आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडा; इम्रान यांचे आवाहन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या विदेशातील समर्थकांनी आणि आपल्या चाहत्यांनी काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडावा, असे आवाहन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. इम्रान यांनी बुधवारी आपल्या पक्षाचे विदेशातील सचिव अब्दुल्ला रियार यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी हे आवाहन केले.

इम्रान खान म्हणाले की, पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे अधिवेशन होणार आहे. त्या वेळी कार्यकर्त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काश्मीर प्रश्नी निदर्शने करावीत. 
पाकिस्तानमध्ये सध्या इम्रान खान या‌‌ंच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाचे सरकार आहे. भारत सरकारने ५ आॅगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ अ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्याचा विशेष दर्जा रद्द झाला आहे. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमधील स्थिती तणावपूर्ण आहे. भारताच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पीटीआयने काश्मीर मुद्दा जगासमोर शक्य त्या सर्व मंचांवर मांडण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने काश्मीर मुद्दा यूएनएससीतही मांडला होता. पण तेथे चीन वगळता इतर कुठल्याही देशाने पाकिस्तानला साथ दिली नाही. त्यानंतर तर पाकिस्तान जास्तच खवळला आहे. 
 
 

हा आमचा अंतर्गत प्रश्न : भारताने स्पष्ट केली भूमिका
दुसरीकडे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. पाकिस्तानने ही वस्तुस्थिती स्वीकारणे गरजेचे आहे, असे भारताने म्हटले आहे. काश्मीर मुद्द्यावर भारताने म्हटले आहे की, हा द्विपक्षीय मुद्दा आहे. त्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते. पण त्याआधी पाकिस्तानने भारतविरोधी दहशतवादी कारवाया रोखण्याची गरज आहे.
 

कर्तारपूर काॅरिडाॅर निश्चित वेळीच उघडणार : पाकिस्तानचे स्पष्टीकरण 
काश्मीर मुद्द्यावरून दोन्ही देशांत तणाव असला तरी कर्तारपूर काॅरिडाॅर ठरल्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये खुला केला जाईल, असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. शिखांचे पहिले गुरू गुरुनानकदेव यांच्या ५५० व्या प्रकाशोत्सवानिमित्त हा काॅरिडाॅर नोव्हेंबरमध्ये उघडला जाणार आहे. हा काॅरिडाॅर उघडला गेल्यानंतर शीख पाकिस्तानमधील गुरू नानकदेव यांच्याशी संबंधित या धार्मिक स्थळाचे दर्शन घेण्यास जाऊ शकतील. त्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद फैसल यांनी सांगितले की, कर्तारपूर काॅरिडाॅरबाबत लवकरच एक बैठक होईल. हा काॅरिडाॅर भारतीय शीख भाविकांसाठी खुला करू.
 

कर्तारपूर काॅरिडाॅरबाबत निर्माण झाला होता प्रश्न
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम रद्द केल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरचे दोन भागांत विभाजन करून जम्मू-काश्मीर व लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. पाकिस्ताने भारतासोबतचे कूटनीतिक संबंध संपुष्टात आणल्यानंतर आणि द्विपक्षीय व्यापार थांबवल्यानंतर कर्तारपूर काॅरिडाॅर प्रस्तावित योजनेनुसार खुला केला जाईल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आपण हा काॅरिडाॅर निश्चित कार्यक्रमानुसार खुला केला जाईल, असे पाकने स्पष्ट केले आहे. आता भारत आपल्या पूर्वीच्याच प्रस्तावावर ठाम आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही.
 

भारतीय नागरिक पाकमध्ये असल्यास मदत करू : फैसल
दोन्ही देशांत रेल्वे आणि बस संपर्क बंद झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये काही भारतीय नागरिक अडकले आहेत का, या प्रश्नावर डाॅ. फैसल म्हणाले की, पाकिस्तानमध्ये भारतीय नागरिक असल्याची माहिती माझ्याकडे नाही. जर एखादा भारतीय नागरिक पाकिस्तानमध्ये असेल तर आम्ही त्याला सुविधा देण्यास तयार आहोत. वाघा सीमा खुली आहे. तो पायी चालत जाऊन सीमा ओलांडू शकतो. भारताने सध्या जागतिक बँकेच्या मध्यस्थी असणाऱ्या सिंधू पाणी वाटप कराराचे नूतनीकरण केलेले नाही, असे फैसल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. 
 

बातम्या आणखी आहेत...