आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआघाडीने सहा जागांचा प्रस्ताव दिला, पण बुडत्या नावेत काेण बसेल? म्हणत महादेव जानकरांनी साधला निशाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पुणे   - महाआघाडीत सहभागी होण्यासाठी आम्हाला सहा जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता,  मात्र बुडत्या नावेत बसणारा मी नाही. त्यामुळे हा प्रस्ताव आपण नाकारला. भाजप बारामती अाणि माढा मतदारसंघ रासपला देत हाेता, मात्र त्यांचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी, असा अाग्रह करण्यात येत हाेता. आपल्याला बेदखल करण्यासाठी व्यवस्था उभारली जात असून तसे नसेल तर काँग्रेस आणि भाजपकडून त्यांच्याच चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह का केला जात आहे? ही युती नसून “बेकी’ आहे. आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नीती चांगली नाही, अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले.    
पक्षाच्या वतीने पुण्यामध्ये शनिवारी राज्यस्तरीय आढावा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी जानकर बोलत होते. जानकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर शिवाजी पार्क मैदानावर पाच लाख लोकांचा मेळावा घेणार आहे. भाजपने शिवसेनेला त्रास दिला. शेवटी एकत्र झाले. आता रासपलाही त्रास होणार आहे. ही युती नसून बेकी आहे. डॉ. सुजय विखे भाजपत जाण्यापूर्वी माझ्याकडेच आले होते. मात्र, मीच त्यांना भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. युद्धात हरलो तरी तहात जिंकावे लागेल. ही वादळापूर्वीची शांतता आहे. भाऊ आणि बहीण म्हणून अनेकांच्या जवळ गेलो, पण कोणीही जबाबदारी घेतली नाही, असे म्हणत जानकर यांनी भाजपमधील अनेकांना टोला लगावला. हा पक्ष कोणाच्या मेहरबानीवर चालत नाही. आपल्याला संयमाने काम करावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हरवण्याचा आमचा दावा आजही कायम आहे.   

 


...तर मुख्यमंत्री मला बदनाम करतील  
पक्ष आणि संघटना वाढीवर भर द्यायला हवा. शक्तिस्थळांचा अभ्यास करण्यास सांगून कार्यकर्त्यांना राज्यातील ताकद आजमावयाचा एक प्रकारे इशाराच त्यांनी दिला आहे. माढ्याची आशा अद्याप सोडलेली नसून कधी कुठून लढायचे ते आम्ही ठरवू. मी यापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, मुख्यमंत्री महोदयांनी त्या वेळी आमचा हट्ट पुरवला. आजही मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा फोन केला, पण मी उचलला नाही. पण मी त्यांची साथ दिली नाही तर मला बदनाम करतील, अशी भीती आहे. जानकरला पद दिले नाही म्हणून बाहेर पडला असा गद्दारीचा शिक्का नको, असेही जानकर म्हणाले.    

 

माढा मतदारसंघाची अजूनही आशा   
मी अद्यापही माढा मतदारसंघाची आशा सोडली नाही. महायुती जागा सोडायला तयार होती, मात्र चिन्ह त्यांचे वापरण्याचा आग्रह होता. त्याला आम्ही नकार दिला आहे. काही वर्षांपूर्वी रासपचे दाेन जिल्हा परिषद सदस्य हाेते. आज राज्यात त्यांची संख्या ९८ पर्यंत गेली आहे. पक्षातील कितीही लाेक पक्ष साेडून गेले तरी रासप  वाढत जाणार असून त्यासाठी संघटन वाढवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

 

 

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी घटक पक्ष युतीसोबतच  
शिवसेना, भाजप महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पार्टी, रयत क्रांती, शिवसंग्राम यांची शनिवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. सर्व घटक पक्ष एकजुटीने काम करतील, महायुती आणखी भक्कम करतील आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकदिलाने काम करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. फडणवीस यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...