आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मिरात निवडणूक प्रक्रियेस लवकरच सुरुवात : उपराज्यपाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - जम्मू आणि काश्मीरमध्ये नजीकच्या काळात लवकरच विधानसभा निवडणूक घेण्यात येईल, असे संकेत उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी गुरुवारी दिले. निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
रिआसी जिल्ह्यातील तलवारा भागात काॅन्स्टेबलच्या १४ व्या तुकडीच्या पासिंग आऊट परेडला संबोधित करताना मुर्मू म्हणाले की, निवडणूक लवकरच घेण्यात येईल. जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश असून तेथे विधानसभाही आहे. तेथे उपराज्यपालांची राजवट जास्त काळ राहू शकत नाही. निवडणूक घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल. पोलिस विभागाने आपली भूमिका बजावण्यास सज्ज राहावे. आगामी निवडणूक काळात पोलिसांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. 

जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष निर्मलकुमार सिंह यांनी बुधवारीच उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांची राजभवनात भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मुर्मू यांनी निवडणुकीबाबतचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय पक्षांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने ५ आॅगस्टला जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून राज्याचे जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केले होते. त्यानंतर ३१ आॅक्टोबरला गिरीशचंद्र मुर्मू यांनी जम्मू आणि काश्मीरच्या उपराज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली होती.‘लोक रुग्णालयात मृत्युमुखी पडत आहेत, कृपया आम्हाला मदत करा’


‘लोक जम्मूच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (जीएमसी) मृत्युमुखी पडत आहेत, उपराज्यपाल कृपया आम्हाला मदत करा,’ अशा आशयाचे आवाहन करणारे अनेक पोस्टर भिंतीवर लागले आहेत. जम्मू येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप राठोड यांनी जम्मू शहरातील अम्फाल्ला चौक ते डोग्रा चौक या भागांतील भिंतीवर हे पोस्टर चिकटवले आहेत. ते म्हणाले की, रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात लोक मृत्युमुखी पडत आहेत. आपत्कालीन कक्ष म्हणजे तत्काळ उपचार, पण अनेकांना तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करवून घेण्यासाठी दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत आहे. वास्तविक प्राण वाचवणारी औषधे रुग्णालयात उपलब्ध असायला हवीत, पण त्यासाठी रुग्णालयाबाहेर जावे लागत आहे. एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन यासाठी ४ ते ६ महिने वाट पाहावी लागत आहे. आपत्कालीन स्थितीत ज्यांना शक्य आहे ते खासगी रुग्णालयांतून या चाचण्या करून घेतात, पण गरिबांना त्याचा मोठा फटका बसत आहे. आता उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनीच या रुग्णालयाला आकस्मिक भेट द्यावी आणि प्रत्यक्ष स्थितीची पाहणी करावी. डॉक्टरांचे दुर्लक्ष, अपुऱ्या सुविधा यामुळे लोक रुग्णालयांत मृत्युमुखी पडत आहेत. काही वेळा तर वेळेवर उपचार न मिळाल्यामुळेच आपत्कालीन विभागात रुग्णांचा मृत्यू होत आहे. खासगी रुग्णालये आणि सरकारी डॉक्टर यांच्यात साटेलोटे आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांना कमिशन घेऊन खासगी रुग्णालयांत पाठवले जात आहे, असा आरोपही राठोड यांनी केला आहे.
 

उपराज्यपालांच्या दोन सल्लागारांची नियुक्ती

नवी दिल्ली-  सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी फारूक खान आणि माजी सनदी अधिकारी के. के. शर्मा यांची जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांच्या सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने यासंदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, खान आणि शर्मा हे ज्या दिवशी पदाची सूत्रे हाती घेतील त्या दिवसापासून त्यांची नियुक्ती अमलात येईल. हो दोन्ही सल्लागार उपराज्यपालांना त्यांच्या प्रशासकीय कामात मदत करतील. हे दोन्ही अधिकारी जम्मू आणि काश्मीर या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचेही सल्लागार होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे विश्वासू मानले जातात. शर्मा यांनी विविध केंद्रशासित प्रदेशांत सेवा बजावली असून ते दिल्ली आणि गोव्याचे मुख्य सचिवही होते.

बातम्या आणखी आहेत...