इतिहास / जम्मू-काश्मीरचा इतिहास हा भारताच्या इतिहासाचा भाग - साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद माेरे यांचे मत

ईशान्य भारत आणि काश्मीरमध्ये पूर्वी दळणवळणाची साधने तुलनेने कमी असल्याने त्यांच्याशी संवाद कमी होता पण...

प्रतिनिधी

Jun 23,2019 09:17:00 AM IST

पुणे - जम्मू-काश्मीरचा इतिहास हा भारताचा इतिहास आहे आणि भारताचा इतिहास हा काश्मीरचा आहे. दोन्ही इतिहास एकमेकांपासून वेगळे करता येणार नाहीत. या इतिहासात सांस्कृतिक जडणघडणीची बीजे रुजली आहेत. काश्मीर आणि भारताच्या इतिहासाला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे प्रमुख सदानंद मोरे यांनी शनिवारी व्यक्त केले.


सरहद पुणे आणि चिनार प्रकाशन संस्थेच्या वतीने काश्मीर इतिहासाचे अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी अनुवाद केलेल्या काश्मिरी राजांची गाथा ‘जोनराजकृत राजतरंगिणी’ या ग्रंथाचे मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डाॅ. श्रीकांत बहुलकर यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात प्रकाशन झाले. या वेळी मोरे बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार उपस्थित होते.


मोरे म्हणाले, इतिहासापासून आपण धडे घेतले पाहिजेत. भारतात एकता होती आणि आजही आहे. मात्र, आजच्या एकतेच्या पटलावर थोडी धूळ साचली असून ती फुंकर मारून दूर सारणे आवश्यक आहे. आजचा वर्तमान उद्याचा इतिहास होईल. वर्तमानातील इतिहासकारांनी आणि नागरिकांनीदेखील सजगतेने वागत उद्याचे इतिहासकार आपल्याला दूषणे देणार नाहीत, असे वर्तन कले पाहिजे. काश्मिरची नेहमीच ज्ञान, तत्त्वज्ञान आणि समन्वयाची भूमिका राहिली आहे, असेही मोरे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

दळणवळणाची साधने कमीच
ईशान्य भारत आणि काश्मीरमध्ये पूर्वी दळणवळणाची साधने तुलनेने कमी असल्याने त्यांच्याशी संवाद कमी होता. मात्र, पर्यटन, व्यापाराच्या निमित्ताने काश्मिरी नागरिक भारताच्या कोणत्याही भागात जाऊन व्यवसाय करत होते. तसेच देशातील कोणत्याही भागातील नागरिक काश्मीरमध्ये जाऊन व्यवसाय करतच होते, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

X
COMMENT