आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर दिसण्यासाठी तिने खर्च केले अडीच लाख डाॅलर्स; या कारणामुळे तरुणीने उचलले मोठे पाऊल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानच्या सुबाकी तोमोमी या तरुणीस ती लहान असताना तिच्या आईने ‘तू सुंदर दिसत नाही’ एवढेच म्हटले हाेते. आईचे म्हणणे तिला एवढे बाेचले की, त्यानंतर तिने सुंदर दिसण्याचे ठरवून टाकले. त्यासाठी सुबाकीने गत २१ वर्षांत स्वत:च्या चेहऱ्यावर अनेकदा शस्त्रक्रिया करून दोन लाख ३० हजार डॉलर्स (सुमारे १ काेटी ९४ लाख रुपये) खर्च केले. 


आता ३९ वर्षांच्या असलेल्या सुबाकीने एका विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून काम केले आहे. तिने पहिली प्लास्टिक सर्जरी १८ वर्षांची असताना केली हाेती. त्यानंतर २० व्या वर्षी दात व्यवस्थित केले व डाेळ्यांचा आकार चांगला करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. 


विशेष म्हणजे, इतक्या शस्त्रक्रिया करूनही तिचे मन भरलेले नाही. सुंदर दिसण्यासाठी मी ३०० प्रकारच्या लहान-माेठ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच यासाठी मरेपर्यंत प्रयत्न करत राहीन, असे तिने सांगितले.  


कमाईची जास्त रक्कम शस्त्रक्रियांवर खर्च 
सुबाकीने सांगितले की, मी सुंदर नसल्याची बाब लहानपणापासूनच माझ्या मनात घर करून राहिली हाेती. त्यामुळे अधिक सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी काहीही करण्याचे ठरवून टाकले. मी सुंदर दिसत नसल्याने लहानपणी माझी आई मला नववर्ष, बोन फेस्टिवल आदी कार्यक्रमांत आमच्या घरी येणाऱ्या मित्रमंडळीसह नातेवाइकांना भेटू देत नव्हती. त्यामुळे मला खूप अपमानास्पद वाटे. त्यावर मी आईला मित्र व नातेवाइकांसमाेर मला अपमानित करत जाऊ नकाेस, असे सांगायची; परंतु तू सुंदर दिसत नसल्याने इतरांना भेटू नकाेस, असे नेहमीचे उत्तर ती द्यायची. यास कंटाळून मी पैशांची बचत करणे सुरू केले. त्यानंतर कॉस्मेटिक सर्जरी केली. त्यामुळे मला हवाई सुंदरीची नाेकरी मिळाली व नाेकरीच्या पैशांतील बहुतांश रक्कम शस्त्रक्रियांवर खर्च केली, असे सुबाकीने सांगितले.