीय पक्षांचे हे ज्येष्ठ नेते आहेत ताब्यात
आॅगस्टपासून नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या नेत्यांमध्ये नॅशनल काॅन्फरन्सचे ज्येष्ठ नेते अली मोहंमद सागर, पीडीपीचे ज्येष्ठ नेते नईम अख्तर, पीपल्स काॅन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन, आयएएस अधिकारी ते नेता झालेले शाह फैसल यांचा समावेश आहे. डाॅ. फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती या तीन माजी मुख्यमंत्र्यांनाही तीन महिन्यांपासून ताब्यात घेण्यात आले आहे. डाॅ. अब्दुल्लांना त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे, तर उमर आणि मेहबूबा यांना श्रीनगरच्या सरकारी विश्रामगृहात ठेवलेले आहे. या तिघांनाही हिवाळ्यात जम्मूला हलवण्याची योजना आहे.

काही तास परिस्थिती सामान्य झाल्यानंतर काश्मिरात पुन्हा बंद
श्रीनगर । काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या बंददरम्यान मंगळवारी सकाळी काही तास सामान्य स्थिती राहिली. मात्र, नंतर लगेच पुन्हा सर्व दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहिली. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात गेल्या ५ ऑगस्टपासूनच सर्व राजकीय कार्यक्रम ठप्प आहेत कारण सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना ताब्यात घेण्यात आले आहे किंवा नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. संपूर्ण खोऱ्यात आधीपासूनच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, ग्रीष्मकालीन राजधानीसह संपूर्ण खोऱ्यात कुठेही संचारबंदी लावण्यात आलेली नाही. खोऱ्यात गेल्या ९३ दिवसांपासून सर्व रेल्वे सेवा स्थगित आहेत. खोऱ्याच्या कोणत्याही भागात रेल्वे सेवा सुरू नाही. दूरसंचार नेटवर्कही प्रभावित आहे कारण अफवा पसरणे रोखण्यासाठी सर्व सेवांवर बंदी घातलेली आहे. लँडलाइन आणि पोस्टपेड सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, तर भारत संचार निगम लिमिटेडसह (बीएसएनएल) सर्व सेल्युलर कंपन्यांच्या इंटरनेट आणि प्रीपेड सेवा पाच ऑगस्टपासूनच बंद आहेत.

बातम्या आणखी आहेत...