आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीर ६९ दिवसांनंतर पर्यटकांसाठी पुन्हा खुले; पर्यटकांना सर्व सुविधा पुरवल्या जातील, तीन राजकीय नेत्यांची सुटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरचे खोरे तब्बल ६९ दिवसांनंतर पर्यटकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. कलम ३७० रद्द करण्यापूर्वी २ ऑगस्टला अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना माघारी पाठवण्याचा आदेश गृह विभागाने जारी केलेला होता. जम्मू-काश्मीर प्रशासनाने गुरुवारी हा आदेश मागे घेतला. त्यामुळे जारी केलेल्या नव्या आदेशात काश्मीरमध्ये येणाऱ्या सर्व पर्यटकांना सर्व प्रकारचे सहकार्य आणि सुविधा पुरवल्या जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे. 
खोऱ्यामध्ये दहशतवादाच्या तीन दशकांमध्ये पर्यटकांच्या येण्यावर कधीही बंदी घातली नव्हती. पर्यटनावर इथली अर्थव्यवस्था आणि लाखो लोकांचे जीवन अवलंबून आहे. जुलैमध्ये इथे १.७० लाख पर्यटक आले होते, परंतु पर्यटकांची संख्या कमी झाल्यानंतर काश्मीरमधील हॉटेल व्यावसायिकांंनी कामगार कमी केले होते. काश्मीरचे नंदनवन पर्यटकांसाठी पुन्हा खुले केल्यानंतर पर्यटनाशी संबंधित लोकांनी या आदेशाचे स्वागत केले आहे. यासोबतच मोबाइल-इंटरनेट, बाजारबंदी कायम असताना किती पर्यटक काश्मीरमध्ये येतात याविषयी शंका उपस्थित होत आहे. 

आजपर्यंत पर्यटकांवर एवढा परिणाम झालेला नव्हता. २०१६ मध्ये बुरहान वानीच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनामध्येदेखील ए‌वढी भीषण परिस्थिती नव्हती, असे पर्यटक शकील रशीद यांनी सांगितले. दाल सरोवरात होडी चालवणाऱ्यांवर बंदी घातल्यामुळे पर्यटक कसे येतील? सरकारने संचारबंदीचा निर्णय मागे घ्यायला हवा. काश्मीरमध्ये दिवसभर बंद असलेल्या दुकानांमुळे पर्यटकांच्या येण्यावर परिणाम होऊ शकतो. पर्यटनासाठी परिस्थिती पूर्णपणे स्थिर होण्याची गरज आहे, असे वाहतूकदार अब्दुल रहीम यांनी म्हटले आहे. 

जम्मू-काश्मीर प्रशासनाने गुुरुवारी तीन राजकीय नेत्यांची सुटका केली आहे. ५ ऑगस्टला कलम ३७० रद्द केल्यानंतर या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडीपीचे माजी आमदार यावर मीरशिवाय नूर मोहंमद आणि शोएब लोन यांना वेगवेगळ्या कारणांमुळे सोडण्यात आले आहे. लोन उत्तर काश्मीरच्या काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते, तर नूर मोहंमद हे नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकर्ता आहेत. विशेष म्हणजे ५ ऑगस्टआधी एक हजारपेक्षा जास्त नेते, फुटीरतावादी, कार्यकर्त्यांना आणि वकिलांना ताब्यात घेतले होते. राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती ताब्यात आहेत. 
 

१८ सूफी नेते आणि मुस्लिम धर्मगुरू उद्या खोऱ्यात जाणार
सूफी नेते आणि विविध दर्ग्यांच्या प्रमुखांचे प्रतिनिधी मंडळ १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान जम्मू-काश्मीरला जाणार आहे. हे मंडळ स्थानिक नागरिकांना भेटून परिस्थितीचा आढावा घेणार आहे. दरम्यान, सैन्याचे उत्तरेकडील आघाडीचे प्रमुख रणबीर सिंह यांनी गुरुवारी काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी सैनिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काश्मीरमध्ये १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑक्टोबरअखेरपर्यंत सुरू होऊ शकतात.