सुपारी फुटली / जामनेरची 'सुपारी बाग' सुकली; 'अडकित्ता बाग'मात्र बहरली!

माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचा राजकीय प्रभाव कमी हाेऊन भाजप नेते गिरीश महाजन यांचे राजकीय वर्चस्व वाढल्याचे द्याेतक

सुहास चौधरी

Oct 07,2019 08:16:00 AM IST

जामनेर : जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये सुमारे ३५ वर्षे राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या 'सुपारी बागे'ला अवकळा आली आहे. अनेक वर्षे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांचे निवासस्थान असलेल्या सुपारी बागेत कार्यकर्त्यांची चहलपहल असायची. मात्र ही वास्तू आता राजकीयदृष्ट्या भकास आणि निर्मनुष्य झाली आहे. उलट नव्याने उदय झालेल्या 'अडकित्ता बागे'ला गर्दीचा बहार आला आहे.


शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे माजी खजिनदार ईश्वरलाल जैन यांचे 'सुपारी बाग' हे निवासस्थान. १९८० साली जैन जामनेरातून निवडणूक जिंकले. त्यानंतर १९८५ व १९९० मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांच्या समर्थकांना उमेदवारी मिळाल्याने पक्ष कार्यालय म्हणून सर्वच राजकीय सूत्र 'सुपारी बागेतून'च हलायची. त्यानंतर १९९५ व १९९९ अशा दाेन निवडणुकांत ईश्वरलाल जैन यांचा भाजप नेते गिरीश महाजन यांनी पराभव केला. तेव्हापासून सुपारी बागेचे राजकीयदृष्ट्या असलेले महत्त्व काहीसे कमी होत गेले.


कालौघात महाजन यांनी स्थापन केलेल्या 'अडकित्ता बागे'चे महत्त्व वाढले. असे असले तरी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीप्रसंगीही सुपारी बागेतून काही हालचाली झाल्या होत्या, त्यात यश अाले नाही. या निवडणुकीत सुपारी बागेचे गेटही उघडले नाही.


कार्यकर्त्यांमध्ये मरगळ
१९९५ व १९९९ या दाेन निवडणुकांत स्वकीयांनीच घात केल्याची जैन यांना शंका आहे. त्यामुळे त्यांनी महाजन यांच्याशी जुळवून घेतले. पुढे जैन यांनी महाजनांसोबत निवडणूक लढल्या. तरी जामनेर वगळता मी भाजपचा विरोधकच असल्याचे जैन सांगतात. 'सुपारीच अडकित्त्या'ला मिळाल्याने कार्यकर्त्यांनी लांब जाणे पसंत केले अन‌् सुपारी बागेत सन्नाटा पसरला.

X
COMMENT